बालकल्याण संकुलामधून पाच अल्पवयीन मुलांचे पलायन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:19 AM2021-06-04T04:19:53+5:302021-06-04T04:19:53+5:30
कोल्हापूर : येथील मंगळवार पेठेतील बालकल्याण संकुलातून (डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन निरीक्षणगृह) गुरुवारी पहाटेच्या सुमारास पाच अल्पवयीन मुुलांनी पलायन केल्याची ...
कोल्हापूर : येथील मंगळवार पेठेतील बालकल्याण संकुलातून (डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन निरीक्षणगृह) गुरुवारी पहाटेच्या सुमारास पाच अल्पवयीन मुुलांनी पलायन केल्याची घटना घडली. ही मुले गुन्हेगारी स्वरूपातील नसून बेवारस म्हणून दाखल करण्यात आली होती. याबाबत बालगृहाचे काळजीवाहक संदीप गजानन कोकरे यांनी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
गेल्या महिन्यात चाईल्ड लाईन या संस्थेकडून शहरात फिरस्ता असणारी चार अल्पवयीन मुले बालकल्याण संकुलच्या सुधारगृहात दाखल केली होती. या चौघांनी व तेथे गेली तीन वर्षे असणारा एक मुलगा अशा पाच जणांनी गुरुवारी पहाटेच्या सुमारास बाथरूमला जाण्याचे निमित्त काढून बाहेर पडली. सुधारगृहाच्या मुख्य गेटवरून चढून त्यांनी पलायन केले. सकाळी हा प्रकार प्रशासनाच्या लक्षात आला. पलायन केलेल्या मुलापैकी तीन मुले १५ वर्षे, एक १४ तर, एक १८ वर्षे वयोगटातील होती. ही मुले बालगुन्हेगार नाहीत. त्यांनी पलायन केल्याने बालगृहाचे काळजीवाहक संदीप कोकरे यांनी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. पुढील तपास हे. कॉ. राजाराम पाटील करत आहेत.
कोट...
ही मुले फिरस्ता होती. महिन्यापूर्वी चाईल्ड लाईन संस्थेतर्फे सुधारगृहात दाखल केली होती. सुधारगृहात त्यांचे एका ठिकाणी मन रमत नसल्याने त्यांनी पलायन केले असावे. त्याबाबत रीतसर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. - पद्जा तिवले, मानद सचीव, बालकल्याण संकुल, कोल्हापूर