पहिला श्रावण सोमवार : बंद दाराबाहेरून शिवशंभोचे दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2020 06:25 PM2020-07-27T18:25:51+5:302020-07-27T18:29:13+5:30
श्रावणातील पहिला सोमवार, पण शिवमंदिर कुलूपबंद. कोरोनाने भाविकांना देवाच्या दर्शनाला जाण्यापासून रोखलं. देव भक्तांच्या, तर भक्त कोरोनाचे संकट दूर होण्याच्या प्रतीक्षेत आहेत.
कोल्हापूर : श्रावणातील पहिला सोमवार, पण शिवमंदिर कुलूपबंद. कोरोनाने भाविकांना देवाच्या दर्शनाला जाण्यापासून रोखलं. देव भक्तांच्या, तर भक्त कोरोनाचे संकट दूर होण्याच्या प्रतीक्षेत आहेत. म्हणूनच घराघरांत ओम नमः शिवायचा जप करत भाविकांनी भगवान शंकराची आराधना केली. पहिल्या सोमवारी शिवमूठ म्हणून तांदूळ वाहण्यात आले.
श्रावण महिन्यात शिव शंकराची आराधना केली जाते. कोल्हापूर हे शिवाचे स्थान मानले जाते. आदिमाया अंबाबाईच्या डोक्यावर शिव लिंग स्थापित आहे. याशिवाय जिल्ह्याच्या चोहीकडे ठिकठिकाणी शिव मंदिरे आहेत.
पंचगंगा नदी घाट तसेच शहरातदेखील अनेक प्रसिद्ध शिव मंदिरे आहेत. या ठिकाणी दरवर्षी श्रावणात भाविकांची मोठी गर्दी असते. धार्मिक कार्यक्रम घेतले जातात. यंदा मात्र कोरोनाने सगळ्यांना भीतीच्या छायेत बंदिस्त केले आहे. मंदिरे बंद आहेत, लोकांना देवदर्शनासाठी देखील जाता येत नाही. बाहेर संसर्गाची भीती. देव भक्तांच्या प्रतीक्षेत, तर भक्त कोरोनाचे संकट दूर होण्याची प्रतीक्षा करत आहेत.
देवाची आराधना करण्यासाठी मंदिरात जाता आले नाही, त्यामुळे कोल्हापूरकरांनी घरातील शिवलिंगाचे पूजन केले. अभिषेक, वस्त्र माळ, धूप आरती करून शिवशंकराचा जाप करण्यात आला. पहिल्या सोमवारी शिवमूठ म्हणून तांदूळ वाहण्यात आले.
कोरोनाचे संकट दूर होऊ दे, अशी प्रार्थना करण्यात आली. दिवसभर व्रतस्थ राहून रात्री नैवेद्य दाखवून उपवास सोडण्यात आला. शहरातील उत्तरेश्वर, वटेश्वर, कपिलेश्वर, कैलासगडची स्वारी मंदिर अशा विविध शिव मंदिरांत सकाळी विधिवत पूजा करून मंदिर बंद करण्यात आले.
मंदिर सुनेसुने
सांस्कृतिक वारसा लाभलेल्या कोल्हापुरात प्रत्येक सण, धार्मिक उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात. मंदिरांमध्ये भाविकांचा राबता असतो. यंदा प्रथमच भाविकांसाठी मंदिराचे दरवाजे बंद आहेत, तर भक्ताविना मंदिरेदेखील सुनेसुने वाटत आहेत.