रोजी गेली तरी, साडेपाच लाख कुटुंबांना मिळणार रोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:23 AM2021-04-16T04:23:52+5:302021-04-16T04:23:52+5:30

कोल्हापूर : कोरोनाचा वाढता संसर्ग आणि संचारबंदीमुळे जिल्ह्यातील गरिबांची रोजची कमाई बंद झाली असली तरी, त्यांची जेवणाची भ्रांत होणार ...

Five and a half lakh families will get bread | रोजी गेली तरी, साडेपाच लाख कुटुंबांना मिळणार रोटी

रोजी गेली तरी, साडेपाच लाख कुटुंबांना मिळणार रोटी

Next

कोल्हापूर : कोरोनाचा वाढता संसर्ग आणि संचारबंदीमुळे जिल्ह्यातील गरिबांची रोजची कमाई बंद झाली असली तरी, त्यांची जेवणाची भ्रांत होणार नाही. राज्य शासनाने दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना मोफत धान्य देण्याचे जाहीर केल्याने त्याचा लाभ जिल्ह्यातील ५ लाख ६५ हजार २३८ कार्डधारकांना होणार आहे. या महिन्याचे धान्य वाटप झाले असल्याने पुढच्या महिन्यात या धान्याचे वाटप होणार आहे.

राज्यात कोरोनाची दुसरी लाट गंभीर रूप धारण करत असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १ मेपर्यंत संचारबंदी लागू केली आहे. लॉकडाऊन असो की संचारबंदी, याचा सगळ्यात मोठा फटका बसतो तो हातावरचे पोट असलेल्या कुटुंबांना. गेल्यावर्षी ही झळ सहन केल्यानंतर आता पुन्हा एकदा गरिबांचा रोजगार बुडाला आहे. पैशाच्या पातळीवर होत असलेली हानी भरून काढता येत नसली तरी, शासनाने या लोकांना किमान दोनवेळचे अन्न मिळावे यासाठी दारिद्र्यरेषेखालील नागरिकांना माणसी तीन किलो गहू व दोन किलो तांदुळ मोफत देण्याचे जाहीर केले आहे. याचा लाभ जिल्ह्यातील अंत्योदय व प्राधान्यक्रम या गटातील शिधापत्रिका असलेल्या कुटुंबांना होणार आहे.

---

लाभार्थी शिधापत्रिकांची संख्या अशी :

तालुका : अंत्योदय : प्राधान्यक्रम

शिरोळ : ४ हजार ६४१ : ५५ हजार ४२५

आजरा : ३ हजार ७५१ : १७ हजार २४

गगनबावडा : ८६३ : ३ हजार ९११

करवीर : १ हजार ३६५ : ७० हजार ५९८

भुदरगड : २ हजार ७८८ : २२ हजार ४३१

चंदगड : ६ हजार २२ : २२ हजार ९००

गडहिंग्लज : ५ हजार ९१६ : २८ हजार ४१६

हातकणंगले : ४ हजार ९४२ : ६१ हजार ७७७

इचलकरंजी शहर : ४ हजार ८७८ : २९ हजार १८८

राधानगरी : ४ हजार ११५ : ३० हजार ४

शाहूवाडी : २ हजार ९८६ : २४ हजार ९८१

कागल : ४ हजार ४८ : ३६ हजार ५६६

कोल्हापूर शहर : ३ हजार ६२ : ६९ हजार ७५७

पन्हाळा : ३ हजार ८४४ : ३९ हजार ३९

एकूण : ५३ हजार २२१ : ५ लाख १२ हजार ०१७

---

गहू, तांदळासोबत डाळी, तेलही मिळावे

सध्या रेशनवर प्रत्येकी ३ किलो गहू व दोन किलो तांदूळ दिला जातो. मागील लॉकडाऊनमध्ये केंद्राने दिलेल्या या धान्यावर गरिबांचे पोट भागले. पण केवळ तांदुळ आणि गव्हाने जेवण बनत नाही. त्यासाठी तेल, डाळी, मीठ मसाल्यांपर्यंतच्या गोष्टी लागतात. त्यामुळे शासनाने या कठीण काळात किमान डाळी, तेल, साखर द्यावी, अशी या गरिबांची अपेक्षा आहे.

--

गेल्यावर्षी कामधंदा बंद होता, तेव्हा हातात पैसा नव्हता. घर कसं चालवायचं ही चिंता होती. रेशनवर मोफत धान्य मिळाले, म्हणून किमान पोराबाळांची पोट तरी भरली. आता परत मोफत धान्य देणार असल्याने संचारबंदीत तो एक मोठा आधारच आहे. धान्यदेखील चांगलं आणि खाण्यासारखं आहे.

- मनीषा वाळवे

यादवनगर, कोल्हापूर.

--

मी पार्लर चालवते. कोरोना परत वाढू लागला, तेव्हापासून पार्लर बंद आहे. घरात पण सगळे बसून आहेत. पण भूक तर रोजच लागते. या अवघड काळात हातावरचं पोट असलेल्यांना मोफत धान्यामुळे उपाशी झोपावं लागत नाही.

- गायत्री कारजगे

फुलेवाडी, ता. करवीर.

--

आम्ही कचरावेचक बायका. शासनाने कायमच आमच्याकडे दुर्लक्ष केले. मोफत तांदुळ, गहू देणार ही चांगलीच गोष्ट आहे. पण तेवढ्याने जेवण होत नाही. त्यासाठी डाळ, तेल, चटणी तर लागतेच. हातात पैसा नसल्याने या गोष्टी आम्ही विकत घेऊ शकत नाही. याचा विचार करून रेशनवर या वस्तू मिळाव्यात.

- आक्काताई गोसावी

वडणगे, ता. करवीर.

--

Web Title: Five and a half lakh families will get bread

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.