ठरलेली पहिली उचल देणारच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2018 12:04 AM2018-02-19T00:04:37+5:302018-02-19T00:04:53+5:30
सेनापती कापशी : यंदा साखर कारखाने सुरू झाले, त्यावेळी साखरेचे दर ३६०० रुपये प्रतिक्विंटल असे होते. त्यानंतर दोन ते अडीच महिन्यांत साखर दरामध्ये ८०० रुपयांची घसरण होऊन ते २८०० रुपयांवर आले. परिणामी कारखानदारांना ठरलेली उचल देणे केवळ अशक्य झाले. पण सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याच्या वतीने या गळीत हंगामातील टनाला ठरलेली तीन हजार रुपयांची पहिली उचल कोणत्याही परिस्थितीत देणारच, असा विश्वास संस्थापक आमदार हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला. बेलेवाडी काळम्मा (ता. कागल) कारखाना कार्यस्थळावर ८ लाख १ हजार १११ साखर पोत्यांच्या पूजनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गणपतराव फराकटे होते.
ते म्हणाले, सद्य:स्थितीत साखर दरात झालेली घसरण, बँकांचे घटलेले मूल्यांकन त्यामुळे कारखान्यांकडे २००० ते २१०० रुपयेच उपलब्ध होतात. यामुळेच २५०० रुपये दर देण्याचा निर्णय कारखानदारांचा झाला. घोरपडे कारखान्याने पूर्वीच्या तीन पंधरवड्यांची बिले टनाला ३००० रुपयांनी काढली आहेत. उर्वरित टनाला ५०० रुपयांचा फरक निश्चितपणे अदा करू. याबाबत ऊस उत्पादकांनी काळजी करू नये.
यावेळी भय्या माने यांनी मनोगत व्यक्त केले. अध्यक्ष नविद मुश्रीफ यांनी स्वागत केले. जनरल मॅनेजर महेश जोशी यांनी प्रास्ताविक केले. संतोष मोरबाळे यांनी आभार मानले. संघाचे अध्यक्ष सूर्याजी घोरपडे, पं. स. सदस्य जे. डी. मुसळे, अंकुश पाटील, प्रवीण भोसले, शिरीष देसाई, जयवंत पाटील-कासारीकर, शामराव पाटील, सतीश पाटील, मनोज फराकटे व सर्व विभागाचे खातेप्रमुख उपस्थित होते.
दोन वर्षांत विस्तारीकरण
सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याने दोन हंगामात गाळप क्षमता ६ हजारांवरून ८ हजार मे. टन, सहवीज निर्मिती २३ वरून ४५ मेगावॅट व इथेनॉल निर्मिती दररोज ३५ हजारांवरून १ लाख लिटर असे विस्तारीकरण करणार आहे. या संबंधीच्या सर्व परवानग्या मिळालेल्या आहेत. त्यापैकी पहिला टप्पा म्हणून येत्या हंगामातच इथेनॉल निर्मिती ३५ हजारांवरून ५० हजार लिटर सुरू करणार आहोत. तरी यासाठी सर्वांनी आर्थिक सहकार्य करावे, असे आवाहन आमदार हसन मुश्रीफ यांनी केले.