जोंधळखिंडीत मुलींसाठी पहिली कुस्ती तालीम
By admin | Published: February 22, 2017 11:21 PM2017-02-22T23:21:12+5:302017-02-22T23:21:12+5:30
सहा महिन्यांपासून प्रशिक्षण : २५ मुलींचा सहभाग, जय हनुमान मंडळाच्या प्रयत्नांना मिळतेय यश
दिलीप मोहिते ल्ल विटा
लाल मातीत कुस्ती क्षेत्रात महिला मल्ल भरारी घेत असताना, त्यांना योग्य प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत मुलींना कुस्तीतील मल्ल प्रशिक्षण देण्यासाठी खानापूर तालुक्यातील जोंधळखिंडी येथे सांगली जिल्ह्यातील पहिली कुस्ती तालीम सुरू करण्यात आली आहे. गेल्या सहा महिन्यांपासून सुरू झालेल्या मुलींसाठीच्या कुस्ती तालीममध्ये २० ते २५ मुली कुस्तीचे प्रशिक्षण घेत आहेत. मुलींसाठी कुस्ती तालीम सुरू झाल्याने महिला मल्लांत समाधानाचे वातावरण पसरले आहे.
जोंधळखिंडी येथील श्री जय हनुमान तालीम मंडळाचे संजय अवघडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही तालीम सुरू करण्यात आली आहे. यावेळी बोलताना अवघडे यांनी लाल मातीतील कुस्तीत महिला मल्लही उत्कृष्ट कामगिरी करीत आहेत. अजूनही त्यांना योग्य प्रशिक्षण दिले तर, या क्षेत्रात ग्रामीण भागातील मुली नेत्रदीपक यश मिळवू शकतात. त्यासाठी ही तालीम सुरू करण्यात आली असल्याचे सांगितले. या तालीममध्ये प्रशिक्षण घेणाऱ्या मुलींचा ग्रामस्थांच्यावतीने सत्कार करण्यात आला.
कुस्तीची मला आवड आहे. त्यातच अमीर खानच्या ‘दंगल’मुळे आणखी प्रेरणा मिळाली. शालेय कुस्ती स्पर्धेत सहभाग घेतला. बऱ्याच ठिकाणी यशही मिळाले. कुस्तीतच मी करिअर करणार आहे. या खेळात आॅलिम्पिक स्पर्धेत खेळण्याचे ध्येय ठेवले आहे आणि ते निश्चितच पूर्ण करेन.
- प्रियांका दुबुले, प्रशिक्षणार्थी, वाळूज.
जोंधळखिंडीसारख्या खेडेगावात महिला मल्लांसाठी लाल मातीतील तालीम सुरू झाली आहे, ही कौतुकास्पद बाब आहे. पुरुष मल्लांप्रमाणेच कुस्ती क्षेत्रात मुलीही नावलौकिक मिळवतील. अवघडे यांनी ग्रामीण भागात मुलींना मोफत कुस्ती प्रशिक्षण सुरू केले आहे. या तालमीत नामवंत महिला मल्ल तयार होण्यासाठी परराज्यातूनही सर्वतोपरी मदत केली जाईल.
- उत्तमशेठ कदम, अध्यक्ष,
केरळ स्टेट गोल्ड अॅन्ड सिल्व्हर रिफायनरी संघटना.