पाच दिवसांनंतर जिल्हाधिकारी कार्यालय फुलले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2019 10:30 AM2019-10-31T10:30:14+5:302019-10-31T10:32:00+5:30
दिवाळीतील सलग सुट्ट्यांमुळे बुधवारी पाच दिवसांनंतर जिल्हाधिकारी कार्यालय सुरू झाले. प्रलंबित कामासाठी नागरिकांची गर्दी झाल्याने जिल्हाधिकारी कार्यालय फुलले होते. सर्वच विभागांत ही स्थिती होती.
कोल्हापूर : दिवाळीतील सलग सुट्ट्यांमुळे बुधवारी पाच दिवसांनंतर जिल्हाधिकारी कार्यालय सुरू झाले. प्रलंबित कामासाठी नागरिकांची गर्दी झाल्याने जिल्हाधिकारी कार्यालय फुलले होते. सर्वच विभागांत ही स्थिती होती.
मागील आठवड्यामध्ये विधानसभेच्या निवडणुकीच्या कामात जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी व्यस्त होते. येथील रात्री उशिरापर्यंत कामकाज सुरू राहिले. निवडणुकीनंतर दिवाळीनिमित्त कार्यालय सलग पाच दिवस बंद राहिले.
यामध्ये जिल्हाधिकारी यांनी शुक्रवारी स्थानिक सुट्टी जाहीर केली, तसेच चौथ्या शनिवारी, रविवारी साप्ताहिक सुट्टी, तर सोमवारी पाडवा आणि मंगळवारी भाऊबीज यामुळे सलग पाच दिवस जिल्हाधिकारी कार्यालय बंद राहिले. सलग सुट्ट्यांनंतर बुधवारी कार्यालय सुरू झाल्याने नागरिकांनी कार्यालयामध्ये गर्दी केली होती. निवडणूक आणि सलग सुट्ट्या यांमुळे प्रलंबित राहिलेली कामे पूर्ण करण्यातच कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा दिवस गेला.