बहिणींच्या पाच लाख राख्या टपाल सेवेने भावांच्या हाती, टपालपेटी फुल्ल : ‘राखी मेल’ची खास सोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2018 12:17 AM2018-08-25T00:17:31+5:302018-08-25T00:23:37+5:30
रक्षाबंधन हे बहीण-भावाचे प्रेमाचे प्रतीक आहे. बहीण भावाला रक्षाबंधनाच्या निमित्ताने राखी बांधून आजही आधुनिकतेच्या युगात ही वीण घट्ट बांधून संस्कृती टिकवत आहे. अशा या नात्याची नाळ मजबूत तसेच बहिणींच्या राख्या
शेखर धोंगडे ।
कोल्हापूर : रक्षाबंधन हे बहीण-भावाचे प्रेमाचे प्रतीक आहे. बहीण भावाला रक्षाबंधनाच्या निमित्ताने राखी बांधून आजही आधुनिकतेच्या युगात ही वीण घट्ट बांधून संस्कृती टिकवत आहे. अशा या नात्याची नाळ मजबूत तसेच बहिणींच्या राख्या भावापर्यंत पोहोच करण्यासाठी रेल्वे पोस्ट कार्यालयदेखील तितक्यात तत्परतेने स्वतंत्र व्यवस्था करून कर्तव्य पार पाडत आहे. यंदाच्यावर्षी 10 आॅगस्ट ते २४ आॅगस्ट या १४ दिवसांच्या कालावधीत सुमारे पाच लाख राख्या भावांपर्यंत पोहोचल्या आहेत.
दरवर्षी स्पीड पोस्ट, रजिस्टर व साध्या टपाल सेवेतून येणाऱ्या राख्यांचे वितरण व वाटप रेल्वे डाक सेवेमार्फत केले जाते. मात्र, आधुनिक युगाच्या दुनियेत नव्या पर्यायामुळे राखी पाठविणाºयांच्या संख्येत गेल्या दहा वर्षांत मोठी घट झाल्याचे पोस्ट विभागातर्फे सांगण्यात आले. केवळ सोशल मिडीया, इंटरनेट, व्हाट्सअप, फेसबूक, व्हिडीओकॉलच्या माध्यमातून आता हा बहिण भावांचा रक्षाबंधच उत्सव थेट साजरा केला जात आहे. यालाही अधिकाधिक प्रतिसाद मिळत आहे. दूरगावी असणाºयांना केवळ हाच पर्याय एक पर्याय आहे.
बहिणी लहान असो की मोठी, रक्षाबंधनला मायेचा धागा ती बांधते; परंतु आपल्या परगावी असलेल्या भावाला राखी पाठविण्यासाठी कोल्हापूर, सांगली, मिरज, कुडाळ, रत्नागिरी, सातारा, पणजी येथील टपाल कार्यालयात सध्या मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. या काळात टपालपेट्याही राख्यांनी फुल्ल होत आहेत. या राख्या भाऊरायापर्यंत वेळेवर पोहोचाव्यात, यासाठी रेल विभागाचे विभागीय कार्यालय व त्यांच्या अंतर्गत येणारे सातही विभागातील पोस्टमन सुटीच्या दिवशीही कामावर येऊन राख्यांची पाकिटं घरोघरी पोहोच करणार आहेत.
बहिण भावाचं नातं दृढ करणारा रक्षाबंधन सण अवघ्या दोन दिवसांवर येवून ठेपला आहे. यानिमित्त बाजारपेठ सजली असून नवनवीन गिफ्ट आर्टिकल्सने दुकानांचा दर्शनी भाग सजला आहे. यातच यंदा रविवारी हा सण आल्यामुळे भगिनींमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
अशी आहे आकडेवारी --१० आॅगस्टपासून आजपर्यंत
कोल्हापूर : ९८ हजार, मिरज : ५४ हजार, सातारा : १ लाख ३ हजार, रत्नागिरी : ५१ हजार, कुडाळ : २८ हजार, पणजी : ५६ हजार. अशा एकूण ३ लाख ९० हजार राख्या भावांच्या हाती पोहोचल्या आहेत. रविवारपर्यंत हा आकडा सुमारे पाच लाख ओलांडेल, असा विश्वास रेल्वे पोस्ट विभागातर्फे व्यक्त केला आहे.
