पोस्ट पेमेंट बँकेत खाते उघडण्यात कोल्हापूर राज्यात प्रथम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2019 11:58 AM2019-01-16T11:58:36+5:302019-01-16T11:59:41+5:30
सप्टेंबरपासून देशभर सुरू झालेल्या इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत खाते उघडण्यात कोल्हापूर जिल्ह्याने महाराष्ट्र व गोवा विभागांत प्रथम, तर देशात सातवा क्रमांक पटकावला आहे. गेल्या चार महिन्यांत २१ हजार नवीन खाती सुरू झाली असून, पोस्टाच्या ४६४ कार्यालयांत ५० लाखांच्या ठेवी जमा झाल्या आहेत, अशी माहिती प्रवर डाक अधीक्षक ईश्वर पाटील यांनी पत्रकार बैठकीत दिली.
कोल्हापूर : सप्टेंबरपासून देशभर सुरू झालेल्या इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत खाते उघडण्यात कोल्हापूर जिल्ह्याने महाराष्ट्र व गोवा विभागांत प्रथम, तर देशात सातवा क्रमांक पटकावला आहे. गेल्या चार महिन्यांत २१ हजार नवीन खाती सुरू झाली असून, पोस्टाच्या ४६४ कार्यालयांत ५० लाखांच्या ठेवी जमा झाल्या आहेत, अशी माहिती प्रवर डाक अधीक्षक ईश्वर पाटील यांनी पत्रकार बैठकीत दिली.
डिजिटल व कॅशलेस व्यवहारांना चालना देण्यासाठी अत्यंत विश्वासार्ह असलेल्या पोस्टामधूनच बँकिंग सुविधा सुरू करण्यात आली. सप्टेंबरपासून एकाच वेळी देशभर ही सुविधा सुरू झाली. पोस्टावर लोकांचा असलेला विश्वास सार्थ ठरत या बँकेने अल्पावधीत चांगले यश संपादन केले आहे. त्यातही कोल्हापुरातील पोस्ट पेमेंट बँकेने तर सातत्याने चांगली कामगिरी नोंदविली आहे.
सात युनिटस्च्या माध्यमातून जिल्ह्यातील ४६५ कार्यालयांतून ही सुविधा सुरू झाली असून, त्याला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. बचत खाते, चालू खाते, पैसे भरणे व काढणे, डीबीटी, बिल यांच्यासह व्यापारी पेमेंटचीही सुविधा या बँकेमार्फत दिली जात आहे.
ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, गृहिणी, शेतकरी, लघुउद्योजक, किरकोळ व्यापारी, किराणा व्यापारी यांना डोळ्यांसमोर ठेवून सुविधा पुरविल्या जात आहेत. या ग्राहकांनी अधिकाधिक प्रमाणात खाती उघडावीत म्हणून पोस्टमन आणि ग्रामीण डाकसेवकांना मोबाईल अॅप, बायोमेट्रिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. या बैठकीला व्यवस्थापक अमोल कांबळे उपस्थित होते.
फक्त आधार कार्डवर खाते उघडा
झिरो बॅलन्सवर हे खाते उघडता येत असल्याने सर्वसामान्यांना या बँकेचा चांगला आधार मिळाला आहे. केवळ आधार कार्ड नंबर व अंगठा एवढ्याच पुराव्यावर खाते उघडता येत असल्याने अन्य कागदपत्रांच्या कटकटीपासून सुटका झाली आहे. कमी वेळेत खाते उघडणे शक्य झाले आहे.