लग्नाचं पहिलं निमंत्रण रायगडाला...
By admin | Published: May 2, 2017 11:59 PM2017-05-02T23:59:16+5:302017-05-02T23:59:16+5:30
अनोखा पायंडा : बेलवडे बुद्रुकच्या नवरदेवाचे आगळ्यावेगळ्या पद्धतीने लग्नाचे निमंत्रण
संतोष गुरव ल्ल कऱ्हाड
लग्न सोहळा हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक आनंदमय, अविस्मरणीय असा क्षण असतो. तो आणखी अविस्मरणीय राहील यासाठी प्रत्येकजण आपल्या कल्पक बुद्धीने तो साजरा करण्याचा प्रयत्न करतो. कोणी लग्न पत्रिकेवर शासनाच्या विविध योजनांची नावे टाकून योजनांचा प्रसार करतो. तर कोणी लग्नाचा खर्च गोरगरीब सामाजिक संस्थांना देतो. असा अनोखा पायंडा बेलवडे बुद्रुक, ता. कऱ्हाड येथील नवरदेवानं पाडला आहे. येथील सचिन साळुंखे याने आपल्या लग्नाचं पहिलं निमंत्रण रायगडाला दिले आहे.
लग्न ठरल्यानंतर पहिली लग्नपत्रिका ग्रामदेवाच्या चरणी ठेवून पत्रिका वाटपास प्रारंभ केला जातो. त्यानंतर पै-पाहुण्यांना पत्रिकेचे वाटप केले जाते. आपला विवाह अनोख्या पद्धतीने साजरा व्हावा, अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. अशीच अनोखी इच्छा मनामध्ये करून बेलवडे बुद्रुक येथील सचिन साळुंखे या युवकाने आपल्या लग्नाची पहिली लग्न पत्रिका छत्रपती शिवाजी महाराज यांची स्मृतिस्थळी असणाऱ्या रायगडावर ठेवली आहे. यातून ‘आधी लगीनं कोंढान्याचं मग रायबाचं’ याची या नवरदेवाने आठवण करून दिली आहे.
हटके पद्धतीने लग्न पत्रिका वाटपाचा निर्णय घेत सचिन यांनी आपले मित्र नंदकुमार मोहिते,
प्रदीप माने, अतुल भोसले यांच्यासमवेत रायगड येथे जाऊन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मृतिस्थळावर लग्न पत्रिका ठेवली आणि प्रत्यक्ष छत्रपती शिवाजी महाराज तसेच त्यांच्या रायगडाला लग्नाचे निमंत्रण दिले. सचिन साळुंखे यांनी घेतलेल्या अनोख्या निर्णयाची गाव व परिसरातील तरुण वर्गामध्ये चांगलीच चर्चा होत आहे. अशा प्रकारे गडकोट, किल्ल्यांनाही लग्नाचं निमंत्रण देण्याची बहुदा ही पहिलीच वेळ आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने लग्नपत्रिका
सचिन साळुंखे यांनी रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणी आपल्या लग्नाची पत्रिका ठेवली आहे. अशा प्रकारे अनोख्या पद्धतीने आपल्या लग्नाची पत्रिका प्रत्यक्ष गडकिल्ले यांना देण्याची हा पहिलीच वेळ आहे.