वास्तविक पाहता २००६ ते २०१० पर्यंत राख्या प्राप्त होण्याची आकडेवारी ही १० ते १२ लाख इतकी होती, पण कालांतराने यात घट होत असल्याचे दिसत आहे.
संख्या कमी होतेय !
आधुनिकतेच्या दुनियेत मात्र दरवर्षीपेक्षा ही आकडेवारी आता कमी होऊ लागल्याचे चित्र आहे. व्हॉट्सअॅप, मेसेज, इ-मेल सारख्या आधुनिक युगामुळे थेट शुभेच्छा देण्यातच व उत्सव साजरा केल्याचे समाधान मानले जात आहे. हे या आकडेवारीवरून स्पष्ट होते आहे.
सन :२०१७ - ५ लाख ६८ हजार
सन :२०१६ - ६ लाख
सन :२०१५ - ७ लाख
सन :२०१४ - ८ लाख १० हजार
कर्नाटक : २५% अन्य राज्ये: १० %, तर उर्वरित या राख्या महाराष्ट्रातून येत असतात.
पोस्टमन म्हणतात...
राखी शक्य होईल तितक्या लवकर देण्याचा आमच्या सर्व सहकाºयांचा प्रयत्न असतो. अनेकदा एखादी राखीचा लिफाफा फाटला तर तो पुन्हा व्यवस्थित किंवा नव्या लिफाफ्यात ती राखी पोहोचविण्याची जबाबदारी पार पाडून हे भावनिक नाते आम्हीही जपतो, अनेकदा दिवाळी, रक्षाबंधन, गुडीपाडवा सणाला सुट्टी न घेता तत्पर सेवा देण्याचा इतरांचा आनंद द्विगुणीत करण्याचा आमचा प्रयत्न असतो.
१३ अंकी क्रमांक --स्पीट पोस्टने पाठविण्यात येणारी राखी ही नेमकी कोणत्या ठिकाणी आहे हे १३ क्रमांकाच्या कोड अंकावर भावाला किंवा बहिणीला समजू शकते. राखी दिल्याची व मिळाल्याचा मेसेजदेखील भाऊ व बहिणीला यातून मिळतो.
भावनिकता : एखाद्या राखीचा लिफाफा जर खराब झाला असेल किंवा राखीची दुरवस्था झाली असेल तर ती राखी पुन्हा नव्या लिफाफ्यात नव्यासारखी देऊन त्यातील बहिणीची माया जपण्याचा प्रयत्नदेखील येथे करण्यात येतो, असे एका कर्मचाºयाने सांगितले.
राज्यभर नव्हे, तर देशभरातून रेल्वे टपाल सेवेकडे राख्या तसेच सण, उत्सवानिमित्ताने भेटवस्तू, ग्रिटिंग येत असतात. त्या सर्वांना काळजीने पोहोचविण्याची आमची जबाबदारी असल्याने या काळात स्वतंत्र विभाग नेमून त्याची विभागणी व वितरण केले जाते. आजही टपाल सेवेवर लोकांचा विश्वास असून यासाठी सर्व अधिकारी, कर्मचारी, पोस्टमन तत्परतेने सेवा देण्यासाठी कटिबद्ध असतात. सर्वांच्या सहकार्यातूनच सण, उत्सवाला आमचाही हातभार लागतो.
नंदकुमार टी. कुरळपकर, अधीक्षक रेल डाक सेवा, बी. एम. डिव्हिजन मिरज
साधारण दहा ते बारा वर्षापूर्वी राखी अजून का आली नाही म्हणून विचारणा या तक्रार व्हायची, नातेवाईकांचा रुसवा-फुगवा दिसायचा परंतु आता तसे घडत नाही. गेल्या कित्येक वर्षात राखी का आली नाही म्हणून विचारणा किंवा तक्रार तशा दिसतच नाही. यातून राखी पाठविण्याचे प्रमाण कमी झाल्याचे जाणवते.
: विनोद उत्तमराव कुलकर्णी, सहाय्यक अधिक्षक डाकघर, बी. एम. मिरज.