फिटस् -बालस्वास्थ

By admin | Published: March 7, 2017 09:47 PM2017-03-07T21:47:51+5:302017-03-07T21:47:51+5:30

संभाव्य समस्यांबाबत नियमितपणे पालकांचे प्रबोधन झाल्यास आजाराबाबतच शारीरिक व मानसिक भीती नक्कीच कमी करता येईल.

Fit-Balanced | फिटस् -बालस्वास्थ

फिटस् -बालस्वास्थ

Next

अलेक्झांडर दि ग्रेट, आगाथा ख्रिस्ती, सॉक्रेटिस, चार्लस डिफेन्स, सर आयझॅक न्यूटन या सर्व सुपरिचित व्यक्ती असून, त्यांच्यामध्ये एक गोष्ट समान आहे. या सर्व व्यक्ती इपिलेप्सी अथवा फिटस्च्या आजाराने ग्रस्त होत्या. सर्वसाधारणपणे हजार लोकसंख्येमधील ५ ते ६ जणांमध्ये हा आजार आढळतो. सहसा अशा आजाराची सुरुवात लहानपणीच होत असल्याने हा आजार नेमका कसा आहे आणि यात पालकांची भूमिका कोणती, याचा आपण आज विचार करुया.मागील लेखामध्ये तापामध्ये येणाऱ्या झटक्यांबाबत आपण सविस्तर माहिती घेतली आहेच. क्वचितप्रसंगी मेंदूमधील जन्मजात व्यंग, मेंदूला दुखापत, गाठ, रक्तस्राव, जंतूसंसर्ग अशा कारणाने येणाऱ्या फिटस् आपल्याला माहीत असतात. तथापि, सकृतदर्शनी मेंदूचा कोणताही आजार नसताना अथवा कोणत्याही समजून येणाऱ्या ठळक कारणांशिवाय येणाऱ्या झटक्यांना फिटस्चा आजार किंवा इपिलेप्सी असे म्हणतात. घरातील इतर व्यक्तींना फिटस्चा आजार असल्यास मुलाला आजार होण्याची शक्यता जास्त असली तरी हा आजार अनुवंशिक अथवा संसर्गजन्य नव्हे. मेंदूच्या प्रत्येक पेशीमध्ये निर्माण होणारा विद्युतभार सुनियोजित पद्धतीने शरीरामधील सर्व पेशींपर्यंत पोहोचून मेंदूच्या नियंत्रणाखाली शरीरामधील विविध अवयवांची कामे चालू असतात. क्वचितप्रसंगी अशा पेशींमध्ये विद्युतभाराचे ‘शॉर्टसर्किट’ झाल्यास रुग्णाला फिटस् सुरू होतात. मेंदूच्याबाधित भागानुसार विविध चिन्हे वा लक्षणे दिसून येतात. तथापि, अचानक शुद्ध हरपणे, हातपाय ताठ करणे, हातपाय झाडणे, तोंडातून फेस येणे, डोळे पांढरे करणे, अशा लक्षण समूहास आपण फिटस् म्हणतो. बहुतांशी अशा फिटस् ५-१० मिनिटांमध्ये आपणच थांबून जातात. मूल त्यानंतर काही काळ गुंगीत वा झोपेत असते. फिटस् प्रत्यक्ष पाहताना घाबरून टाकणाऱ्या असल्या तरी त्या क्वचितच जीवघेण्या असतात. झटके येताना तोंडात येणारा फेस श्वासनलिकेमध्ये गेल्यास मूल गुदमरते. तसेच त्या प्रदीर्घकाळ चालू राहिल्यास त्यामुळे मेंदूची हानी होऊ शकते.झटका आल्यास पालकांनी घाबरून जाऊ नये. मुलाला सपाट, कठीण पृष्ठभागावर झोपवून एका कुशीवर वळवावे. झटका काही काळातच थांबल्यावर शांतपणे डॉक्टरांकडे नेऊन हा फिटस्चा आजार आहे किंवा अन्य कोणता याची खात्री करून घ्यावी. या आजारासाठी दीर्घकाळ औषधे घ्यावी लागत असल्याने औषधोपचार सुरू करण्यापूर्वी मेंदूच्या कार्याची माहिती समजण्यासाठी ईईजी ही तपासणी तसेच मेंदूचा स्कॅन केला जातो. निदान पक्के झाल्यावर या मुलांना दीर्घकाळासाठी फिटस्च्या गोळ्या देण्यात येतात. सर्वसाधारणपणे औषधोपचार चालू केल्यानंतर २/३ वर्षे फिटस् न आल्यास औषधे बंद करण्यात येतात. या कालावधीमध्ये औषधे घेण्यात सातत्य ठेवणे आवश्यक असते. गोळ्या १/२ दिवस जरी चुकल्या तरी फिट येऊ शकते. मुलांच्या अन्य तत्कालीन आजारामध्ये औषधाचा डोस वाढवावा लागतो. काही मुलांमध्ये काविळीसारखे औषधाचे दुष्परिणाम दिसू शकतात. त्याकडे लक्ष ठेवणे आवश्यक असते. अशा मुलांनी आजार आटोक्यात येईपर्यंत पोहणे, वाहन चालविणे, झाडावर चढणे, अशा गोष्टी टाळणे हितकारक असते. दीर्घकाळ औषध चालू असल्याने या मुलांमध्ये आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत, याची सातत्याने जाणीव होऊन त्याचा त्यांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. फिटस्च्या आजाराबाबत अद्यापही समाजामध्ये अनेक समज, गैरसमज प्रचलित असल्याने या रुग्णांकडे वेगळ्या नजरेने पाहिले जाते. त्यामुळे हा आजार लपविण्याकडे कल असतो. ग्रामीण भागात वैदू अथवा भोंदूबाबांकडून विविध उपचार करून घेतले जातात. तथापि, बहुतांश रुग्णात हा आजार नियमित औषधाने आटोक्यात ठेवता येतो. या व्यक्ती मोठेपणी असा आजार नसलेल्या व्यक्तीप्रमाणेच मोठ्या होऊ शकतात व नावलौकिक मिळवू शकतात. त्यामुळे या आजाराबाबत पालक व डॉक्टर यांच्यामध्ये वेळोवेळी सुसंवाद होऊन निर्माण होणाऱ्या संभाव्य समस्यांबाबत नियमितपणे पालकांचे प्रबोधन झाल्यास आजाराबाबतच शारीरिक व मानसिक भीती नक्कीच कमी करता येईल. -- डॉ. मोहन पाटील.

Web Title: Fit-Balanced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.