भोगावती नदीचे पाणी यंदा पहिल्यांदाच पात्राबाहेर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2020 05:31 PM2020-06-05T17:31:26+5:302020-06-05T18:07:49+5:30
कोल्हापूर जिल्ह्याला शुक्रवारी सकाळी मुसळधार पावसाने झोडपून काढले. मात्र दिवसभर एकदमच खडखडीत ऊन पडले. धरणक्षेत्रातही जोरदार पाऊस कोसळला असून नद्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे. भोगावती नदीचे पाणी यंदा पहिल्यांदाच पात्राबाहेर पडले.
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्याला शुक्रवारी सकाळी मुसळधार पावसाने झोडपून काढले. मात्र दिवसभर एकदमच खडखडीत ऊन पडले. धरणक्षेत्रातही जोरदार पाऊस कोसळला असून नद्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे. भोगावती नदीचे पाणी यंदा पहिल्यांदाच पात्राबाहेर पडले.
ह्यनिसर्गह्ण चक्रीवादळामुळे गेले चार दिवस कोल्हापूर जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. गुरुवारी (दि. ४) दिवसभर त्याने काहीशी विश्रांती घेतली. मात्र रात्रीपासून पावसाने रिपरिप सुरू केली. शुक्रवारी सकाळी तर जोरदार पाऊस कोसळला.
अनेक ठिकाणी तर मुसळधार पावसाने परिसराला झोडपून काढले. या पावसाने खरीप पेरणी झालेली पिके धोक्यात येण्याची शक्यता आहेच; त्याशिवाय असाच पाऊस राहिला तर पेरण्या अडचणीत येणार असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
राधानगरी धरणात ४४.७९ दलघमी पाणीसाठा, कोयनेतून १०५० क्युसेक विसर्ग
कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरणात ४४.७९ दलघमी पाणीसाठा आहे. आज सकाळी ७ वा. च्या अहवालानुसार कोयना धरणातून १०५० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
जिल्ह्यातील धरणांमध्ये पाणीसाठा
- तुळशी ४७.१७ दलघमी, वारणा ३३०.९३ दलघमी, दूधगंगा २१०.७६ दलघमी, कासारी २४.१८ दलघमी, कडवी ३१.०१ दलघमी, कुंभी २७.६६ दलघमी, पाटगाव २३.९८ दलघमी, चिकोत्रा १३.८७ दलघमी, चित्री १३.०५ दलघमी, जंगमहट्टी ८.०५ दलघमी, घटप्रभा १३.९५ दलघमी, जांबरे ६.११ दलघमी, कोदे (ल पा) १.२३ दलघमी असा आहे.
बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे
- राजाराम १२.९ फूट, सुर्वे १४.२ फूट, रुई ४०.६ फूट, तेरवाड ३५ फूट, शिरोळ २७.६ फूट, नृसिंहवाडी २०.६ फूट, राजापूर १३.६ फूट तर नजीकच्या सांगली ६.६ फूट व अंकली ९.२ फूट अशी आहे.