सांगलीत कार्यक्षेत्रातील पहिले उर्दू महाविद्यालय
By admin | Published: September 20, 2016 01:08 AM2016-09-20T01:08:46+5:302016-09-20T01:15:03+5:30
देवानंद शिंदे : अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थी उच्च शिक्षणाच्या प्रवाहात येतील
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील पहिले उर्दू महाविद्यालय माझ्या कारकिर्दीत सुरू होत असल्याचा आनंद होत असून, या महाविद्यालयाच्या माध्यमातून अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थी, विशेषत: विद्यार्थिनी उच्चशिक्षणाच्या प्रवाहात येतील, अशी भावना कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी सोमवारी येथे व्यक्त केली.
सांगली येथील मुस्लिम एज्युकेशन कमिटीच्या नवीन कला (उर्दू) महाविद्यालयास शिवाजी विद्यापीठाचे प्राथमिक संलग्नीकरण सोमवारी प्रदान करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. केवळ शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्राबरोबरच पश्चिम महाराष्ट्रातील हे पहिले उर्दू महाविद्यालय ठरले आहे. कुलगुरू डॉ. शिंदे म्हणाले, उर्दू भाषेमधून शालेय शिक्षण घेणाऱ्या अल्पसंख्याक विद्यार्थी-विद्यार्थिनींना एक तर मराठी किंवा इंग्रजी माध्यमातून पुढील उच्चशिक्षण घ्यावे लागत असे. तथापि, या महाविद्यालयामुळे त्यांना आता उर्दूतूनच पुढील शिक्षण घेता येणे शक्य होणार आहे. यावेळी कुलगुरू डॉ. शिंदे यांच्या हस्ते संस्थेचे अध्यक्ष तथा महापौर हारुण शिकलगार यांना संलग्नीकरणाचे पत्र प्रदान करण्यात आले. यावेळी बीसीयुडी संचालक डॉ. डी. आर. मोरे, सहायक कुलसचिव डॉ. वैभव ढेरे यांच्यासह संस्थेचे मानद सचिव हारुण इसहाक परांडे, संचालक इस्माईल बागवान व सांगलीचे माजी नगराध्यक्ष महंमदअली बागवान उपस्थित होते. (प्रतिनिधी)
सांगलीमधील नवीन कला (उर्दू) महाविद्यालयास शिवाजी विद्यापीठाच्या प्राथमिक संलग्नीकरणाचे प्रमाणपत्र कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी सांगली-मिरज-कुपवाडचे महापौर हारुण शिकलगार यांना प्रदान केले. यावेळी बीसीयुडी संचालक डॉ. डी. आर. मोरे, सहायक कुलसचिव डॉ. वैभव ढेरे, आदीे.