कोल्हापुरात जिल्हा परिषदेसाठी शिवसेनेचे पाच सदस्य काँग्रेसला पाठिंबा देणार?
By admin | Published: March 20, 2017 02:08 PM2017-03-20T14:08:45+5:302017-03-20T14:08:45+5:30
चर्चेचे गुऱ्हाळ सुरुच : सतेज पाटील, मुश्रीफ यांचा प्रकाश आवाडेंकडे ठिय्या
आॅनलाईन लोकमत
कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी सुरु असलेली राजकीय पक्षांचा चढाओढ सोमवारी दुपारपर्र्यत कायम आहे. सत्तास्थापनेमध्ये शिवसेनाच किंगमेकर ठरणार असल्यामुळे त्यांच्या भूमिकेला महत्व आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार शिवसेनेच्या पाच सदस्यांचा गट काँग्रेसला पाठिंबा देण्याची शक्यता व्यक्त होत आहे. यासंदर्भात शिवसेनेने आज सायंकाळी पाच वाजता पत्रकार परिषद बोलावली आहे.
दरम्यान, भाजता आणि काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षाकडून शिवसेनेला गोंजारणेही सुरुच आहे. मात्र, शिवसेनेचे चर्चेचे गुऱ्हाळ अद्यापही संपले नाही, तर दुसरीकडे माजी आमदार प्रकाश आवाडे यांची मनधरणी करण्यासाठी आमदार सतेज पाटील आणि आमदार हसन मुश्रीफ हे दोघेही दिग्गज इचलकरंजीत आवाडे यांच्या निवासस्थानी ठिय्या मांडून बसले आहेत.
भारतीय जनता पक्ष, जनसुराज्य शक्ती आणि ताराराणी आघाडी विरुध्द दोन्ही कॉँग्रेसदरम्यान जिल्हा परिषदेच्या सत्तेसाठीचा संघर्ष २३ फेब्रुवारीपासून सुरू आहे. शिवसेनेला १० जागा मिळाल्यामुळे त्यांच्या भूमिकेला कमालीचे महत्त्व आले आहे. काँग्रेसकडून माजी आमदार पी. एन. पाटील यांचा मुलगा राहुल आणि भाजताकडून माजी आमदार महादेवराव महाडिक यांची सून शौमिका यांच्यात लढत होण्याची चिन्हे आहेत. उद्या दुपारी दोन वाजता त्यासाठी हात वर करुन जिल्हा परिषदेत मतदान होणार आहे.
सोमवारी सकाळी शहरातील एका हॉटेलमध्ये आमदार सत्यजित पाटील, आमदार डॉ. सुजित मिणचेकर, आमदार उल्हास पाटील या तीन आमदारांसह शिवसेनेचे संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, सहसंपर्कप्रमुख प्रा. संजय मंडलिक, नेते संजयबाबा घाटगे, जिल्हा प्रमुख संजय पवार, विजय देवण आणि मुरलीधर जाधव आदी नेत्यांमध्ये चर्चेचे गुऱ्हाळ सुरुच आहे.
शिवसेनेची आज सायंकाळी पाच वाजता पत्रकार परिषद
शिवसेनेचे चर्चेच्या फेऱ्या सुरु असून तीन आमदार, तीन जिल्हा प्रमुखांसह संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर आणि इतर नेते निर्णय आज सायंकाळपर्यत घेणार आहेत. आमदार चंद्रदीप नरके यांच्याशी चर्चा झाल्यानंतर शिवसेनेचा निर्णय नक्की होणार आहे. त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर सायंकाळी पाच वाजता शिवसेना पत्रकार परिषदेत पक्षाचा निर्णय जाहीर करणार आहेत.
प्रकाश आवाडे यांची मनधरणी सुरु
माजी आमदार प्रकाश आवाडे यांनी राहुल पाटील यांच्यासारख्या नवख्या उमेदवाराला अध्यक्षपद देऊन रिस्क घेण्यापेक्षा माजी उपाध्यक्ष बंडा माने यांच्यासारख्या सर्वसमावेशक उमेदवाराला अध्यक्ष करावे, ही भूमिका घेतल्यामुळे आमदार सतेज पाटील आणि आमदार हसन मुश्रीफ सोमवारी सकाळपासूनच इचलकरंजीत प्रकाश आवाडे यांच्या निवासस्थानी ठिय्या मांडून बसले आहेत. आवाडे यांनी पी.एन.पाटील यांनी आपल्या मुलाचा हट्ट सोडावा, अशी मागणी केली आहे. कोणीतरी उमेदवार ठरविणार आणि आम्ही होत वर करणार, ते दिवस आता गेले आहेत. आमचे दोन आणि राजू शेट्टी यांचे दोन अशा चार सदस्यांचा निर्णय एकत्र घेणार आहे, तशी चर्चा शेट्टी यांच्याशी झाल्याचे आवाडे यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, आवाडे यांची मागणी काहीही असली तरी काँग्रेस उमेदवार बदलणार नाही, अशी भूमिका आमदार हसन मुश्रीफ आणि आमदार सतेज पाटील यांनी घेतल्यामुळे तिढा वाढला आहे.