प्रथमच वापर होणारे ‘व्हीव्हीपॅट’ स्वत: समजून घ्या : लोकसभा निवडणुकीसाठी पहिले प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2019 11:25 AM2019-03-27T11:25:51+5:302019-03-27T11:29:54+5:30
निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार लोकसभा निवडणुकीचे पहिले प्रशिक्षण नऊ विधानसभा मतदारसंघांत मंगळवारी झाले. यांतील सात विधानसभा मतदारसंघांचे प्रशिक्षण हे एक दिवसात पूर्ण झाले; तर कोल्हापूर उत्तर, कोल्हापूर दक्षिण व करवीर विधानसभा मतदारसंघांचे प्रशिक्षण आज, बुधवारीही सुरू राहणार आहे.
कोल्हापूर : निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार लोकसभा निवडणुकीचे पहिले प्रशिक्षण नऊ विधानसभा मतदारसंघांत मंगळवारी झाले. यांतील सात विधानसभा मतदारसंघांचे प्रशिक्षण हे एक दिवसात पूर्ण झाले; तर कोल्हापूर उत्तर, कोल्हापूर दक्षिण व करवीर विधानसभा मतदारसंघांचे प्रशिक्षण आज, बुधवारीही सुरू राहणार आहे.
यंदा प्रथमच वापर होत असलेल्या ‘व्हीव्हीपॅट’ यंत्राविषयी प्रथम निवडणूक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्वत: काळजीपूर्वक समजून घ्या, अशा सूचना सहायक निवडणूक अधिकाऱ्यांनी दिल्या. जवळपास दीड तास ‘व्हीव्हीपॅट’ हाताळणीसंदर्भात कर्मचाऱ्यांना प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन करण्यात आले.
कोल्हापुरातील राम गणेश गडकरी हॉल येथे लोकसभा निवडणुकीच्या कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील प्रशिक्षणामध्ये कर्मचाऱ्यांना सहायक निवडणूक अधिकारी सचिन इथापे यांनी मार्गदर्शन केले. (छाया : दीपक जाधव)
कोल्हापूरच्या दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे प्रशिक्षण पेटाळा येथील राम गणेश गडकरी हॉल येथे सहायक निवडणूक अधिकारी सचिन इथापे यांच्या मार्गदर्शनाखाली झाले; तर करवीरचे सहायक निवडणूक अधिकारी वैभव नावडकर यांच्या मार्गदर्शनाखाली विवेकानंद कॉलेज येथे, कोल्हापूर उत्तरचे सहायक निवडणूक अधिकारी श्रावण क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर कॉलेज येथे प्रशिक्षणाला सुरुवात झाली.
हे प्रशिक्षण दोन दिवस चालणार आहे; तर राधानगरीचे सहायक निवडणूक अधिकारी डॉ. संपत खिलारी, चंदगडच्या सहायक निवडणूक अधिकारी विजया पांगारकर, कागलचे सहायक निवडणूक अधिकारी त्रिगुण कुलकर्णी, शाहूवाडीचे सहायक निवडणूक अधिकारी अमित माळी, हातकणंगलेच्या सहायक निवडणूक अधिकारी स्मिता कुलकर्णी, इचलकरंजीचे सहायक निवडणूक अधिकारी समीर शिंगटे, शिरोळच्या सहायक निवडणूक अधिकारी राणी ताटे, इस्लामपूरचे सहायक निवडणूक अधिकारी नागेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एका दिवसात प्रशिक्षण पूर्ण झाले. तसेच शिराळाचे सहायक निवडणूक अधिकारी अरविंद लाटकर यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी (दि. २५) झाले. सकाळी नऊ ते सायंकाळी सहा या वेळेत झालेल्या या प्रशिक्षणामध्ये सुमारे दहा हजार कर्मचारी सहभागी झाले होते.
मतदान केंद्राध्यक्ष, पहिला मतदान अधिकार यांना देण्यात आलेल्या प्रशिक्षणामध्ये निवडणूक आयोगाच्या सूचना, कार्यपद्धती अशी माहिती देण्यात आली. त्याचबरोबर यंदा प्रथमच वापर होत असलेल्या ‘व्हीव्हीपॅट’ मशीनबाबत प्रथम स्वत: काळजीपूर्वक माहिती घ्या, अशा सूचना सहायक निवडणूक अधिकाऱ्यांनी दिल्या.
कोल्हापूर दक्षिणमधील कर्मचाऱ्यांना ‘आयटीआय’मधील कर्मचारी व क्षेत्रीय अधिकारी यांनी ५०-५० च्या बॅचनुसार मशीन हाताळणीबाबत कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले. त्याचबरोबर निवडणूक फॉर्म कसे भरावेत, यासह टपाली मतपत्रिकेबाबतही सहायक निवडणूक अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले.