कोल्हापूर लोकसभेसाठी असेही पाच पर्याय, रणधुमाळी सुरू होण्यास उरले दोनच महिने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2018 05:18 PM2018-10-17T17:18:16+5:302018-10-17T17:28:29+5:30
राष्ट्रवादी काँग्रेससाठी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात चांगले वातावरण असताना खासदार धनंजय महाडिक यांच्या उमेदवारीवरून स्वत: महाडिक व पक्ष यांच्यातील दरी दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र आहे.
विश्र्वास पाटील
कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेससाठी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात चांगले वातावरण असताना खासदार धनंजय महाडिक यांच्या उमेदवारीवरून स्वत: महाडिक व पक्ष यांच्यातील दरी दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र आहे.
सोमवारी (दि. १५) खासदार महाडिक यांनी मला राष्ट्रवादीतून विरोध होत असेल, तर कोणत्या पक्षातून निवडणूक लढवायचे हे पक्षाध्यक्ष शरद पवार हेच सांगतील, असे सांगून पुन्हा बॉम्ब टाकला आहे. माझे नाणे खणखणीत आहे, त्यामुळे मी कोणत्याही पक्षातून निवडणूक लढवून जिंकून येऊ शकतो, अशी राजकीय पक्षांना बेदखल करणारी भूमिका त्यांनी पुन्हा घेतली आहे.
खासदार महाडिक यांच्या उमेदवारीवरून संशयाचे वातावरण तयार झाल्यामुळे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून आजच्या घडीला पाच पर्याय चर्चेत आले आहेत. त्यातील कोणताही पर्याय प्रत्यक्षात येऊ शकतो. असे घडणारच नाही असे कुणीही छातीवर हात ठेवून सांगू शकत नाही. राजकीय पक्षांकडून या पर्यायांवर विचारही सुरू झाला आहे.
पर्याय -०१
- दोन्ही काँग्रेसची आघाडी व राष्ट्रवादीकडून खासदार धनंजय महाडिक यांना उमेदवारी.
- शिवसेना-भाजपची युती व शिवसेनेकडून प्रा. संजय मंडलिक यांना उमेदवारी.
पर्याय - ०२
- दोन्ही काँग्रेसची आघाडी व राष्ट्रवादीकडून खासदार धनंजय महाडिक
- भाजप व शिवसेना यांची युती न झाल्याने हे दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे रिंगणात. अशावेळी : शिवसेनेकडून प्रा. संजय मंडलिक व भाजपकडून माजी आमदार संजयबाबा घाटगे अथवा काडसिद्धेश्वर महाराज यांच्या नावांची चर्चा सुरू आहे. भाजपकडून व मुख्यत: पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून त्यासाठी आग्रह.
पर्याय-०३
खासदार महाडिक यांच्या उमेदवारीस अंतर्गत फारच विरोध झाला आणि पक्षाने उमेदवारी बदलण्याचा निर्णय घेतल्यास राष्ट्रवादीकडून संभाव्य उमेदवार म्हणून आमदार हसन मुश्रीफ यांचे नाव पुढे येऊ शकते. या स्थितीत शिवसेना-भाजपचे उमेदवार म्हणून संजय मंडलिक हेच रिंगणात राहिल्यास खासदार महाडिक यांना अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याचा पर्याय राहू शकतो. महाडिक गट, गोकुळ लॉबी व सर्व पक्षांतील राजकीय मित्र यांची मदत घेऊन महाडिक यांना नशीब अजमावावे लागेल.
पर्याय-०४
दोन्ही काँग्रेसची आघाडी होऊन राष्ट्रवादीची प्रा. संजय मंडलिक यांना उमेदवारी.
भाजप-शिवसेनेची युती होऊन शिवसेनेकडून खासदार धनंजय महाडिक यांना उमेदवारी; परंतु ही शक्यता फारच धूसर वाटते. महाडिक यांना भाजप सहज उमदेवारी देऊ शकते किंबहुना त्यांच्यासाठी भाजपने पायघड्याच घातल्या आहेत. शिवसेनेशी त्यांचे फारसे चांगले संबंध नाहीत.
लोकसभेची २००४ निवडणूक महाडिक यांनी शिवसेनेकडून लढवली व पराभव झाल्यावर त्यांनी लगेच शिवसेनेची संगत सोडली आहे; परंतु मंडलिक नसतील तर शिवसेनेकडेही दुसरा सक्षम उमेदवारच नाही; त्यामुळे त्या निकषांवर महाडिक यांचाही विचार होऊ शकतो.
पर्याय-०५
- दोन्ही काँग्रेसची आघाडी होऊन राष्ट्रवादीची प्रा. संजय मंडलिक यांना उमेदवारी.
- भाजप व शिवसेना स्वतंत्र लढणार व भाजपकडून धनंजय महाडिक व शिवसेनेकडून विजय देवणे यांना संधी.
या सर्व पर्यायांपैकी पहिल्या तीन पर्यायांचीच जास्त शक्यता वाटते. लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू होण्यासाठी कसेबसे दोनच महिने राहिले आहेत. त्याच्यापूर्वी राजस्थान, मध्यप्रदेश, तेलंगणा, छत्तीसगड आणि मिझोराम या राज्यांतील विधानसभा निवडणुका होत आहेत.
भाजपला तिथे लोक कसे स्वीकारतात यावरही बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार हे आजतरी महाडिक यांच्या बाजूनेच असल्याचे स्पष्ट दिसते. दुसऱ्या बाजूला संजय मंडलिक हेदेखील शिवसेनेचे उमेदवार म्हणूनच रिंगणात उतरतील, अशी शक्यता जास्त दिसते. समीकरणे कशी आकार घेतात, त्यावर पडद्यामागील प्यादी हलणार आहेत.