Omicron : कोल्हापुरात ओमायक्रॉनचा शिरकाव; एक जण पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2021 04:26 PM2021-12-29T16:26:56+5:302021-12-29T16:36:13+5:30
आज दुपारच्या सुमारास कोल्हापुरात पहिला बाधित रुग्ण आढळल्याचे समोर आले. यानंतर आरोग्य यंत्रणेबरोबरच शहरात एकच खळबळ उडाली.
कोल्हापूर : ओमायक्रॉन विषाणूने अखेर कोल्हापुरात शिरकाव केला. आज दुपारच्या सुमारास कोल्हापुरात पहिला बाधित रुग्ण आढळल्याचे समोर आले. यानंतर आरोग्य यंत्रणेबरोबरच शहरात एकच खळबळ उडाली.
आयटी आय परिसरातील एका कुटुंबातील चार व्यक्तींना कोरोनाची लागण झाली होती. यातील दोघांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. चार पैकी तिघांचे नमुने पुणे येथील प्रयोग शाळेत ओमायक्रॉनच्या तपासणीसाठी पाठवण्यात आले. त्यापैकी एका व्यक्तीचा अहवाल आज दुपारी प्राप्त झाला. या रुग्णास ओमायक्रॉनची लागण झाल्याचे स्पष्ट झाले.
कोल्हापुरात हा पहिलाच रुग्ण आढळल्याने आरोग्य यंत्रणा संतर्क झाली आहे. या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेण्याचे काम आरोग्य यंत्रणेने सुरू केले आहे. तसेच रुग्ण राहत असलेला परिसर प्रतिबंधित करण्याची कार्यवाही सुरू आहे.
मागील दोन आठवड्यापूर्वी १३ व १४ डिसेंबर रोजी ऑस्ट्रेलिया व नायझेरियातून आलेले काही जण ओमायक्रॉन संशयित आढळून आले होते. मात्र त्याचे स्वॅब पुण्यातील शासकीय प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवल्यानंतर ते निगेटिव्ह आले होते. यामुळे कोल्हापूरवासियांना मोठा दिलासा मिळाला होता. मात्र आज, जिल्ह्यात ओमायक्रॉनने शिरकाव केला. त्यामुळे नागरिकांनी मास्क, सॅनिटाझरचा वापर करुन योग्य खबरदारी घेण्याची गरज आहे.