आधी केले, मग सांगितले-- दृष्टिक्षेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2018 01:01 AM2018-03-13T01:01:39+5:302018-03-13T01:01:39+5:30
इतरांना उपदेश करण्यापेक्षा कोणत्याही गोष्टीची सुरुवात स्वत:पासून केली तर त्याला ‘आधी केले, मग सांगितले’ असे म्हणतात. कोल्हापुरातील राजारामपुरीतील डॉ. रूपाली हिंमतसिंह शिंदे यांच्याबाबतीत
- चंद्रकांत कित्तुरे-
इतरांना उपदेश करण्यापेक्षा कोणत्याही गोष्टीची सुरुवात स्वत:पासून केली तर त्याला ‘आधी केले, मग सांगितले’ असे म्हणतात. कोल्हापुरातील राजारामपुरीतील डॉ. रूपाली हिंमतसिंह शिंदे यांच्याबाबतीत असेच म्हणतात. त्यांनी गच्चीवरील बाग फुलविली आहे. सेंद्रिय भाजीपाला त्या गच्चीवरच पिकवितात. त्यांच्याकडे महापालिकेचे नळ कनेक्शन नाही. रेन हॉर्वेस्टिंगचे पाणीच ते पिण्यासाठी तसेच स्वत:च्या बागेसाठीही वापरतात. खरे तर रूपाली शिंदे या बीएचएमएस डॉक्टर आहेत. त्यांचे पती हिंमतसिंह शिंदे हे बीएएमएस आयुर्वेदाचार्य आहेत.
दोघांचाही वैद्यकीय व्यवसाय उत्तम चालला आहे; पण काहीशा निरस असलेल्या या व्यवसायातून वेळ काढून डॉ. रूपाली यांनी आपले छंदही जोपासले आहेत. त्यांच्या वडिलांची ्नरुकडी माणगाव येथे शेती होती. वडील महादेव मल्लाप्पा आवटे विद्यापीठात समाजशास्त्राचे संशोधक वृत्तीचे प्राध्यापक. गावातील पहिला बायोगॅस प्रकल्प त्यांचाच. त्यामुळे कचºयापासून खत कसे करायचे याचे बाळकडू रुपाली यांना लहानपणीच मिळाले. घरातील, शेतातील सर्व ओला-सुका कचरा या प्रकल्पासाठी वापरला जायचा. आपणही घरातील कचºयापासून खत करू शकतो हा विचार त्यांच्या मनात सतत घोळत होता. त्यासाठी त्यांनी प्रथम गच्चीवर फुलझाडे आणि शोभेची झाडे लावली. तिथल्याच एका कोपºयात ओल्या कचºयापासून खत निर्मिती करण्याची व्यवस्था केली.
या झाडांसाठी पाण्याचे जार, प्लास्टिकच्या बादल्या, डबे, जुने टायर्स अशा टाकावू वस्तूंचाच वापर कुंड्या म्हणून केला. शिवाय बाटल्या, ग्लास, फुटके मग यांचाही वापर त्यांनी फुलझाडे लावण्यासाठी केला आहे. त्यांच्या घरात खिडक्या, जिन्यातील काठ, गॅलरी अशी जिथे जिथे जागा मिळेल, तिथे ही फुलझाडे दिसतात. गच्चीवरील कुंड्यांमध्ये माती भरली तर ती खूप जड होते, हलविताना त्रास होतो. त्यामुळे कुंडीत तळाशी विघटन होईल अशा रद्दीपेपरचे तुकडे, पुठ्ठे, कोल्ड्रिंक्सचे प्लास्टिकचे कॅन, नारळाच्या शेंड्या, करवंट्या यासारख्या पदार्थांचा थर दिला आणि वरती माती घालून त्यात झाडे लावली. ओला किंवा सुका कचरा त्या बाहेर टाकत नाहीत. त्यापासून सेंद्रिय खताची निर्मिती करतात. फळभाज्या तसेच पालेभाज्यांचे उत्पादनही त्या या गच्चीवरच घेतात. रेन वॉटर हॉर्वेस्टिंगसाठी त्यांच्या घराच्या दारातच असलेल्या सुमारे ९० वर्षांपूर्वीच्या विहिरीचा वापर केला आहे.
या विहिरीत शिडी बसवून घेतली आहे. जाळीचे झाकण केले आहे. या विहिरीला मूळचे पाणीही होते. शिवाय पावसाळ्यात रेन हॉर्वेस्टिंगद्वारे मिळणारे सर्व पाणी या विहिरीत त्यांनी सोडले आहे. दर १५ दिवसाला या विहिरीतील पाण्यावरचा कचरा त्या स्वत: आत उतरून स्वच्छ करतात. या सर्व गोष्टींत त्यांना पती हिंमतसिंह यांचीही सक्रिय मदत असते. गच्चीवरील कुंड्यांमधून दररोज सकाळी, सायंकाळी पक्ष्यांची किलबिल ऐकू येते, इतके पक्षी तेथे येतात. या पक्ष्यांसाठी पाण्याची सोयही त्यांनी केली आहे.
हे सर्व कशासाठी असे विचारता, प्रदूषण कमी व्हावे, आपल्या कचऱ्याचा इतरांना त्रास होऊ नये, त्याचा पुनर्वापर व्हावा यासाठी, असे त्या सांगतात. तुम्ही एकट्याने केले म्हणून शहरातील प्रदूषण किंवा कचरा कमी होणार आहे का? असे विचारता इतरांचा विचार न करता स्वत:पासून सुरुवात करायची असा निर्णय घेऊन मी हे सुरू केले आहे, असे त्या सांगतात. माझे पाहून माझ्या काही मैत्रिणींनीही गच्चीवरील बाग सुरू केली आहे. गच्चीवरील बाग फुलविणारी अनेक कुटुंबे कोल्हापुरात किंवा जिल्ह्यात आहेत. वाढत्या शहरीकरणात आणि पर्यावरणाचा ºहास होत असताना त्याची गरजही आहे. त्यामुळे प्रदूषण आणि कचरा स्वत:च्या घरातच मुरविण्यासाठी स्वत:पासूनच सुरुवात करण्याची डॉ. रूपाली शिंदे यांची ही कृती इतरांनाही अनुकरणीय अशीच आहे.
(लेखक ‘लोकमत’चे उपवृत्त संपादक आहेत.)