पाच कॉलेजकन्या पुरवितात रुग्णांना नाष्टा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:23 AM2021-05-13T04:23:58+5:302021-05-13T04:23:58+5:30
कोल्हापूर : पिझ्झा, बर्गर, आईस्क्रीम खाणे ही तर आजच्या तरुणाईची खासियत आहे. त्याला श्रृती, अर्पिता, श्रेया, आचल, नेहा या ...
कोल्हापूर : पिझ्झा, बर्गर, आईस्क्रीम खाणे ही तर आजच्या तरुणाईची खासियत आहे. त्याला श्रृती, अर्पिता, श्रेया, आचल, नेहा या पाचही जणी अपवाद नाहीत. संकटाच्या काळात त्याला फाटा देऊन या पाचही जणी सीपीआर रुग्णालयातील कोरोनाग्रस्तांसह नातेवाईकांना घरच्यांनी दिलेल्या पाॅकेटमनीतून गेल्या दोन दिवसांपासून रोज नाष्टा तयार करून देत आहेत. ही मदत रुग्णांसह नातेवाईकांना लाखमोलाची ठरत आहे. कोरोनाच्या काळात नाती दुरावली जात असताना संसर्गाचा धोका पत्करूनही या मुली वयाच्या विशीमध्ये रुग्णांना दोन घास देण्यासाठी धडपडत आहेत, मानवसेवा यापेक्षा दुसरी काही असू शकत नाही.
कोरोनाची लस कुठे मिळते. त्याबाबतची चौकशी करण्यासाठी काही दिवसांपूर्वी दुधाळी हरिमंदिर परिसरातील समर्थ अपार्टमेंटमधील श्रृती चौगुले व अर्पिता राऊत या सीपीआर रुग्णालयात गेल्या होत्या. उत्सुकतेपोटी दोघींनी कोरोना वाॅर्डातील रुग्णांसह कुटुंबीयांची धावपळ आणि पोटाचे हाल पाहिले. आपण त्यांना मदत केली पाहिजे, अशी भावना त्यांच्या मनात निर्माण झाली. या दोघींनी श्रृतीची धाकटी बहीण श्रेया व तिची मैत्रीण आचल कट्यारे, आणि नेहा पाटील यांना याबाबत सांगितले. चर्चेनंतर सकस नाष्टा देण्याचा निर्णय घेतला. त्या पालकांशी बोलल्या मात्र, त्यांनी कोरोना संसर्गामुळे नकार दर्शविला. पाचहीजणी आपल्या निर्णयावर कायम राहिल्या. आम्हाला पिझा, आईस्क्रीमसाठी पैसे देऊ नका. मात्र, या मदतीसाठी आर्थिक मदत करा, असे सांगितले. अखेरीस पालकांनी या कामास मदत करण्यास होकार दिला. सर्वच रुग्ण व नातेवाईकांपर्यंत पोहोचण्याचा त्यांचा मानस आहे. सध्याची त्यांची मदत येथील रुग्ण व नातेवाईकांना कमी पडत आहे. त्यात आणखी दानशूर व्यक्तींनी दातृत्व दाखविल्यास नाष्टा व आहार पोहोचविता येईल.
चौकट
श्रृती अहमदाबाद येथील युआडीमधून डिझायनिंगमधील पदवी अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या वर्षात आहे. अर्पिता ही विवेकानंद कॉलेजमध्ये बीबीए करत आहे. श्रृतीची धाकटी बहीण श्रेया व तिची मैत्रिण आचल ही बारावीत आहेत. नेहा ही काॅम्प्युटर सायन्स करते.
फोटो : १२०५२०२१-कोल-श्रृती०१, ०२
आेळी : कोल्हापुरातील दुधाळी परिसरातील समर्थ अपार्टमेंटमधील याच युवतींनी सीपीआरमधील कोरोना रुग्णांसह नातेवाईकांना रोज सकस नाष्टा पोहोचविण्यास सुरुवात केली आहे.