पंचगंगा नदीपात्रात हजारो मासे पडले मृत्युमुखी, प्रदूषण नियंत्रण मंडळाने घेतले पाण्याचे नमुने
By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2023 12:58 PM2023-01-04T12:58:52+5:302023-01-04T13:35:52+5:30
अहवाल आल्यानंतर या माशांच्या मृत्यूचे कारण निश्चितपणे सांगण्यात येईल
कोल्हापूर : कसबा बावडा शिये पुलाजवळ पंचगंगा नदीपात्रात दूषित पाण्यामुळे हजारो मासे मृत्युमुखी पडले होते. प्रादेशिक अधिकारी प्रदूषण नियंत्रण मंडळाने याठिकाणच्या पाण्याचे नमुने घेण्यात आले आहेत. त्याची तपासणी झाल्यानंतर चार दिवसांत अहवाल आल्यानंतर या माशांच्या मृत्यूचे कारण निश्चितपणे सांगण्यात येईल, अशी माहिती प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी प्रमोद माने यांनी मंगळवारी दिली.
पंचगंगा नदीच्या शिये पुलाजवळील नदीपात्रात दूषित पाण्यामुळे हजारो मासे मृत्युमुखी पडल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले. दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे हे मासे मृत्यू पावल्याचा अंदाज नागरिकांनी व्यक्त केला आहे. हे हजारो मासे पाण्याच्या पृष्ठभागावर तरंगत असल्याचे चित्र होते. हा प्रकार गेली दोन वर्षे सुरू असल्याचा दावा स्थानिक नागरिकांनी केला आहे. येथील पाणी काळसर, हिरवट रंगाचे असल्याने या नदीपात्रात रसायन मिसळत असावे, असा अंदाज आहे. हे पाणी प्रवाहित नसल्यामुळे येथील माशांना ऑक्सिजन मिळत नसावे.
या वृत्ताची दखल प्रदूषण नियंत्रण मंडळाने घेतली असून, त्यांच्या कर्मचाऱ्यांनी मंगळवारी सकाळी या परिसरातील पाण्याचे नमुने घेतले. या नमुन्याचा अहवाल दोन दिवसात उपलब्ध होईल, त्यानंतर या माशांच्या मृत्यूचे कारण समजेल, अशी माहिती मंडळाचे प्रादेशिक अधिकारी प्रमोद माने यांनी दिली आहे.