तासगाव कारखान्यासाठी पहिल्या निविदेची खरेदी
By admin | Published: June 7, 2015 12:30 AM2015-06-07T00:30:36+5:302015-06-07T00:34:34+5:30
अटी शिथिल करा : श्रीराज डेव्हलपर्सचे राज्य बँकेस पत्र
भिलवडी : तासगाव तालुका सहकारी साखर कारखाना भाडेतत्त्वावर चालवावयास घेण्यासाठी श्रीराज डेव्हलपर्स मुंबई या संस्थेने शनिवारी राज्य बॅँकेकडून पहिलीच निविदा खरेदी केली आहे. मात्र वस्तुस्थितीचा विचार करता, निविदेतील अटी व शर्तींबाबत कायदा व व्यवहाराची सांगड घालून काही अटी राज्य बॅँकेने शिथिल करण्याची मागणी श्रीराज डेव्हलपर्सच्या व्यवस्थापनाने लेखी पत्राद्वारे केली आहे. निविदा भरण्याची अंतिम मुदत १२ जून असून १५ जून रोजी निविदा उघडण्यात येणार आहेत.
श्रीराज डेव्हलपर्सचे मालक प्रमोद पाटील यांचे मूळ गाव तासगाव तालुक्यातील राजापूर हे आहे. मुंबईत बांधकाम व्यवसाय करणारे प्रमोद पाटील हे तासगाव कारखान्याचे सभासद व स्वातंत्र्यसैनिक गोविंददादा बाबूराव पाटील यांचे नातू आहेत. तासगाव कारखाना हा सभासदांच्या मालकीचा राहावा, या हेतूने त्यांनी कारखाना चालविण्याची तयारी दर्शविली आहे. तरीही निविदेतील काही अटी रद्द करण्यासाठी त्यांनी पुढीलप्रमाणे मुद्दे उपस्थित केले आहेत. कारखान्यावरील ताबा सोडताना गणपती जिल्हा संघाने यंत्रे हलविली आहेत. त्या अद्यापही पूर्ववत करून दिलेली नाहीत. ती राज्य बॅँकेने पूर्ववत करून द्यावी. गेल्या दोन हंगामापासून कारखाना बंद असल्याने मोठ्या प्रमाणात यंत्रांची रिपेअरी व मेन्टेनन्सची कामे करावी लागणार आहेत. त्यास मोठा खर्च करावा लागणार आहे. जुन्या यंत्रांची गाळप क्षमता २२०० ते २३०० मेट्रिक टनापर्यंतच राहणार आहे. राज्य बॅँकेकडून एका गळीत हंगामासाठी साडेसहा कोटी रूपये अपेक्षित भाडे निर्धारित केले आहे. या बाबीचा फेरविचार करुन रिपेअरी व मेन्टेनन्ससाठी येणारा खर्च हा मूळ भाडे रकमेतून वजा करण्यात यावा. आजवर तासगाव कारखान्यात कधीच चार लाख टनाचे गाळप झालेले नाही. त्यामुळे कारखाना चालू झाल्यानंतर प्रत्यक्ष होणाऱ्या गाळपावर प्रति टनास १०० रुपयाप्रमाणे भाडे आकारावे. अशा मागण्यांचे पत्र त्यांनी राज्य बॅँकेला सादर केले. (वार्ताहर)