शिवसेनेकडून प्रथमच उमेदवार बदलाची परंपरा खंडित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2019 12:29 AM2019-04-18T00:29:08+5:302019-04-18T00:29:13+5:30
विश्वास पाटील । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोल्हापूर मतदारसंघात गेल्या सात निवडणुकीची परंपरा खंडित करून शिवसेनेने प्रथमच सलग ...
विश्वास पाटील ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कोल्हापूर मतदारसंघात गेल्या सात निवडणुकीची परंपरा खंडित करून शिवसेनेने प्रथमच सलग दुसऱ्यांदा एकाच म्हणजे प्रा. संजय मंडलिक यांना उमेदवारी दिली आहे. प्रत्येकवेळा नवीन उमेदवार रिंगणात उतरवण्याच्या धोरणांचा या पक्षाला कायमच फटका बसला आहे. हातकणंगले मतदारसंघातही तशीच स्थिती आहे. तिथेही यंदा वीस वर्षांनंतर प्रथमच एकाच कुटुंबातील पुढच्या पिढीस या पक्षाने उमेदवारी दिली आहे. लढविलेल्या सातपैकी पाच लढतीत शिवसेना दुसºया क्रमांकावर राहिली आहे.
कोल्हापूरच्या राजकारणावर कायमच काँग्रेसच्या विचारांचा प्रभाव राहिला; परंतु बंडखोर प्रवृत्ती या जिल्ह्याच्या मातीचाच गुण आहे. त्यामुळे विरोधी पक्ष म्हणून शेका पक्षासह अन्य डाव्यांचा प्रभाव या जिल्ह्यांवर अनेक वर्षे राहिला. तो कमी झाल्यावर ही जागा उजव्या विचारांच्या शिवसेनेने घेतल्याचे दिसते. राज्याच्या राजकारणातही साधारणत: सन १९९० च्या दशकांनंतर शिवसेनेची हवा सुरू झाली. त्यानंतरच्या सन १९९१ पासून सन २०१४ पर्यंत लोकसभेच्या सात निवडणुका झाल्या. या सर्व निवडणुका शिवसेनेने ‘धनुष्यबाण’ या चिन्हावर लढविल्या परंतु या पक्षाला आतापर्यंत एकदाही विजयाला गवसणी घालता आलेली नाही. त्याचे एक महत्त्वाचे कारण असे की प्रत्येकवेळा या पक्षाने ऐनवेळी आणि नवीन उमेदवारास संधी दिली. या निवडणुकीत आमदार चंद्रदीप नरके व आमदार प्रकाश आबिटकर यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हीच बाब प्रकर्षाने निदर्शनास आणून दिली व मंडलिक यांनाच पुन्हा उमेदवारी देण्याचा आग्रह धरला.
आतापर्यंत रामभाऊ फाळके, त्यानंतर मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेते रमेश देव, कागलच्या शाहू समूहाचे प्रणेते विक्रमसिंह घाटगे, मेजर जनरल शिवाजीराव पाटील, धनंजय महाडिक, विजय देवणे आणि मागच्यावेळी संजय मंडलिक यांना उमेदवारी दिली. यातील एकही उमेदवार पक्षाचा मूळ कार्यकर्ता नाही. देवणे यांना जिल्हा प्रमुख असताना उमेदवारी दिली असली तरी ते मूळचे शेकापक्षाचे कार्यकर्ते होते. देवणे आणि मंडलिक वगळता इतर सर्वजण निवडणुकीचा निकाल झाल्यानंतर शिवसेनेपासून बाजूला गेले. विक्रमसिंह घाटगे यांची शिवसेनेची उमेदवारी लवकर जाहीर झाल्यावर शरद पवार यांनी उदयसिंहराव गायकवाड यांना थांबवून घाटगे यांचे पारंपरिक विरोधक असलेल्या सदाशिवराव मंडलिक यांना रिंगणात उतरविले. लोकसभेच्या सन २००४ च्या निवडणुकीत धनंजय महाडिक हे विजयापर्यंत पोहोचले होते परंतु बिंदू चौकात पवार यांनी ‘कौन हैं यह मुन्ना...कहाँ से आया हैं..’ अशी बोचरी टीका केली व हसन मुश्रीफ यांनी शेवटच्या तीन दिवसांत केलेल्या जोडण्या उपयोगी पडल्या व मंडलिक यांचा निसटता विजय झाला. घाटगे किंवा महाडिक हे पराभवानंतरही शिवसेनेची एकनिष्ठ राहिले असते तर ते खासदारच नव्हे तर केंद्रात मंत्रीही झाले असते. हीच स्थिती हातकणंगले मतदार संघातही दिसते. तिथेही प्रत्येक निवडणुकीत शिवसेनेने उमेदवार बदलला आहे. लोकसभेची सन १९९८ ची निवडणूक श्रीमती निवेदिता माने यांनी शिवसेनेकडून लढवली व त्यांचा १२,१९४ मतांनी पराभव झाला. संजय पाटील यांनीही चांगली मते घेतली. गेल्या निवडणुकीत महायुतीमध्ये ही जागा राजू शेट्टी यांच्या वाट्याला गेल्याने युतीचा उमेदवार रिंगणात नव्हता.
शिवसेनेचे गठ्ठा मतदान
दोन्ही मतदारसंघांत ‘धनुष्यबाण’ हाच आपला उमेदवार समजून त्यास मतदान करणारा किमान एक लाखाचा गठ्ठा या पक्षाकडे आहे म्हणून तर सन १९९१ ला प्रा. विष्णूपंत इंगवले यांच्यापेक्षा रामभाऊ फाळके यांना तर सन १९९६ ला प्रा. एन. डी. पाटील यांच्यापेक्षा रमेश देव यांना जास्त मते मिळाली आहेत. स्वत:चा मजबूत गट असणारा उमेदवार मिळाला की शिवसेना निवडणुकीत हवा निर्माण करते, असा इतिहास व या निवडणुकीत काहीसे तसेच वातावरण आहे.
कोल्हापूर मतदारसंघातील
शिवसेनेचे आतापर्यंतचे उमेदवार
सन ११९१ : रामभाऊ फाळके : मते ७५,१७७
सन १९९६ : रमेश देव : १,६८,४१४
सन १९९८ : विक्रमसिंह घाटगे :३,०६,३५३
सन १९९९ : मेजर जनरल शिवाजीराव पाटील : १,६३,८६६
सन २००४ : धनंजय महाडिक : ३,८७,१६९
सन २००९ : विजय देवणे : १,७२,८२२
सन २०१४ : प्रा. संजय मंडलिक : ५,७४,४०६