पाच नव्या चेहऱ्यांना आमदारकीचा गुलाल : -- पुढच्या पिढीकडे सत्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2019 03:57 PM2019-10-26T15:57:44+5:302019-10-26T15:58:57+5:30
दोन विद्यमान आमदारांनाच लोकांनी पुन्हा गुलाल लावून सेवा करण्याची संधी दिली. पी. एन. पाटील व प्रकाश आवाडे यांना दोन टर्मनंतर, तर विनय कोरे यांना एका टर्मनंतर पुन्हा विधानसभेत पाठविले.
विश्र्वास पाटील-
कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीत या वेळेला कोल्हापूर जिल्ह्यातून पाच नव्या चेहऱ्यांना आमदार म्हणून लोकांनी संधी दिली. त्यामध्ये काँग्रेसकडून चंद्रकांत जाधव, ऋतुराज पाटील, राजूबाबा आवळे; तर राष्ट्रवादीकडून राजेश पाटील व अपक्ष राजेंद्र पाटील-यड्रावकर यांचा समावेश आहे. दोन विद्यमान आमदारांनाच लोकांनी पुन्हा गुलाल लावून सेवा करण्याची संधी दिली. पी. एन. पाटील व प्रकाश आवाडे यांना दोन टर्मनंतर, तर विनय कोरे यांना एका टर्मनंतर पुन्हा विधानसभेत पाठविले.
कोल्हापूर उत्तरमध्ये काँग्रेसच्या चंद्रकांत जाधव यांच्या विजयास शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांचीच अनेक प्रश्न व घटनांबद्दलची भूमिका कारणीभूत ठरली. ऋतुराज पाटील हे नियोजनबद्ध प्रयत्नांमुळे यशस्वी झाले. भाजपचा पारंपरिक मतदार काँग्रेसकडे वळविण्यात ते यशस्वी झाल्याने त्यांना मोठे यश मिळाले. हातकणंगले मतदारसंघात राजूबाबा आवळे हे यापूर्वी एकदा लढून पराभूत झाले होते. ‘मिणचेकर नकोत’ या जनभावनेला त्यांच्या रूपाने सक्षम पर्याय मिळाल्यावर आवळे घराण्यात १५ वर्षांनंतर गुलाल आला. चंदगड मतदारसंघात राष्ट्रवादीच्या राजेश पाटील यांना लोकसभेला मेहुणे शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक यांच्या विजयासाठी केलेले प्रयत्न कामी आले. गेल्या निवडणुकीत त्यांचे वडील दिवंगत नरसिंगराव पाटील यांचा पराभव झाला होता. त्यांच्या घराण्यातही २००४ नंतर विधानसभेचा गुलाल आला.
शिरोळ मतदारसंघात दिवंगत शामराव पाटील-यड्रावकर हे १९९५ ला प्रथम लढले. त्यानंतर राष्ट्रवादीची स्थापना झाल्यावर १९९९ ला त्यांनी याच मतदारसंघातून ४९,५४० मते घेतली; परंतु त्यांचा पराभव झाला. पुन्हा राजेंद्र पाटील हे २००४ आणि २०१४ ला लढले; परंतु तरीही त्यांना विजय मिळाला नव्हता. एकच माणसाला कितीवेळा पराभूत करायचे, असा विचार जनतेने केल्यानेच त्यांना यावेळेला चुरशीच्या लढतीत यश मिळाले.
लोकांनी आपले प्रतिनिधी म्हणून निवडून देताना अनेक बाबींचा विचार केल्याचे निकालावरून दिसते. कागलमध्ये आमदार हसन मुश्रीफ हे पाचव्यांदा निवडून आले; परंतु निवडणुकीत त्यांच्याबद्दल कुठेही नकारात्मक चित्र नव्हते. खरे तर एकदा संधी मिळाल्यानंतर दुसºया निवडणुकीत थोडी का असेना, नकारात्मक भावना तयार होते; परंतु मुश्रीफ यांनी मात्र लोकसंपर्क व ‘आपला माणूस’ ही भावना लोकांच्या मनांत रुजविल्याने त्यांनाच पुन्हा का निवडून द्यायचे, हा मुद्दा निवडणुकीत चर्चेलाही आला नाही.
