आधी पावसाची; आता मजुरांची समस्या

By admin | Published: July 24, 2014 10:00 PM2014-07-24T22:00:35+5:302014-07-24T22:10:10+5:30

शेतकरी दुहेरी संकटात : दुबार पेरणी टळली; पण मजुरांचा ‘भाव’ वाढला !

First rain; Now the problem of labor | आधी पावसाची; आता मजुरांची समस्या

आधी पावसाची; आता मजुरांची समस्या

Next

शंकर पोळ - कोपर्डे हवेली,  काही दिवसांपूर्वी शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत होते. पावसाने ओढ दिल्यामुळे त्यांच्यासमोर दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले होते; पण उशिराने का होईना दमदार पावसाने शेतकऱ्यांना दिलासा दिला. पावसामुळे शेतकऱ्यांत समाधानाचे वातावरण असताना सध्या मजुरांची समस्या शेतकऱ्यांपुढे उभी ठाकली आहे. मजुरांची टंचाई व त्यांच्या मजुरीचे वाढलेले दर यामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे.
जून महिन्याच्या सुरुवातीस वळवाने झोडपून काढले. त्यावेळी शेतकऱ्यांची मशागतीची कामे खोळंबली; पण वळवाचा जोरदार पाऊस झाल्याने अनेक ठिकाणी पेरणीसाठी पोषक वातावरण तयार झाले. शेतकऱ्यांनी घाईगडबडीत मशागतीची कामे उरकून पेरणीची लगबग सुरू केली. वळीव पावसाच्या जोरावर अनेक शेतकऱ्यांनी पिकांची पेरणी, टोकणीही केली. मात्र, जून महिन्याच्या सुरुवातीला झोडपून काढणाऱ्या वळवानंतर महिनाभर एकही मोठा पाऊस झाला नाही. मान्सूनने पाठ फिरवली. त्यामुळे वीजपंपाद्वारे पाणी देऊन पिके जगविण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली. कालांतराने विहिरीसह कूपनलिकांतील पाणीही आटले. नदीची पाणीपातळी कमी झाली. उपसा जलसिंचन योजना बंद पडल्या. त्यामुळे शेतकरी धायकुतीला आले. उगवलेली पिके कडक उन्हामुळे कोमेजली. काही शेतकऱ्यांनी याही परिस्थितीवर मात करीत बॅरेलने पाणी आणून पिके जगवली. निसर्ग कोपल्याने शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले. शेतकरी हताश झाले असतानाच गत आठवड्यापासून जोरदार पावसाने हजेरी लावली. कोमेजलेल्या पिकांनी पुन्हा तग धरला. शिवार हिरवेगार झाले. पावसाबरोबरच शेतात तण उगवले. उसाची पाचट काढणे शेतकऱ्यांसाठी गरजेचे बनले. त्यासाठी शेतकऱ्यांनी मजुरांकडे धाव घेतली; पण मजुरांचा ‘भाव’ वधारला.
पूर्वीच्या मजुरीत काम करण्यास मजुरांनी शेतकऱ्यांना नकार दिला. तसेच काही मजूर पाचट काढण्यासारखी कामे करण्यासही नकार देत आहेत. काही मजुरांना पाचट काढण्यासारख्या कामांसाठी जादा मजुरी घेणार असल्याचे शेतकऱ्यांना सांगितले आहे. मजूर मागतात तो दर दिल्यास उत्पन्न व खर्च याचा मेळ बसत नाही आणि मजुरी न दिल्यास शेतातील कामे खोळंबणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर ‘इकडे आड अन् तिकडे विहीर’ अशी परिस्थिती झाली आहे. काही गावांमध्ये मजुरांचीच संख्या अत्यल्प असल्यामुळे शेतकऱ्यांना ते मागतील तो दर देऊन कामे करून घ्यावी लागत आहेत. (प्रतिनिधी)

अल्पभूधारकांना जादा फटका
शेतीक्षेत्र जास्त असणारे शेतकरी एकाच वेळी जास्त दिवसांचे काम देत असल्याने मजूर त्यांच्याकडून तडजोडीतून रक्कम स्वीकारतात. अल्पभूधारक शेतकऱ्यांकडून मजूर दिवसाच्या रोजंदारीची ठरलेली रक्कम घेतात. तसेच अशा शेतकऱ्यांकडून जास्त दिवसांचे काम मिळत नसल्याने मजूर त्यांच्या शेतामध्ये काम करण्यास फारसे उत्सुक नसतात, अशी परिस्थिती आहे.

-शेतीमालकच स्वकष्टापेक्षा मजुरांवर अवलंबून असणे
-मजुरांची दिवसाऐवजी खंडून कामे घेण्याची पद्धत
-शेतीतील कष्टाची कामे करण्यापेक्षा इतर कामांना मजुरांची पसंती
-दिवसभराच्या कामातून अपेक्षित मोबदला मिळत नसल्याची ओरड
-शहरातील एखाद्या दुकानात काम केल्यास महिन्याला शेत मजुरीपेक्षा जास्त पैसे मिळत असल्याचा अनुभव

Web Title: First rain; Now the problem of labor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.