जबरदस्तीने ट्रॅक्टर चोरणाऱ्या पाचजणांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2020 05:11 PM2020-10-28T17:11:55+5:302020-10-28T17:14:20+5:30
Crimenews, police, kolhapurnews मुरगूड हद्दीतील निढोरी पुलालगत काही अंतरावर चालकास मारहाण करून ट्रॅक्टर-ट्रॉली घेऊन पलायन केलेल्या पाच चोरट्यांना स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने मंगळवारी (दि.२७)अटक केली. त्यांच्याकडून पाच लाख रुपये किमतीचे ट्रॅक्टर व दोन ट्रॉली जप्त करण्यात आल्या. त्यांना बुधवारी न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
कोल्हापूर : मुरगूड हद्दीतील निढोरी पुलालगत काही अंतरावर चालकास मारहाण करून ट्रॅक्टर-ट्रॉली घेऊन पलायन केलेल्या पाच चोरट्यांना स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने मंगळवारी (दि.२७)अटक केली. त्यांच्याकडून पाच लाख रुपये किमतीचे ट्रॅक्टर व दोन ट्रॉली जप्त करण्यात आल्या. त्यांना बुधवारी न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
पोलिसांनी दिलेली माहीती अशी, बिद्री साखर कारखान्याकडे मार्च २०२० मध्ये ऊस तोडणीसाठी आलेला ट्रॅक्टरचालक उत्तरेश्वर माने (रा. बीड) यांना कागल रस्त्यावर निढोरीजवळ रस्त्यात अडवून मारहाण करण्यात आली. त्यात जबरदस्तीने पाचजणांनी त्याच्याकडील ट्रॅक्टर-ट्रॉली पळवून नेली होती.
या प्रकरणाचा तपास करताना खून, जबरी चोरी, दरोडा अशा गुन्ह्यांतील सराईत गुन्हेगार विजय रामचंद्र गौड व त्याचा मित्र रोहित नलगे (दोघे रा. कळंबा) यांनी हा ट्रॅक्टर अन्य सहकाऱ्यांच्या मदतीने चोरल्याची माहिती मिळाली. उदगाव ते शिरोळ या रस्त्यावर संशयित येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांना मिळाली होती.
त्यानुसार सापळा रचून राजाराम रावसाहेब माने (वय २९, रा. माने-कोळी वस्ती जत, सांगली), शंतनुकुमार दत्तात्रय खंदारे (४८, रा. बुधवार पेठ, मिरज,सांगली), विजय रामचंद्र गौड (३६, रा. निकम गल्ली, कळंबा, ता. करवीर), रोहित राजेंद्र नलगे (२७, रा. कळंबा), विजय महादेव पाटील (४०, रा. कळंबा) या पाच जणांना अटक केली. त्यांना बुधवारी न्यायालयात हजर केले असता ३० तारखेपर्यंत तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
ही कारवाई पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सत्यराज घुले, इकबाल महात, सचिन देसाई, सुरेश पाटील, असिफ कलायगार, रफिक आवळकर यांच्या पथकाने केली.
कळंबा कारागृहात शिजला कट..
विजय गौड यास यशवंत बँक दरोडा व मित्राच्या खूनप्रकरणात कळंबा कारागृहात बंदिस्त असताना सांगलीच्या आरोपींशी ओळख झाली. जामिनावर सुटल्यानंतर एखादा मोठा हात मारायचा, असा कट कारागृहात शिजला होता. त्यातूनच त्यांनी ट्रॅक्टर चोरल्याचे तपासात उघड झाले.