मुंबई-कोल्हापूर एक्सप्रेसमध्ये विसरलेले साडेपाच लाख रुपये रेल्वे पोलिसांच्या दक्षतेमुळे परत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2017 06:26 PM2017-12-08T18:26:31+5:302017-12-08T18:35:26+5:30
मुंबई-कोल्हापूर या महालक्ष्मी एक्सप्रेस रेल्वेमध्ये शुक्रवारी पहाटे हातकणंगले रेल्वेमध्ये मिरज रेल्वे पोलिसांना बेवारस बॅग सापडली. या बॅगेत साडेपाच लाख रुपये रोख, चांदीची जपमाळ आणि काही पुस्तके होती.
कोल्हापूर : मुंबई-कोल्हापूर या महालक्ष्मी एक्सप्रेस रेल्वेमध्ये शुक्रवारी पहाटे हातकणंगले रेल्वेमध्ये मिरज रेल्वे पोलिसांना बेवारस बॅग सापडली. या बॅगेत साडेपाच लाख रुपये रोख, चांदीची जपमाळ आणि काही पुस्तके होती.
या बॅगेत मिळालेल्या पावती बुकावरील मोबाईल नंबरवरून ही बॅग जबलपूर (मध्यप्रदेश) येथील सुरेंद्रकुमार जैन (वय ४८) यांची असल्याचे लक्षात आले. रेल्वे पोलिसांच्या दक्षतेमुळे साडेपाच लाख रुपयांची रोख असलेली बॅग जैन यांना सुखरूप मिळाली, याबद्दल पोलीस कॉन्स्टेबल विशाल माने यांचे कौतुक होत आहे.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, मध्यप्रदेशातील जबलपूर येथील श्री वणी दिगंबर जैन गुरुकुलमध्ये सुरेंद्रकुमार जैन हे राहतात. गुरुवारी (दि. ७) रात्री ते मुंबई -कोल्हापूर या महालक्ष्मी एक्सप्रेस या रेल्वेत बसले. ते कोल्हापूर जिल्ह्यातील कुंथुगिरी (ता. हातकणंगले) येथील मठात जाण्यासाठी शुक्रवारी पहाटे हातकणंगले रेल्वेस्थानकावर सोबतचे साहित्य घेऊन उतरले.
यावेळी त्यांच्याकडील लाल रंगाची हँडबॅग मात्र रेल्वेतील आसनावर तशीच राहिली. काही वेळाने रेल्वेतील पोलीस कॉन्स्टेबल गार्ड विशाल माने हे आले. त्यांना प्रवाशाची बॅग विसरल्याचे लक्षात आले. त्यानंतर माने यांनी याची माहिती मिरजेतील वरिष्ठ रेल्वे पोलीस अधिकारी ए. के. मिश्रा यांना दिली.
मिश्रा यांनी कोल्हापुरात येऊन बॅगची तपासणी केली. बॅगेत साडेपाच लाख रुपये, ३० ग्रॅम वजनाची चांदीची जपमाळ, काही पुस्तके, ट्रस्टचे पावती बुक आणि डायरी होती. पोलिसांनी ट्रस्टच्या पावती बुकातील नंबरवरून मुंबईतील कार्यालयात फोन लावला. यानंतर मुंबईतील कार्यालयाने सुरेंद्रकुमार जैन यांना बॅग विसरल्याचे कळविले.
त्यानुसार ते सकाळी सहकाऱ्यांसह कोल्हापूर रेल्वेस्थानकात पोहोचले. याठिकाणी ओळख पटविल्यानंतर रेल्वे पोलिसांनी जैन यांच्याकडे बॅग सोपविली. यावेळी जैन यांचा पोलिसांनी जबाब घेतला. आश्रमाच्या कामासाठी आणलेली रक्कम सुखरूपपणे मिळाल्याने जैन यांनी रेल्वे पोलिसांचे आभार मानले.
विशाल मानेंचा प्रामाणिकपणा...
मूळ सोलापूर येथील असलेले विशाल माने हे रेल्वे पोलीस कॉन्स्टेबल महालक्ष्मी एक्सप्रेसमध्ये गार्ड होते. शुक्रवारी पहाटे ते रेल्वेच्या एस-११ या बोगीत गेले. त्या ठिकाणी बहुतांश प्रवासी झोपेत होते. तेथील एका रिकाम्या आसनावर त्यांना लाल रंगाची बेवारस हँडबॅग निदर्शनास आली.
त्यांनी आसपासच्या प्रवाशांकडे त्याबद्दल विचारपूस केली; पण ती आपली नसल्याचे प्रवाशांनी सांगितले. हा प्रकार त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविला. विशाल माने यांच्यामुळेच जैन यांना साडेपाच लाख रुपये सुखरूपपणेमिळाले. याबद्दल माने यांचे अभिनंदन होत आहे.