पहिली उचल एकरकमी ३२१७ : जयसिंगपूरच्या विराट ऊस परिषदेत मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2018 12:43 AM2018-10-28T00:43:54+5:302018-10-28T00:52:23+5:30

यंदाच्या हंगामासाठी पश्चिम महाराष्ट्रासाठी (सरासरी १२.५० उतारा) पहिली उचल एकरकमी ३२१७ रुपये व उर्वरित महाराष्ट्रासाठी (सरासरी ११.५० उतारा) २९२८ रुपये दिल्याशिवाय एकाही कारखान्याचे धुराडे पेटू देणार नसल्याची घोषणा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी

First pick of a lion 3217: The demand for the Virat UAS Conference of Jaysingpur | पहिली उचल एकरकमी ३२१७ : जयसिंगपूरच्या विराट ऊस परिषदेत मागणी

पहिली उचल एकरकमी ३२१७ : जयसिंगपूरच्या विराट ऊस परिषदेत मागणी

googlenewsNext
ठळक मुद्देकारखान्यांची धुराडी पेटू देणार नाहीया परिषदेने आजपर्यंतचा गर्दीचा उच्चांक मोडला.

कोल्हापूर/जयसिंगपूर : यंदाच्या हंगामासाठी पश्चिम महाराष्ट्रासाठी (सरासरी १२.५० उतारा) पहिली उचल एकरकमी ३२१७ रुपये व उर्वरित महाराष्ट्रासाठी (सरासरी ११.५० उतारा) २९२८ रुपये दिल्याशिवाय एकाही कारखान्याचे धुराडे पेटू देणार नसल्याची घोषणा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी शनिवारी येथे झालेल्या विराट ऊस परिषदेत केली.

 

जे कारखाने आता सुरूझाले आहेत ते बंद करण्याचे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले. मागील वर्षांच्या तडजोडीनुसार एफआरपी व टनास २०० रुपये जास्त द्यायचे ठरले होते, ही रक्कम घेतल्याशिवाय कारखानदारांच्या बापाला सोडणार नाही, असेही शेट्टी यांनी जाहीर केले. येथील विक्रमसिंह मैदानावर ही १७ वी ऊस परिषद झाली. या परिषदेने आजपर्यंतचा गर्दीचा उच्चांक मोडला.

या परिषदेत मुख्यमंत्र्यांसह पालकमंत्री चंद्रकांत पाटील, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, भाजपचे आमदार सुरेश हाळवणकर यांच्यावर वक्त्यांनी टीकेची झोड उठविली. शेट्टी यांनी मात्र आपल्या तासभराच्या भाषणात ऊसदराचा सूत्रबद्ध हिशेब मांडला व राज्यातील भाजप सरकारला सत्तेवरून हाकलून देण्याचे आवाहन केले. या सरकारचे आता सात-आठ महिनेच राहिले असल्याचेही शेट्टी यांनी जाहीर करून टाकले. कोडोली येथे सदाभाऊ खोत यांनी घेतलेल्या परिषदेत शेट्टी यांच्यावर झालेल्या टीकेला अन्य वक्त्यांनी प्रत्युत्तर दिले. शेट्टी यांनी मात्र या परिषदेत त्यांच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने कोणतेही वक्तव्य केले नाही, शिवाय खोत यांची तर त्यांनी दखलही घेतली नाही. संघटनेचे ज्येष्ठ नेते दशरथ सावंत अध्यक्षस्थानी होते.

कोडोली येथे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या परिषदेत सदाभाऊ खोत यांनी एफआरपी व २०० रुपये जादा देण्याची मागणी केली होती. तोच धागा पकडून खासदार शेट्टी म्हणाले, ‘शेतकऱ्यांचे भले होत असेल तर आम्हाला कोणत्याही श्रेयवादात पडायचे नाही. खोत यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मागणी केली. ती मुख्यमंत्र्यांनाही मान्य असेल. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी तातडीने कारखानदार, शेतकरी संघटनेचे नेते यांची बैठक बोलवावी व ९.५ टक्क्यांचा बेस धरून २७५० रुपये व त्यावरील प्रत्येक एका टक्क्यास २८९ व त्यावर २०० रुपये जादा एवढी एकरकमी उचल द्यावी. आमची त्यासाठी तयारी आहे. मुख्यमंत्र्यांना हे मान्य असेल तर त्यांनी त्याचा शासन आदेशही काढावा. तुमचा वाहतुकीचा दर ठरलेला नाही, राज्य व जिल्हा बँकांनी किती मूल्यांकन धरून उचल द्यायची हे ठरलेले नसताना कारखानेच सुरूकरण्याची घाई करू नये.’

परिषदेत अखिल भारतीय किसान संघर्ष समितीचे समन्वयक व्ही. एम. सिंग, डॉ. प्रकाश पोफळे, सयाजी मोरे, कर्नाटकातील रयत संघटनेचे चंद्रशेखर कुडिहळ्ले, हंसराज वडगुले, रसिका ढगे, पूजा मोरे, प्रा. जालंदर पाटील, सावकार मादनाईक, भगवान काटे यांची भाषणे झाली. कवी संदीप जगताप यांनी शेतकºयांची स्थिती मांडणारी कविता सादर केली.

