मळी मिसळल्याने कासारीतील मासे मृत
By admin | Published: February 13, 2016 12:45 AM2016-02-13T00:45:17+5:302016-02-13T00:45:36+5:30
‘दालमिया’चे पाणी : प्रदूषण मंडळाची कारखान्याला नोटीस; गावाचा पाणीपुरवठा बंद
पोर्ले तर्फ आळते : आसुर्ले - पोर्ले (ता. पन्हाळा) येथील दत्त (दालमिया भारत शुगर्स) साखर कारखान्याचे मळी मिश्रित पाणी ओढ्यामार्फत थेट कासारी नदीत मिसळल्याने पाणी प्रचंड प्रदूषित झाले आहे. परिणामी, नदीपात्रात मृत माशांचा सडा पसरला आहे. काही मृत मासे ग्रामस्थांनी घरी नेले. तर काही मासे कुजण्याच्या अवस्थेत पाण्यावर तरंगत आहेत. पाणी प्रदूषित झाल्याने पन्हाळा शहरासह नदीकाठच्या गावांचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. या हंगामात मळी मिश्रित पाणी कासारी नदीत सोडण्याचा कंपनीने दुसऱ्यांदा प्रकार केला आहे. या प्रकाराबाबत प्रदूषण मंडळ फक्त कागदी घोडे नाचवित असून, प्रत्यक्षात कारवाई करीत नाही, असा ग्रामस्थांचा आरोप आहे.
दत्त कारखान्याचे प्रक्रिया केलेले सांडपाणी लघूममध्ये साठविले जाते; परंतु कारखान्याच्या वाढीव विस्तारीकरणामुळे मळी मिश्रित पाणी साठविणे कंपनीसाठी डोकेदुखी झाले आहे. त्यामुळे रासायनिक युक्त पाणी शेतकऱ्यांना वापरण्यासाठी प्रवृत्त करतात. हेच मळी मिश्रित पाणी शेतीला देताना काहीअंशी ओढ्यात कारखान्याकडून सोडले जाते, असे कारखाना स्थळावरील ग्रामस्थांचे मत आहे. हे मळी मिश्रित पाणी ओढ्यामार्फत थेट कासारी नदीपात्रात मिसळते. त्यामुळे नदीचे पाणी प्रदूषित झाले आहे.
यापूर्वी डिसेंबर महिन्यात कारखान्याचा लघूम फुटून मळी मिश्रित पाणी या नदीत मिसळत होते. त्यावेळी पन्हाळ््याचे तहसीलदार, जीवन प्राधिकरण विभागाचे प्रमुख, प्रदूषण मंडळाच्या अधिकारी यांनी प्रदूषणाची पाहणी करून कंपनीला नोटीस बजावली होती. तरीही कंपनीने दुसऱ्यांदा मळी मिश्रित पाणी थेट नदीत सोडण्याचे धाडस केलेच कसे, असा सवाल ग्रामस्थांकडून विचारला जात आहे. प्रदूषण मंडळाने डिसेंबरमधील ओढ्यातील व नदीपात्रातील मळी मिश्रित पाण्याचे नमुने घेतले होते. ते चिपळूणच्या तपासणी शाळेत पाठविले होते; पण तेथून अहवाल आलाच नसल्याची माहिती आहे.
दरम्यान, चार दिवसांपूर्वी शेतीला मळी मिश्रित पाणी देण्याच्या प्रकारातून कारखान्याचे मळी मिश्रित पाणी जाधवाच्या ओढ्यामार्फत थेट कासारी नदीत मिसळले. त्यामुळे नदीपात्रातील पाणी प्रदूषित होऊन काळे-निळे झाले. त्यामुळे शुक्रवारी सकाळी यवलूज-पोर्ले दरम्यान धरणाजवळ मासे मेल्याचे दिसले.
‘दालमिया’कडून पन्हाळ्याला टँकरने पाणीपुरवठा
पन्हाळा : दत्त दालमिया साखर कारखान्याने कासारी नदीत सोडलेली मळी, मळीमिश्रित पाणी यामुळे उद्भवलेल्या पन्हाळ्यातील गंभीर पाणी प्रश्नाबाबत तहसीलदार रामचंद्र चोबे यांनी कारखान्याच्या अधिकाऱ्यांबरोबर बोलाविलेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा होऊन कारखान्याचे प्रशासकीय अधिकारी अशोक कर्णिक व तांत्रिक विभागाचे मुख्य प्रशासकीय अधिकारी तेज नारायणसिंग यांनी यापुढे असे प्रकार होणार नसल्याचे लेखी पत्र देऊन जाहीर माफी मागितली. तसेच पन्हाळा येथील विशेष बैठकीत कारखान्याच्यावतीने कोणकोणते उपक्रम राबविले जातत याची माहिती दिली. यावेळी कारखान्याजवळील पडवळवाडी येथे शेतीला पाणी देण्याचा उपक्रम येत्या आठ ते दहा दिवसांत चालू होणार असून, मळी मिश्रित पाणी येथील सुमारे ६00 एकर शेतीला दिले जाणार असल्याचे कारखान्याचे तेज नारायण सिंग यांनी सांगितले. दरम्यान, कासारी नदी प्रदूषित झाल्याने पन्हाळा शहरासाठी पिण्याचे पाणी टँकरद्वारा कारखान्याच्यावतीने पुरविण्यात येणार आहे. डिसेंबर २0१५ मध्ये पन्हाळा शहरास सलग आठ दिवस पाणीपुरवठा झाला नव्हता. यावेळी जे टँकरद्वारा पाणी शहरास दिले गेले त्याचा खर्चही पन्हाळा नगर परिषदेस देण्याचे मान्य केले. त्यावेळी प्रदूषण नियंत्रण मंडळाने चिपळूण येथील प्रयोगशाळेत पाठविलेले पाण्याचे नमुन्याच उत्तर अद्यापही आले नसल्याने नगराध्यक्ष आसिफ मोकाशी यांनी कारखान्याला दोषी धरले आहे.
यापूर्वीही कारवाई
दोन वर्र्षांपूर्वी कंपनीचे मळी मिश्रित पाणी कासारी नदीत मिसळल्याने १३ दिवस कारखाना बंद ठेवण्यात आला होता. त्यानंतर मळीमिश्रित पाण्याचा एक थेंबही ओढ्याला सोडणार नाही, असा शब्द कंपनीने दिला होता. तरीसुद्धा कंपनीने यावर्षी दोनवेळा मळीमिश्रित पाणी सोडण्याचे धाडस केले आहे.
दालमिया शुगर्सचे मळीमिश्रित पाणी कासारी नदीत मिसळण्याची पाहणी केली आहे. कंपनीला तीन दिवसांत याबाबत खुलासा करावा, अशी नोटीस बजावली आहे. जर यात हयगय झाली, तर कंपनीवर पुढील कारवाई केली जाईल.
- जे. ए. कदम, प्रादेशिक विभाग प्रमुख, प्रदूषण मंडळ.