राधानगरीत प्रकाश आबिटकर यांनाही चांगला संपर्क, लोकांच्या प्रश्नांसाठी केलेला पाठपुरावा कामी आला. याउलट तितकाच चांगला संपर्क आणि पाठपुरावा असतानाही करवीरमध्ये चंद्रदीप नरके यांना मात्र विजय खेचून आणता आला नाही. ‘त्यांना दोन वेळा गुलाल दिला आता पुरे,’ अशी भावना करवीर व कोल्हापूर उत्तर मतदारसंघातही दिसली. कोल्हापूरचा माणूस फार काळ कुणाला डोक्यावर घेत नाही, याचेच प्रत्यंतर त्यातून आले. कोल्हापूर उत्तरमध्ये आजपर्यंत जनतेने कुणालाच विजयाची हॅट्रटिक करू दिलेली नाही.
-------------
असाही तोल...
जुन्या सांगरूळमध्ये लोकांनी शेकापक्षाचे तत्कालीन आमदार संपतराव पवार यांना दोनवेळा विजयी केले व तिसºयांदा काँग्रेसच्या पी. एन. पाटील यांना गुलाल लावला. त्यानंतर पुनर्रचना झालेल्या करवीर मतदारसंघात मतदारांनी शिवसेनेच्या चंद्रदीप नरके यांना संधी दिली व त्याच मतदारांनी या निवडणुकीत पी. एन. यांना विजयी केले. म्हणजे संपतराव पवार, चंद्रदीप नरके व पी. एन. पाटील यांना प्रत्येकी दोन वेळा विजयी केले. सलग सहा निवडणुकीत चारवेळा पराभूत होऊनही पी़ एन. यांनी काँग्रेस म्हणून स्वत:चा गट मजबूत ठेवल्यानेच त्यांना इतक्या वर्र्षांनंतर विजय खेचून आणता आला.
नूतन आमदारांचे वय..
पी. एन. पाटील व प्रकाश आवाडे- दोघांचेही ६६, हसन मुश्रीफ- ६५, चंद्रकांत जाधव- ५६, राजेश पाटील- ५२, राजेंद्र पाटील यड्रावकर- ५०, विनय कोरे- ४७, प्रकाश आबिटकर व राजूबाबा आवळे दोघांचेही ४५, ऋतुराज पाटील- २९.
पहिल्याच प्रयत्नात
निवडणूक कोणतीही असो, त्यामध्ये पहिल्याच प्रयत्नात यश मिळण्यासाठीही नशीब असावे लागते. या निवडणुकीत असे नशीब तिघांचे उजाडले. त्यामध्ये ऋतुराज पाटील, राजेश पाटील व चंद्रकांत जाधव यांचा समावेश आहे.
-----------------------
प्रस्थापित कुटुंबातच
ऋतुराज पाटील यांचे आजोबा आमदार होते, चुलते सतेज पाटील हे आता विधान परिषदेचे आमदार आहेत. पी. एन. पाटील यांचे सासरे दिवंगत श्रीपतराव बोंद्रे हे आमदार व कृषिराज्यमंत्री होते. राजेश पाटील यांचे वडील दिवंगत नरसिंगराव पाटील हे आमदार होते. प्रकाश आवाडे यांचे वडील कल्लाप्पाण्णा आवाडे व ते स्वत:ही आमदार व कॅबिनेट मंत्री होते. राजूबाबा आवळे यांचे वडील पाचवेळा आमदार, एकदा लातूरहून खासदार व कॅबिनेट मंत्री होते. फारशी भक्कम राजकीय पार्श्वभूमी नसलेले व कोणतीही निवडणूक न लढवता थेट आमदार झालेले चंद्रकांत जाधव हे एकमेव आहेत.
आबिटकर यांना अशीही संधी
गेल्या निवडणुकीत प्रकाश आबिटकर, अमल महाडिक व उल्हास पाटील हे प्रथमच निवडून आले होते. त्यांतील आबिटकर यांना लोकांनी पुन्हा संधी दिली तर महाडिक व उल्हास पाटील यांचा मात्र पराभव केला.