सीमा भागातील बस वाहतुक पुर्ववत, पहिल्या टप्प्यात सात बसेस सुरु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 06:27 PM2021-03-18T18:27:45+5:302021-03-18T18:43:57+5:30
state transport Kolhapur Belgon- सीमाभागाचा वाद पुन्हा उफळून आल्यानंतर गेल्या सहा दिवसांपासून एस.टी.महामंडळाची महाराष्ट्र -कर्नाटक ही बससेवा बंद करण्यात आली होती. ही बससेवा गुरुवारी दुपारपासून सुरु झाली. पहिल्या टप्प्यात सात बसेस बेळगावकडे सोडण्यात आल्या. तर आज, शुक्रवारपासून ही सेवा पुर्ण क्षमतेने सुरु होणार आहे.
कोल्हापूर : सीमाभागाचा वाद पुन्हा उफळून आल्यानंतर गेल्या सहा दिवसांपासून एस.टी.महामंडळाची महाराष्ट्र -कर्नाटक ही बससेवा बंद करण्यात आली होती. ही बससेवा गुरुवारी दुपारपासून सुरु झाली. पहिल्या टप्प्यात सात बसेस बेळगावकडे सोडण्यात आल्या. तर आज, शुक्रवारपासून ही सेवा पुर्ण क्षमतेने सुरु होणार आहे.
सीमा भागात कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेच्या बेळगाव जिल्हा प्रमुखांच्या गाडीवर हल्ला केला. त्यामुळे कोल्हापूरातील मध्यवर्ती बसस्थानकात उभ्या असलेल्या कर्नाटकच्या बसेसवर स्थानिक शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी काळी शाई फेकली. त्यांनंतर सीमावाद पुन्हा उफाळला.
शनिवारी (दि.१३) कोल्हापूरातील मध्यवर्ती बसस्थानकात कोल्हापूर- स्वारगेट(पुणे)या मार्गावर धावणारी एस.टी.बस फलाटवर उभी होती. त्यावर एका कन्नडीगाने दगडफेक केली. त्यामुळे शनिवारपासून कोल्हापूर बेळगावकडे जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य परिवहन मार्ग महामंडळाच्या सर्व बसेस बंद करण्यात आल्या. या मार्गावर १५ बसेसद्वारे ८० फेऱ्या या मार्गावर होत असत. मात्र, त्या सहा दिवसांपासून बंद झाल्यामुळे सुमारे ४२ लाखांचे नुकसान झाले आहे.
याशिवाय हजारो प्रवाशांना खासगी वाहतुकीचा पर्याय स्विकारावा लागला. त्यातून अनेकांच्या खिशाला अर्थिक चाट लागला तो वेगळाच. त्यामुळे ही सेवा पुर्ववत होणे सीमाभागातील प्रवाशांकरीता गरजेचे होते. सेवा सुरु झाल्याबद्दल या मार्गावर रोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी समाधान व्यक्त केले.
स्थानकासह परिसरातील व्यवसायवर परिणाम
गेले काही दिवसांपासून कोरोनाचा संसर्ग वाढल्यामुळे कोल्हापूरातून सातारा, पुणे, औरंगाबाद,नागपूर, मुंबई या शहरांमध्ये जाणाऱ्या बसेसवर परिणाम झाला आहे. या जिल्ह्यातून कोल्हापूरात येणाऱ्या भाविक प्रवाशांचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे मध्यवर्ती बसस्थानकासह परिसरातील खाद्यपदार्थ विक्रेते, हॉटेल व अन्य व्यवसायवर परिणाम झाला आहे. त्यात गेल्या सहा दिवसांपासून कोल्हापूरातून कर्नाटककडे जाणाऱ्या राज्य शासनाच्या एस.टी.बसेसची सेवाही बंद झाल्यामुळे या व्यावसायिकांवर मोठा परिणाम झाला. आता शुक्रवारपासून ही सेवा पुर्ववत होणार असल्यामुळे या विक्रेत्यांनाही काही अशी दिलासा मिळाला आहे.