भोगावती कारखान्यातील पाच कर्मचारी निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:18 AM2021-07-20T04:18:59+5:302021-07-20T04:18:59+5:30
भोगावती : परिते (ता. करवीर) येथील भोगावती साखर कारखान्याच्या स्क्रॅप बारदानमधून ताडपत्र्या चोरून नेल्याप्रकरणी पाच कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले ...
भोगावती : परिते (ता. करवीर) येथील भोगावती साखर कारखान्याच्या स्क्रॅप बारदानमधून ताडपत्र्या चोरून नेल्याप्रकरणी पाच कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे तर बारदान खरेदी करणाऱ्या ठेकेदारांवर एक लाखाचा दंड बसविण्यात आला आहे. सोमवारी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत यावर चर्चा होऊन ही कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी, कारखान्याकडून जुन्या बारदानाची लिलाव पध्दतीने विक्री करण्यात आली होती, हा लिलाव अक्षता एंटरप्राईजचे मालक सुभाष देसाई मडिलगे (ता. भुदरगड) यांनी घेतला आहे. शुक्रवारी दुपारी देसाई यांचा टेम्पो स्कॅप भरुन कारखान्यातून बाहेर पडला व परिते-गारगोटी फाट्याजवळ या टेम्पोतून काही कर्मचारी ताडपत्री उतरताना दिसले. हे पाहणाऱ्या एका जागृत सभासदाने कारखान्याचे सुरक्षा अधिकारी विठ्ठल बरगे यांना सांगितले. त्यांनी हा टेम्पो पुन्हा कारखान्यामध्ये परत आणला.
ही घटना स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष जनार्दन पाटील, रावसो डोंगळे यांना समजली. त्यांनी कारखान्यात जावून संबंधितांवर कारवाईची मागणी केली. बारदान भरताना उपस्थित असणारे कर्मचारी, गेटवरुन टेम्पो सोडणारे वाॅचमन यांची चौकशी करून ठेकेदार देसाईवर करवीर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज देण्यात आला तसेच एक लाख रुपये दंडही ठोठावण्यात आला आहे. बारदान भरण्यासाठी जीप वापरली होती ती कारखान्याने आपल्या ताब्यात ठेवून घेतली आहे.
बारदान स्क्रॅप भरून देण्याची जबाबदारी कुणाची होती, यावर देखरेख ठेवणारे वॉचमन कोण, असे असताना नवी ताडपत्री टेम्पोत कोणी भरली. कामावर असताना गेटबाहेर जाऊन तीन कर्मचाऱ्यांनी फाट्यावर जावून ताडपत्र्या उतरवून घेतल्या, हे नियमबाह्य व संशयास्पद असल्याच्या कारणावरून या पाच कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.