अखेर लालपरी धावली, कोल्हापुरातून या मार्गावरुन एसटीचा श्रीगणेशा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2021 12:53 PM2021-11-26T12:53:11+5:302021-11-26T13:03:12+5:30
कोल्हापुरातूनही आज सकाळी पहिली एसटी धावली. कोल्हापूर ते इचलकरंजी ह्या मार्गावर पहिली एसटी सोडण्यात आली. विलीनीकरणाच्या मागणीवर एसटी कर्मचारी अजूनही ठाम आहेत. मात्र कर्मचाऱ्यांच्यावर दुसरीकडे बडतर्फीची टांगती तलवार आहे. यामुळे कर्मचारी वर्ग संभ्रमावस्थेत आहे.
कोल्हापूर : गेल्या काही दिवसापासून ठप्प असलेल्या एसटीची चाके आता पुन्हा गतीमान होण्यास सुरुवात झाली आहे. सरकारने कर्मचाऱ्यांच्या मागण्यावर अखेर तोडगा काढल्यानंतर मुंबईतील आझाद मैदानावर सुरु असलेले आंदोलन मागे घेण्यात आले. यानंतर राज्यात हळूहळू सर्वत्र एसटी वाहतूक सुरु करण्यास सुरुवात झाली आहे.
कोल्हापुरातूनही आज सकाळी ९.३० च्या सुमारास पहिली एसटी धावली. कोल्हापूर ते इचलकरंजी ह्या मार्गावर पहिली एसटी सोडण्यात आली. विलीनीकरणाच्या मागणीवर एसटी कर्मचारी अजूनही ठाम आहेत. मात्र कर्मचाऱ्यांच्यावर दुसरीकडे बडतर्फीची टांगती तलवार आहे. यामुळे कर्मचारी वर्ग संभ्रमावस्थेत आहे.
तत्पूर्वी काल, गुरुवारी मध्यवर्ती बसस्थानकात कर्मचाऱ्यांनी जोपर्यंत एस. टी. महामंडळाचे शासनात विलीनीकरण होत नाही, तोपर्यंत आंदोलनावर ठाम राहण्याची शपथ घेतली. मात्र, मुंबईतील आझाद मैदानात सुरू असलेले आंदोलन मागे घेत असल्याचे आमदार सदाभाऊ खोत व आमदार गोपीचंद पडळकर यांनी जाहीर केले. त्यानंतर आंदोलन मागे घेऊन आज, शुक्रवारपासून कामावर हजर राहावे, अन्यथा बडतर्फीच्या कारवाईस सामोरे जावे, असा इशारा परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिला. त्यामुळे सायंकाळी कर्मचाऱ्यांमध्ये आंदोलन मागे घेऊन कामावर हजर व्हायचे की नाही याबाबत चर्चा झाली. रात्री उशिरापर्यंत कर्मचारी आंदोलनावर ठाम होते. मात्र अखेर आज एसटी चाके पुन्हा धावू लागली.