परिषदेस पृथ्वीराज जाचक, सतीश काकडे, सुबोध मोहिते, मिश्रीलाल जाजू, आदी उपस्थित होते. पालघर जिल्ह्यातील संघटनेचे झुंजार कार्यकर्ते काळूराम काका यांचा परिषदेत सत्कार करण्यात आला. पैलवान विठ्ठल मोरे यांनी स्वागत केले. अजित पोवार यांनी प्रास्ताविक केले. अभय भिलवडे यांनी सूत्रसंचालन केले.

निवडणुकीसाठी तीन लाख जमा
खासदार राजू शेट्टी यांच्या आगामी लोकसभा निवडणुकीसाठी तीन लाख रुपयांची रोख रक्कम संघटनेच्या कार्यकर्त्यांनी परिषदेत शेट्टी यांच्याकडे जमा केली. ५०० रुपयांपासून ते २५ हजारांपर्यंत ही मदत व्यक्तिगत पातळीवर करण्यात आली आहे.
 

सहकारमंत्र्यांवर झोड
सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्यावर परिषदेत शेट्टी यांनी टीकेची झोड उठविली. कारखानदारांचे हित सांभाळणारा सहकार मंत्री महाराष्ट्राला लाभला असल्याचे सांगून ते म्हणाले, ‘मंत्री असूनही देशमुख यांनी त्यांच्या लोकमंगल समूहातील कारखान्यांची एफआरपी दिलेली नाही. पोलीसच दरोडा घालू लागले तर आम्ही न्याय कुणाकडे मागायचा, असा हा प्रकार आहे. देशमुख यांच्या दोन कारखान्यांची आठ कोटी रुपये एफआरपी थकीत आहे. त्यांनी केंद्र सरकारला खोटी माहिती देऊन पाच कोटी रुपयांचे अनुदान हडप करणारा हा सहकार मंत्री आहे.

३० नोव्हेंबरला ‘चलो दिल्ली...’
केंद्रातील भाजप सरकारने उसाच्या एफआरपीचा बेस साडेनऊ टक्क्यांवरून १० टक्के केला आहे. तो बदलावा, शेतकºयांचा सात-बारा कोरा करा, त्यास दीडपट हमीभाव, द्या या मागण्यांसाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवावे. यासाठी ३० नोव्हेंबरला संसदेला घेराव घालण्यात येणार आहे. त्यासाठी राज्यातून २५ हजार शेतकरी जाणार आहेत, अशी माहिती शेट्टी यांनी यावेळी दिली.

साखरेला ३४०० हमीभाव मिळाल्यास ‘एफआरपी + २००’ शक्य
केंद्राने यंदाच्या हंगामासाठी १० बेस धरून २७५० रुपये एफआरपी जाहीर केली आहे. पश्चिम महाराष्ट्राच्या सरासरी १२.५० उताºयाचा विचार करता ३४५० रुपये एफआरपी होते. त्यातून वाहतूक खर्च ६०० रुपये वजा जाता २८५० रुपये कायदेशीर एफआरपी होते. त्यात संघटनेच्या मागणीनुसार २०० रुपये जादा दिल्यास ३०५० रुपये होतात. ‘स्वाभिमानी’ची मागणी ३२१७ रुपये आहे. ती सरकारी एफआरपीच्या रकमेपेक्षा १६७ रुपयांनी जास्त आहे. केंद्राने साखरेला ३४०० रुपये हमीभाव दिल्यास एकरकमी एफआरपी देणे शक्य असल्याची प्रतिक्रिया साखर कारखानदारीतून व्यक्त झाली.


शेट्टी यांच्या मागणीचे सूत्र
मूळ मागणी अशी
९.५ उताºयासाठी : २७५०
वरील प्रत्येक उताºयासाठी : २८९
व त्यावर २०० रुपये जादा
प. महाराष्ट्राचा सरासरी उतारा १२.५०
९.५ उताºयाचे : २७५०
२८९ प्रमाणे ३ टक्क्यांचे : ८६७
त्यावर जादा : २००
एकूण : ३८१७
वजा तोडणी खर्च-६००
एकरकमी एफआरपी - ३२१७
राज्याचा सरासरी उतारा ११.५०
९.५ उताºयाचे : २७५०
२८९ प्रमाणे २ टक्क्यांचे : ५७८
त्यावर जादा : २००
एकूण : ३५२८
वजा तोडणी खर्च-६००
एकरकमी एफआरपी - २९२८

परिषदेतील घोषणा
पहिली उचल एकरकमी पश्चिम महाराष्ट्रासाठी ३२१७ व उर्वरित महाराष्ट्रासाठी २९२८
गतवर्षीच्या हंगामातील एफआरपी व जादा २०० रुपये सोडणार नाही
एफआरपीचे तुकडे पाडू देणार नाही
एफआरपीचा बेस साडेनऊ टक्केच हवा, त्यासाठी उच्च न्यायालयात दावा
हिंमत असेल तर मुख्यमंत्र्यांनीच हातकणंगलेतून लढावे

जयसिंगपूर (जि.कोल्हापूर) येथील विक्रमसिंह मैदानावर शनिवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची १७ वी ऊस परिषद झाली. या परिषदेत उपस्थित खासदार राजू शेट्टी, भगवान काटे, सावकार मादनाईक, प्रा. जालंदर पाटील, महेश खराडे, डॉ. प्रकाश पोफळे, रविकांत तूपकर यांनी हात उंचावून शेतकºयांसाठी आंदोलनाचा निर्धार केला.

 

Web Title: First pick of a lion 3217: The demand for the Virat UAS Conference of Jaysingpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.