चोरट्यांनी धूमस्टाईलने पाच लाखांची चांदी केली लंपास, हुपरीत घडली घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2022 04:53 PM2022-01-28T16:53:44+5:302022-01-28T16:54:14+5:30
बोलण्याचा बहाणा करून पाच लाख रुपयाची चांदी लंपास केली.
हुपरी : चोरट्यांनी धूमस्टाईलने युवकाजवळील पाच लाखांची चांदी लंपास केल्याची घटना समोर आली आहे. रेंदाळ (ता. हातकणंगले) येथील श्री बिरदेव मंदिराच्या मागील बाजूस असणाऱ्या माळरानावर हा प्रकार घडला. संबंधित तरुण रस्त्यांवरून स्कुटर वरून चांदी घेवुन जात असताना चोरट्यांनी चांदी लंपास केली. याप्रकारानंतर गावात एकच खळबळ उडाली.
याबाबतची माहिती अशी की, येथील चांदी उद्योजक निरंजन शेटे यांच्या चांदी कारखान्यात श्रीधर सदाशिव मोरे (वय ४५ रा. दत्त मंदीरजवळ, रेंदाळ) हा कामास आहे. काल, गुरुवारी (ता.२७) सायंकाळच्या सुमारास बिरदेव मंदीराच्या पाठीमागे असलेल्या माळरानावरील रस्त्यावरून श्रीधर मोरे हा पिशवी मधुन कच्ची चांदी घेवुन जात होता. यावेळी त्याच्या समोरून दोघे दुचाकीस्वार आले. त्यांनी मोरे यांच्याशी बोलण्याचा बहाणा करून त्याला लुटून पाच लाख रुपयाची चांदी लंपास केली.
हुपरी पोलिस या दोन दुचाकीस्वारांचा शोध घेत आहेत. या घटनेमुळे परिसरात घबराट पसरली आहे. माहितगार असणाऱ्याकडूनच ही चोरी झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. याप्रकरणी अधिक तपास सपोनि पंकज गिरी करत आहेत.