पाच विभागांचे वाद्यवृंद तिरंग्यास देणार सलामी

By admin | Published: April 28, 2017 12:55 AM2017-04-28T00:55:20+5:302017-04-28T00:55:20+5:30

एल. ए. मुल्लाणी करणार नेतृत्व : देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या ३0३ फुटी उंच झेंड्याचा लोकार्पण सोहळा

The five-chamber orchestras triple-themed salute | पाच विभागांचे वाद्यवृंद तिरंग्यास देणार सलामी

पाच विभागांचे वाद्यवृंद तिरंग्यास देणार सलामी

Next

कोल्हापूर : पोलिस मुख्यालयात उभारण्यात आलेल्या ३०३ फुटी देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या उंच तिरंग्याचे लोकार्पण सोमवारी होत आहे. या सोहळ्यात कोल्हापूर परिक्षेत्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर ग्रामीण, पुणे ग्रामीण असे पाच विभागांचे वाद्यवृंद सलामी देणार आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण होणाऱ्या देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या उंच अशा तिरंग्याला कोल्हापूर परिक्षेत्रातील पाच विभागांतील वाद्यवृंद सलामी देणार आहेत. या वाद्यवृंद पथकाचे नेतृत्व सातारा पोलिस दलाचे वाद्यवृंद मास्तर सहायक फौजदार एल. ए. मुल्लाणी हे करणार आहेत.
मुल्लाणी यांना उत्कृष्ट सेवेबद्दल राष्ट्रपती पदक व पोलिस महासंचालकांचे सन्मानचिन्ह प्राप्त झालेले आहे. ते स्वत:ही कोरॅनेट व ट्रॅम्पेट वाजवतात. त्यांना बी. एम. जाधव (सांगली), एल. वायदंडे (पुणे ग्रामीण), एम. माने (सोलापूर ग्रामीण), श्रीकांत कोरवी (कोल्हापूर) हे वाद्यवृंद मास्तर साहाय्य करणार आहेत. या पथकात कोल्हापूर - १३, सातारा - १४, सांगली- १३, पुणे ग्रामीणचे १४, सोलापूर ग्रामीणचे ११ असे ६४ जणांचे वाद्यवृंद पथक चार धून वाजवून सलामी देणार आहेत. या पथकांमध्ये ट्रॅम्पेट, कोरॅनेट, इम्पोरियम, अ‍ॅल्टो सॅक्सोफोन, बेस ड्रम, साईड ड्रम, सिबॉल आदी वाद्यवृंद साहित्याचा समावेश आहे. या मानवंदनेची तयारी गुरुवारी सायंकाळी पोलिस कवायत मैदान येथे सुरू होती. त्यात पाच विभागांतील वाद्यवृंद पथकाचे कर्मचारी सहभागी झाले होते.



१२ मिनिटांत फडकविणार
महाकाय असा देशातील दुसऱ्या क्रमांकाचा तिरंगा एकूण १२ मिनिटांत फडकावला जाणार आहे. त्यात ध्वज वर चढत असताना स्लो मार्च अर्थात सलामी शास्त्राप्रमाणे प्रथम महाराष्ट्र गीत, प्रियदर्शनी गीत, सारे जहाँसे अच्छा आणि ध्वज पूर्ण स्थिरावल्यानंतर शेवटी ५२ सेकंदात राष्ट्रगीताची धून वाजविली जाणार आहे.


हे माझे भाग्य : मुल्लाणी
देशातील दुसऱ्या क्रमांकाचा उंच असलेल्या तिरंग्याला सलामी देण्याचे भाग्य मला लाभत आहे. कारण माझी निवृत्ती ३१ मे रोजी होत आहे. मी गेल्या ३९ वर्षांत वाद्यवृंद पथकात काम केले आहे. गेल्या ९ वर्षांपूर्वी मला सातारा पोलिस दलातील वाद्यवृंदाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली. सेवाकाळात मला राष्ट्रपती पदक, पोलिस महासंचालकाचे सन्मानचिन्ह, असे बहुमान मिळाले आहेत. त्यात सेवानिवृत्तीनजीक मला हा बहुमान मिळत आहे. त्यामुळे मला मिळालेल्या या संधीचा सार्थ अभिमान आहे, असे मत ‘लोकमत’शी बोलताना सहायक पोलिस उपनिरीक्षक एल. ए. मुल्लाणी यांनी व्यक्त केले.


देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या तिरंग्याला वाद्यवृंदाच्या माध्यमातून सलामी देण्याची संधी केवळ एक दिवसाने हुकली. कारण मी ३९ वर्षांच्या सेवेनंतर ३० एप्रिलला निवृत्त होत आहे तर तिरंगा लोकार्पण सोहळा १ मे रोजी होत आहे. मात्र, माझे सर्व सहकारी ही कसर भरून काढून उत्कृष्टरित्या ठरवून दिलेल्या गीतांची धून वाजवून सलामी देतील.
- रफिक पठाण, वाद्यवृंद पथक मास्तर, कोल्हापूर पोलिस दल

Web Title: The five-chamber orchestras triple-themed salute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.