आणखी पाच जणांना अटक मटका व्यवसायात भागीदारी
By Admin | Published: May 30, 2014 01:40 AM2014-05-30T01:40:11+5:302014-05-30T01:58:51+5:30
मटक्याचे रॅकेट उघडकीस
कोल्हापूर : मटका व जुगारात भागीदारी करणार्या आणखी पाच बुकी एजंटांना आज, गुरुवारी करवीर पोलिसांनी अटक केली. संशयित दीपक अरविंद देसाई (वय २६, रा. दत्त नरसिंह कॉलनी, लक्षतीर्थ वसाहत), अमोल प्रकाश शिंदे (२६), गणेश ऊर्फ अभिजित चंद्रकांत पाटील (३०, दोघे रा. डांगे गल्ली, जुना बुधवार पेठ), सचिन ऊर्फ पिंटू शंकर कुंभार (३२, रा. कोतोली, ता. पन्हाळा) अशी त्यांची नावे आहेत. करवीर पोलिसांनी सांगरुळ, कोल्हापूर शहर ते मुंबईपर्यंतचे मटक्याचे रॅकेट उघडकीस आणल्याने शहरात अवैध व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहे. सांगरुळ (ता. करवीर) येथे मोबाईल मटका घेणार्या दोघांना करवीर पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर मुंबईतील मटका मालकांच्याही मुसक्या आवळल्या होत्या. जालंदर शिंदे याच्याकडे एजंट म्हणून काम करणार्या आठजणांना काल अटक केली होती. आज आणखी पाचजणांना अटक केली. ही कारवाई बघून शहरातील मटका एजंटांचे धाबे दणाणले आहेत. चौका-चौकांत, शाळेच्या रिकाम्या पटांगणात दुपारी व रात्री मोटारसायकलवर बसून मोबाईल मटका घेणारे अनेकजण पाहायला मिळतात. या सर्वांच्या हालचालींवर पोलिसांनी करडी नजर ठेवली असून हद्दीतील पोलीस ठाण्याऐवजी दुसर्या पोलिसांकरवी ही कारवाई केली जात आहे. (प्रतिनिधी)