कोल्हापूरच्या मरगळलेल्या कुस्तीला ऊर्जितावस्था! येत्या शनिवारी पुन्हा शड्डू घुमणार; दिग्गज मल्ल भिडणार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2023 12:30 PM2023-01-05T12:30:08+5:302023-01-05T12:30:47+5:30
हंगामातील पहिले कुस्ती मैदान
कोल्हापूर : कोल्हापूरच्या मरगळलेल्या कुस्तीला ऊर्जितावस्था मिळवून देण्यासाठी शाहू छत्रपती यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसाचे औचित्य साधून येत्या शनिवारी आयोजित केलेल्या कुस्ती मैदानाच्या अनुषंगाने राजर्षी शाहू खासबाग मैदान सज्ज झाले आहे.
आखाड्यात लाल माती टाकण्यापासून बैठकीच्या जागेवरील गवत काढून मैदानावर प्रखर प्रकाशाची व्यवस्था करण्यात आली आहे. हंगामातील पहिले कुस्ती मैदान शनिवारी (दि. ७) होत आहे. त्याची पूर्वतयारी, मैदानाची डागडुजी करण्यात आली आहे. कुस्ती मैदानाच्या निमित्ताने करण्यात आलेल्या कामांची प्रशासक कादंबरी बलकवडे, संभाजीराजे छत्रपती यांनी बुधवारी सायंकाळी संयुक्त पाहणी केली.
मागील पाहणी दरम्यान प्रशासकांनी दिलेल्या सूचनेनुसार या ठिकाणचा परिसर स्वच्छ करण्यात आला असून, केशवराव भोसले नाट्यगृह पश्चिम बाजूची संरक्षण भिंतीला तडे गेले होते त्या ठिकाणी दर्जा भरून घेण्यात आल्या आहेत. आखाड्यात नवीन माती टाकली आहे. मैदानाच्या दक्षिण बाजू व पश्चिम बाजूस संरक्षण भिंतीलगत मुरूम पसरणे व ज्या ठिकाणी बाजू खचली होती, ती लेव्हल करून घेण्यात आली आहे. मैदानावरील नावाचा बोर्ड कलर करून घेण्यात आला आहे. पैलवानांसाठी अंघोळीच्या सोयीसाठी शॉवर व प्लॅटफॉर्म तयार करण्याचे काम सुरू आहे.
अल्लादियाँ खा साहेब यांच्या पुतळ्याजवळील ग्रील दुरुस्ती, शोभेची झाडे व रंगरंगोटी करण्याचे काम करण्यात आले आहे. मैदान पश्चिम बाजू गेट कमान बाजूस वीट बांधकाम करून वहिवाट बंद करण्याचे काम चालू आहे. नाट्यगृह उत्तर बाजू गेट जवळ मुरूम टाकून लेवल व रॅम्पला काँक्रीट करण्यात आले आहे. मैदान दक्षिण बाजूस निखळलेला दगड बसवण्यात आला आहे.
यावेळी उप-आयुक्त रविकांत आडसूळ, उप-शहर अभियंता नारायण भोसले, मुख्य लेखापाल संजय सरनाईक, अर्जुन माने, शारंगधर देशमुख, विक्रम जरग, डॉ. विजय पाटील, इस्टेट ऑफिसर सचिन जाधव, उदय फाळके, आशपाक आजरेकर उपस्थित होते.