महाराष्ट्रातील पहिली वस्त्रशाळा इचलकरंजीत, तौफिक मुजावर : कष्टकºयांच्या मुलांना वस्त्रनिर्मितीचे शिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2018 12:43 AM2018-01-12T00:43:17+5:302018-01-12T00:45:41+5:30
ऊस पीक मुबलक असणाºया परिसरात साखर शाळा व वस्त्रोद्योगाच्या क्षेत्रात ‘वस्त्रशाळा’ सुरू कराव्यात, अशी संकल्पना सरकारची आहे.
ऊस पीक मुबलक असणाºया परिसरात साखर शाळा व वस्त्रोद्योगाच्या क्षेत्रात ‘वस्त्रशाळा’ सुरू कराव्यात, अशी संकल्पना सरकारची आहे. त्याप्रमाणे अनेक ठिकाणी साखर शाळा सुरू झाल्या; पण वस्त्रशाळा काही सुरू झाल्या नाहीत. म्हणून ‘इचलकरंजीत’ वस्त्रशाळा स्थापन करण्याचा निर्णय आयुष्य फौंडेशन व वंदे फौंडेशन या दोन्ही संस्थांनी घेतला. वस्त्रनगरीतील मुलांना वस्त्र निर्मितीचे शिक्षण मिळण्याबरोबरच शहराचा भवताल माहीत व्हावा, असा उद्देश वस्त्र शाळेचा आहे. राज्यातील पहिली वस्त्रशाळा सुरू करणाºया आयुष्य फौंडेशनचे अध्यक्ष तौफिक मुजावर यांच्याशी साधलेला थेट संवाद...
प्रश्न : ‘‘वस्त्रशाळा’’ ही संकल्पना काय आहे?
उत्तर : शहरातील कामगार व गरीब कुटुंबामधील लहान मुलांना, जी नगरपालिकेच्या प्राथमिक शाळेत शिकत आहेत, अशांना त्यांच्या परिस्थितीअनुरूप वस्त्रनिर्मिती व त्याच्याशी अनुषंगाने असलेले उद्योग-व्यवसाय माहीत करून देणे, वस्त्रोद्योगामधील सूत गिरण्या, सायझिंग, यंत्रमाग-आॅटोलूम, प्रोसेसिंग, डार्इंग, गारमेंट अशा उद्योगाची ओळख वस्त्रशाळेच्या माध्यमातून व्हावी. विशेषत: झोपडपट्टीमधील मुले मिळावीत, असा कटाक्ष ठेवण्यात आला आहे.
प्रश्न : वस्त्रशाळेचे वेगळेपण काय असेल?
उत्तर : नगरपालिकेच्या शाळा क्रमांक दोनमध्येच ६० मुलांचा हा वर्ग आहे. वर्गात सहावी व सातवी इयत्तेतील विद्यार्थी आहेत. विनादप्तर इंग्रजी, गणित व विज्ञान यांचा अभ्यास करून घेणे. तसेच वस्त्रोद्योगाची ओळख करून देणे. प्रत्येक रविवारी सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत हा वर्ग भरत आहे. सध्या नगरपालिकेच्या शाळा क्रमांक २, १२, १७, २६ व ३८ मधील गरजू विद्यार्थी या वर्गात शिक्षण घेत आहेत. विद्यार्थी संख्या वाढवून ती ८० पर्यंत मर्यादित ठेवण्यात येणार आहे.
प्रश्न : वस्त्रोद्योगाबरोबर ‘भवताल’ ची माहिती म्हणजे काय?
उत्तर : इयत्ता सहावी व सातवीच्या मुलांचा अल्लडपणातून सामंजसपणाकडे कल असतो. त्यांच्यासाठी शहर व परिसरात छोट्या-छोट्या अभ्यास सहली आयोजित करावयाच्या. नगरपालिका, बॅँक, दवाखाना, पोस्ट कार्यालय, महावितरण कार्यालय, एस.टी. बसस्थानक व आगार, गाव चावडी, प्रांताधिकारी, पोलीस ठाणे, न्यायालय, तुरुंग, आदींच्या कामकाजांची माहिती करून देणे. स्मशानभूमीला भेट देऊन मुलांच्या मनातील गैरसमज, अंधश्रद्धा दूर करणे. त्याचबरोबर इचलकरंजीतील शास्त्रीय संगीत क्षेत्रात सर्वदूर नाव असलेले पंडित काणेबुवा यांच्या नावाने सुरू असलेली संगीत शाळा, वस्त्रोद्योगाचे शिक्षण देणारी आणि देशपातळीवर पोहोचलेली डीकेटीई शिक्षण संस्था, जागतिक दर्जाचे गणित तज्ज्ञ म्हणून सध्या अमेरिकेमध्ये स्थायिक झालेले सुभाष खोत, भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाकडे असलेले ज्ञानेश्वर मुळे, वन खात्याकडे असलेले सचिव विकास खारगे, आदींचीही या मुलांना ओळख व्हावी, अशीही दृष्टी या शाळेची आहे.
प्रश्न : मुलांच्या अध्यापनाची व्यवस्था कशी आहे?
उत्तर : नगरपालिका शिक्षण मंडळाकडील नारायण पाटील - लक्ष्मण कांबरे हे शिक्षक आणि तारदाळ (ता. हातकणंगले) येथील शिक्षिका सुरेखा कुंभार, तसेच वंदे फौंडेशनचे अध्यक्ष धनेश बोरा व सचिव वासीम गफारी हे अध्यापनाची जबाबदारी पेलत आहेत. याशिवाय वस्त्रोद्योगातील विविध घटक किंवा न्यायालय अथवा पोलीस ठाणे - तुरुंग या विषयासाठी संबंधित अधिकारी - तज्ज्ञ यांना अतिथी व्याख्याते म्हणून बोलविण्यात येतील. तसेच डीकेटीईसारख्या वस्त्रोद्योग अभ्यासक्रमासाठी अग्रेसर असलेल्या शिक्षण संस्थेतील प्राध्यापक व अन्य महाविद्यालयातील अध्यापकांचासुद्धा मुलांच्या शिक्षणासाठी उपयोग होणार आहे. त्यामध्ये यशस्वी राजकीय व्यक्ती म्हणजे आजी-माजी आमदार, खासदार व मंत्र्यांचाही समावेश आहे.
प्रश्न : आर्थिक तरतुदीविषयी काही सांगाल का?
उत्तर : वस्त्रशाळेसाठी आयुष्य फौंडेशन व वंदे फौंडेशन यांनी आर्थिक भार उचलण्याचा प्रयत्न केला असला तरी शहरातील अनेक दात्यांचीही मदत होत आहे. व्याप वाढेल, तसे आणखीन काही देणगीदार समोर येतील, असा विश्वास आहे. कारण, तशी ग्वाही काही दात्यांनी आम्हाला दिली आहे, अशी ही आगळी-वेगळी वस्त्रशाळा झोपडपट्टी व कष्टकºयांच्या मुलांसाठी ऊर्जितावस्था प्राप्त करून देणारी असेल, याची खात्री वाटते.
- राजाराम पाटील, इचलकरंची