भयावह..! पंचगंगा बनली विषगंगा, प्रदुषणाच्या दाहकतेचे टोक; प्रशासनाने हात झटकले

By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2022 11:51 AM2022-03-04T11:51:26+5:302022-03-04T11:52:37+5:30

विकास करताना कोणतेही तारतम्य न बाळगल्याने एखाद्या नदीचे वाटोळे कसे लागू शकते, हे सध्याच्या पंचगंगा नदीकडे पाहिल्यानंतर लक्षात येते.

Fish in Panchganga river basin die due to pollution | भयावह..! पंचगंगा बनली विषगंगा, प्रदुषणाच्या दाहकतेचे टोक; प्रशासनाने हात झटकले

छाया : आदित्य वेल्हाळ

Next

कोल्हापूर : प्राचीन काळापासून आपल्याकडे नदी हे एक त्या त्या परिसराचे वैभव मानले गेले आहे. परंतु विकास करताना कोणतेही तारतम्य न बाळगल्याने एखाद्या नदीचे वाटोळे कसे लागू शकते, हे सध्याच्या पंचगंगा नदीकडे पाहिल्यानंतर लक्षात येते. गुरुवारी नदीकाठाने शिरोळ तालुक्यातील तेरवाड बंधाऱ्यापर्यंत गेल्यानंतर दुर्गंधी, काळे, पिवळे पाणी आणि काही ठिकाणी काठाला तरंगणारे मृत मासे असेच चित्र दिसून आले.

कोल्हापूर महापालिका, ३९ ग्रामपंचायती, इचलकरंजी नगरपालिका, शिरोळ आणि हातकणंगले तालुक्यातील अनेक औद्योगिक वसाहती, तेथील प्रक्रिया उद्योग यांच्या सांडपाण्यामुळे या नदीची अक्षरश: रसायनगंगा झाली आहे. याबद्दल गेली अनेक वर्षे आवाज उठवला जात असला, तरी सरकारच्या बोटचेप्या धोरणामुळे पंचगंगा गटारगंगाच बनत आहे.

वळिवडे बंधाऱ्याजवळ हजारो मृत माशांचा खच पडल्याच्या बातम्या प्रसिध्द झाल्यानंतर येथून पाणी खाली सोडण्यात आले. त्यामुळे मृत मासे खालीपर्यंत वाहत गेले. परिणामी रूकडी बंधाऱ्याच्या अलिकडे आणि पलिकडे तरंगणारे मासेच पाहायला मिळाले. या ठिकाणी धुणे धुणाऱ्या महिला नाकाला पदर बांधूनच धुणे धुवत होत्या. काठावर माशांचा एवढा खच होता की, पाय कुठे ठेवायचा, हेच कळत नव्हते. काठावरील चिखलात माशांचाही चिखल अशीच परिस्थिती होती. त्याच दुर्गंधीमध्ये पर्याय नसल्याने या महिला धुणे धुवत होत्या.

येथून पुढे रूई बंधाऱ्याजवळ गेल्यानंतर फारसे वेगळे चित्र नव्हते. रूकडी बंधाऱ्याकडून वाहत आलेले मृत मासे या बंधाऱ्याच्या अलिकडे नदीच्या दोन्ही कडेला तरंगत होते. त्याचा घाण वास परिसरात पसरला होता. पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाल्यामुळे पाण्याच्या वर येऊन ऑक्सिजन घेण्यासाठी धडपडणारे मासे या ठिकाणी पाहावयास मिळत होते.

रुकडीपर्यंतच मृत मासे

गांधीनगरच्या खालच्या बाजूस आणि रूकडी बंधाऱ्याच्या अलिकडच्या टप्प्यातच हे मासे मेले आहेत. गांधीनगरच्या वर आणि रूकडी बंधाऱ्याखाली मासे मेलेले नाहीत. त्यामुळे याच मधल्या भागातच हे मासे मेले आहेत.

गळती झाल्याची शक्यता

या परिसरातील एका रासायनिक कारखान्यातील गळती होऊन थेट रसायनच पंचगंगेमध्ये मिसळल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. याआधी पाणी खराब झाल्याने केंदाळ दरवर्षीच वाढते. परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणावर मासे पहिल्यांदाच मेल्याचे सांगण्यात आले.

प्रशासनाने हात झटकले

पंचगंगा नदीतील मृत मासे बाहेर काढून त्यांची विल्हेवाट लावण्यास भाग पाडण्यास जिल्हा प्रशासनाने ठोस भूमिका घेतली नाही. त्यांनी हात झटकल्याने इतर कोणताही विभाग याकडे गांभिर्यांने पाहत नसल्याचे पर्यावरणवाद्यांचे म्हणणे आहे.

सात, आठ दिवस झाले पाण्याला घाण वास येतच होता. आता मेलेल्या माशांच्या वासाने डोकं दुखायला लागले आहे. गावात जर जादा पाणी सोडले असते, तर आम्ही धुण्याला नदीला कशाला आलो असतो. पण गरिबाचं ऐकणार कोण. गावातसुध्दा दोन रुपये लिटर पाणी विकत घ्यायची वेळ आली आहे. पाणी शुध्द करत्यात; पण हे पाणी शुध्द केलं तरी प्यायजोगं आहे काय, तुम्ही सांगा. -हजरतबी दरवेशी, रहिवासी, रूकडी


मी गेल्या दहा दिवसांपासून रूकडी बंधाऱ्याजवळ सरबत आणि ताक विक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे. परंतु या ठिकाणी सरबत घेण्यासाठी थांबणारा प्रत्येकजण पाणी कुठलं वापरताय, असे विचारतो. त्यामुळे मी गावातूनच विकत पाणी आणतो. - राजुद्दीन मुजावर चिंचवाड

Web Title: Fish in Panchganga river basin die due to pollution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.