आधी जुन्या मशीनची दुरुस्ती मगच नवीन खरेदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 04:16 AM2021-07-09T04:16:26+5:302021-07-09T04:16:26+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : येथील नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत सॅनिटरी नॅपकीन व्हेंडिंग व डिस्पोजल मशीन बसविण्याचा विषय होता. त्याचे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : येथील नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत सॅनिटरी नॅपकीन व्हेंडिंग व डिस्पोजल मशीन बसविण्याचा विषय होता. त्याचे २५ लाखांचे अंदाजपत्रक आहे. त्यामुळे नव्याने या मशीनची खरेदी न करता पूर्वीच्या मशीन दुरुस्त करुन त्या सुरू कराव्यात अथवा बसवलेल्या ठिकाणी उपयोग होत नसल्यास महिला व बालकल्याण सभापतींच्या सूचनेप्रमाणे बसवाव्यात. त्यानंतरच नव्याने व्हेंडिंग व डिस्पोजल मशीन खरेदीचा प्रस्ताव तयार करावा, अशा मागणीचे निवेदन नगरसेविका ध्रुवती दळवाई यांनी मुख्याधिकारी डॉ. प्रदीप ठेंगल यांना दिले.
या निवेदनात, नगरपालिकेच्या ३० जूनच्या सर्वसाधारण सभेत महिला बालकल्याण विभागातर्फे सॅनिटरी नॅपकीन व्हेंडिंग व डिस्पोजल मशीन बसविण्याचा विषय होता. यावेळी फेब्रुवारी २०२०मध्ये २३ मशीन खरेदी करून त्यापैकी १० मशीन बसविल्या. उर्वरित मशीन कोठे बसविल्या, याबाबत विचारणा केली असता प्रशासनाकडून उत्तर मिळाले नाही. त्यावेळी विविध ठिकाणी बसवलेल्या मशीन सध्या बंदावस्थेत असून, पुन्हा नवीन मशीन खरेदी करून पालिकेच्या पैशांची उधळपट्टी करणे योग्य आहे का, पूर्वी मागवलेल्या मशीनची देखभाल पालिकेकडून होत नसून, त्या मशीन मोडकळीस आल्याचे नगरसेविका दळवाई यांनी सांगितले. या शिष्टमंडळात नगरसेवक शशांक बावचकर, नगरसेविका बिल्किस मुजावर, शकुंतला मुळीक यांचा समावेश होता.