पाच बीअर बार, लाॅजिंगचे परवाने रद्द करण्याबाबत प्रस्ताव सादर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:19 AM2021-06-02T04:19:03+5:302021-06-02T04:19:03+5:30
कोल्हापूर : जिल्ह्यात संचारबंदी कालावधीत चोरून मद्य पुरविणाऱ्या परमिट रूम बीअर बार, लॉजिंगचे परवाने कायमचे रद्द करण्याबाबतचे पाच प्रस्ताव ...
कोल्हापूर : जिल्ह्यात संचारबंदी कालावधीत चोरून मद्य पुरविणाऱ्या परमिट रूम बीअर बार, लॉजिंगचे परवाने कायमचे रद्द करण्याबाबतचे पाच प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयात पाठविण्यात आल्याचे पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी सांगितले.
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात पुकारलेल्या संचारबंदी कालावधीत चोरून मद्य विक्री केल्याप्रकरणी काही परमिट रूम बीअर बार तसेच लॉजिंगवर पोलिसांनी छापे टाकले होते. तेथे चोरून मद्य विक्री सुरू असल्याचे निष्पन्न झाले होते. निर्बंधांचे उल्लंघन करणाऱ्या मद्य विक्रेत्यांवर पोलिसांनी कारवाई करीत अशा परमिट रूम बीअर बार, लाॅजिंगचे परवाने कायमचे रद्द करावेत, असा प्रस्ताव पोलीस अधीक्षक कार्यालयामार्फत जिल्हाधिकारी कार्यालयात सादर झाला आहे. त्यामध्ये कोल्हापूर शहर व करवीर तालुक्यातील प्रत्येकी एक, तर इचलकरंजी शहरातील तीन व्यावसायिकांचा समावेश आहे. जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत या पाचही प्रस्तावांवर लवकरच कार्यवाही होईल, असे अधीक्षक बलकवडे यांनी सांगितले.