मुरगूडमधील गाळेधारकांचे पाच महिन्यांचे भाडे माफ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:28 AM2021-08-14T04:28:04+5:302021-08-14T04:28:04+5:30
मुरगूड नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष राजेखान जमादार होते. आयत्या वेळेच्या विषयामध्ये माजी उपनगराध्यक्ष रेखाताई मांगले यांनी गाळेधारकांचे भाडे ...
मुरगूड नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष राजेखान जमादार होते. आयत्या वेळेच्या विषयामध्ये माजी उपनगराध्यक्ष रेखाताई मांगले यांनी गाळेधारकांचे भाडे व पूरग्रस्त नागरिकांचा घरफाळा माफ करावी, अशी मागणी केली. यावर नगराध्यक्ष जमादार यांनी याबाबत व्यापाऱ्यांची बैठक झाली असून, त्यांना हातभार लावण्यासाठी भाडे कपात करण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले. दरम्यान, जी एम पोर्टलवरून घेतलेले फायरबॉल आणि झाडे तोडण्याचे यंत्र हे महाग लागले असून, आता जी एम पोर्टलवरून कोणतेच साहित्य खरेदी करू नका, अशी आग्रही मागणी करीत जयसिंग भोसले यांनी सभागृहात कमी किंमतीत फायरबॉल दाखविले, तर नामदेवराव मेंडके यांनी अग्निशमन विभागासाठी आणलेली नवीन गाडी मोठी आहे ती शहरातील प्रत्येक गल्लीत जाणार नाही. आणावयाच्या अगोदर सभागृहाला माहिती द्यायला पाहिजे होती असे मत मांडल्यानंतर नगराध्यक्ष जमादार यांनी सभागृहात ठराव मांडून चर्चा होऊन ही गाडी खरेदी केल्याचे सांगितले. या चर्चेदरम्यान जमादार आणि मेंडके या दोघांचाही आवाज वाढल्याने सभागृहातील वातावरण धीरगंभीर बनले होते.
याशिवाय विषयपत्रिकेवरील विविध अकरा विषयांवर सविस्तर चर्चा झाली. यामध्ये शहरातील विविध गल्लींना जातिवाचक नावे होती ती बदलून थोर समाजसुधारकांची नावे देण्याचा निर्णय झाला. तसेच केंद्र राज्य शासनाच्या विविध विकास योजना अंतर्गत शहरात होणारी भुयारी गटर योजनेसाठी अनुभवी तांत्रिक सल्लागार निवडण्यावर चर्चा झाली. वैशिष्ट्ये पूर्ण योजनेतून मिळालेल्या दहा लाख रुपये निधीतून महादेव गल्लीमधील बागेमध्ये लहान मुलांसाठी विविध खेळणी टेंडर काढून खरेदी करण्याचा निर्णय घेतला. तसेच विविध विकासकामांना मुदतवाढ देण्याचा निर्णय ही घेण्यात आला.
सभेत मुख्याधिकारी हेमंत निकम, उपनगराध्यक्षा रंजना मंडलिक, नामदेव मेंडके, जयसिंग भोसले, सुहास खराडे, संदीप कलकूटकी, राहुल वंडकर, विशाल सूर्यवंशी, मारुती कांबळे, रवी परीट, बाजीराव गोधडे, रेखाताई मांगले, सुप्रिया भाट, अनुराधा राऊत, रूपाली सनगर, प्रतिभा सूर्यवंशी, वर्षाराणी मेंडके, संगीता चौगले, आदींनी चर्चेत सहभाग घेतला. स्नेहल पाटील यांनी अहवाल वाचन केले.
चौकट -
पत्रकार भवनसाठी जागा
शहरातील सर्व समाजासाठी पालिकेने सभागृह दिले आहे. शहरातील सर्व पत्रकारांसाठी सुसज्ज कार्यालय तयार करण्यासाठी रिकामी जागा मिळावी अशी वारंवार मागणी करून ही जागा का मिळत नाही अशी खंत पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल पाटील यांनी विचारताच तत्काळ एस.टी.स्टँड शेजारील दुकान गाळ्यांच्या वरील रिकामी जागा पत्रकार भवनसाठी देण्याचा निर्णय सर्व सभेने एकमताने घेतला.