राजाराम तलावातील मासे हवामानातील बदलामुळे मृत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 08:00 PM2021-05-21T20:00:35+5:302021-05-21T20:09:38+5:30
pollution River Kolhapur : हवामानातील अचानक बदल आणि गढूळ पाणी मोठ्या प्रमाणात मिसळल्याने येथील राजाराम तलावातील पाण्यामधील ऑक्सिजनची पातळी खालावल्याने मासे मृत झाल्याचा निष्कर्ष प्रदूषण नियंत्रण मंडळाने शुक्रवारी काढला. राज्यभरातील अनेक तलावातील मासेही याच कारणाने मृत झाल्याचा अंदाज प्रदूषण नियंत्रण मंडळाने व्यक्त केला आहे.
कोल्हापूर : हवामानातील अचानक बदल आणि गढूळ पाणी मोठ्या प्रमाणात मिसळल्याने येथील राजाराम तलावातील पाण्यामधील ऑक्सिजनची पातळी खालावल्याने मासे मृत झाल्याचा निष्कर्ष प्रदूषण नियंत्रण मंडळाने शुक्रवारी काढला. राज्यभरातील अनेक तलावातील मासेही याच कारणाने मृत झाल्याचा अंदाज प्रदूषण नियंत्रण मंडळाने व्यक्त केला आहे.
तौत्के चक्रीवादळामुळे १५ मे नंतर सलग चार दिवस हवामानात बदल झाला. कडक उन्हाळ्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. दरम्यान, १५ मे ला येथील राजाराम तलावातील मासे मृत झाले. मृत माशांचा खच पडला. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पथकाने तलावातील पाण्याचे नमुने घेतले.
तलाव कार्यक्षेत्रातून दूषित पाणी कोठून मिसळत आहे, का याची पाहणी केली. पण पथकाला दूषित पाणी मिसळले नसल्याचे दिसून आले. यामुळे हवामानातील बदल, पावसाचे गढूळ पाणी मिसळल्याने पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाल्याने तलावातील मासे मृत झाल्याचे मत प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या प्रशासनाचे आहे. प्राथमिक टप्यातच हा निष्कर्ष निघाल्याने त्यांनी पाण्याचे नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यासाठी फारसे प्रयत्न केले नसल्याचे समोर आले आहे.