हत्तीच्या पाठलागातून पाच शेतकरी बचावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2018 12:51 AM2018-11-12T00:51:42+5:302018-11-12T00:51:47+5:30

बाजारभोगाव : जांभळी खोऱ्यात शुक्रवारी रात्री पुनरागमन केलेल्या टस्करने शनिवारी पहाटे गोठणेच्या जंगलातून मानवाडच्या दिशेने कूच केले. आढाववाडीतील शिवारात ...

Five farmers escaped from the harti chase | हत्तीच्या पाठलागातून पाच शेतकरी बचावले

हत्तीच्या पाठलागातून पाच शेतकरी बचावले

Next

बाजारभोगाव : जांभळी खोऱ्यात शुक्रवारी रात्री पुनरागमन केलेल्या टस्करने शनिवारी पहाटे गोठणेच्या जंगलातून मानवाडच्या दिशेने कूच केले. आढाववाडीतील शिवारात राखणीसाठी असलेल्या पाच शेतकºयांवर हल्ल्याचा प्रयत्न केला. टस्करच्या पाठलागातून हे पाचही शेतकरी सुरक्षितरीत्या वाचले. टस्कर सोंडेने हलवून मचाण पाडत असताना उडी मारुन पळ काढताना आठ ते दहा फूट उंचीच्या बांधावरून पडल्याने पांडुरंग बारकू जाधव जखमी झाले.
घटनास्थळी प्राप्त झालेल्या माहितीनुसार, गव्यांपासून पिकांचे रक्षण करण्यासाठी आढाववाडीतील शेतकरी रात्री आपापल्या शेतातील मचाणावर मुक्कामाला असतात. सध्या थंडी पडू लागल्यामुळे आसपासच्या मचाणावरील शेतकरी परसा (शेकोटी) करून एकत्र गप्पा मारत बसतात. शनिवारी रात्रीही सत्तू बाळकू पाटील, पांडुरंग ज्ञानू जाधव, बाळकू धोंडू पाटील, चिमाजी लक्ष्मण पाटील, रोंगू बापू खापणे हे आढाववाडीच्या शिवारातील ‘भुत्या’ नावाच्या शिवारात आपापल्या मचाणावर राखणीसाठी गेले होते. पहाटे बोचºया थंडीमुळे ते सत्तू पाटील यांच्या मचाणाच्या बाजूला परसा पेटवून शेकत बसले होते, तर मचाणावर सत्तू पाटील बसले होते. त्यावेळी शेजारुन त्यांना ऊस मोडण्याचा कडाकड असा आवाज ऐकू आला. पाटील यांनी आवाजाच्या दिशेने प्रकाशझोत सोडताच त्यांना मचाणाच्या दिशेने चाल करून येणारा महाकाय हत्ती दिसला. त्यांनी खाली शेकत बसलेल्यांना सावध करताच ते पळाले, तर पाटील हे मचाणावरून उतरेपर्यंत हत्ती समोर उभा राहिला. मात्र, प्रसंगावधान राखत त्यांनी धूम ठोकली. हत्तीने त्यांचा सुमारे दोनशे मीटरपर्यंत पाठलाग केला.
यानंतर टस्करने शेजारच्या पांडुरंग जाधव यांच्या मचाणाकडे कूच केले. त्यांनीही मचाणावरून उडी मारुन पळ काढला. टस्करने त्यांचाही पाठलाग केल्याने त्यांनी मोठ्या बांधावरून उडी घेतली. यात त्यांच्या गुडघ्याला दुखापत झाली आहे. दरम्यान, हत्तीने सत्तू पाटील व पांडुरंग जाधव या दोघांच्याही मचाणावरील बिछाने दूरवर भिरकावले.
पहाटे साडेसहाच्या सुमारास त्याने थठीच्या जंगलाशेजारील गणपती रामू पाटील, आनंदा बापू पाटील, धोंडिराम चंद्राप्पा पाटील यांच्या ऊसपिकाचे नुकसान केले.
वनमजूर हिंदुराव पाटील, शामराव जाधव, नाथा कांबळे, आकाराम पाटील, शंकर पोवार यांनी रविवारी सकाळी नुकसानीचे पंचनामे केले. टस्कर चाल करू लागल्याने संपूर्ण जांभळी खोरा त्याच्या दहशतीखाली आहे. त्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.
‘काळ आला...
पण वेळ नाही’
टस्कर काळ बनून माझ्यासमोर उभा ठाकला होता, पण प्रसंगावधान राखत पळ काढला. काळ आला पण माझी वेळ आली नव्हती, अशी प्रतिक्रिया जखमी पांडुरंग जाधव यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केली.

Web Title: Five farmers escaped from the harti chase

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.