Kolhapur News: पंचगंगा प्रदूषणाने जलचर तडफडले, प्रदूषणाचा प्रश्न गंभीर; ठोस उपाययोजना कधी होणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2023 11:34 AM2023-01-03T11:34:20+5:302023-01-03T11:36:01+5:30
पाण्याला काळसर हिरवट रंग
कसबा बावडा : कसबा बावडा-शिये पुलाजवळ पंचगंगा नदीपात्रात दूषित पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात मासे मृत्युमुखी पडले. हजारो मासे ऑक्सिजनसाठी तडफडताना दिसत होते. ते मासे पकडण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती.
गेल्या काही दिवसांपासून राजाराम बंधाऱ्याजवळ पंचगंगेची पाणी पातळी खालावली आहे. त्यामुळे नदीपात्राच्या खालील बाजूस पाणी जास्त प्रमाणात प्रवाहित नाही. सध्या पाण्याला काळसर हिरवट रंग आल्यामुळे आणि पाणी म्हणावे तसे प्रवाही नसल्यामुळे माशांना ऑक्सिजनची कमतरता जाणवू लागली. शिये पुलाजवळ नदीच्या दोन्ही बाजूस मृत मासे मोठ्या प्रमाणात आढळून आलेत. या ठिकाणी मेलेल्या माशांचा, तसेच पाणी काळपट हिरवट झालेल्या पाण्याचा उग्र वास येत आहे.
दरम्यान, नदीपात्रात तडफडणारे मासे दिसू लागल्याने, तर काही मृत मासे कडेला तरंगत आल्याची ही बातमी समजताच, अनेक जण या पाण्यातील माशांना पकडण्यासाठी धावपळ करू लागले. बघता-बघता नदीकाठाला गर्दी झाली. एकेकांनी पातेली, बुट्टी भरून मासे नेले. काहींनी तर पोती भरून मासे नेले. दूषित पाण्यातील या माशांची आजूबाजूच्या परिसरात विक्री होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.