इस्लामपूरच्या नगराध्यक्षांसह पाचजणांवर गुन्हा
By admin | Published: February 22, 2017 12:26 AM2017-02-22T00:26:24+5:302017-02-22T00:26:24+5:30
मतदारांना पैसे वाटप : राष्ट्रवादीच्या २१ कार्यकर्त्यांवरही गुन्हे
बागणी : बागणी (ता. वाळवा) जिल्हा परिषद गटातील रयत विकास आघाडीचे उमेदवार सागर खोत यांना मते देण्यासाठी शिगाव (ता. वाळवा) येथे सोमवारी रात्री मतदारांना पैशाचे वाटप केल्याप्रकरणी इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील यांच्यासह पाचजणांवर अखेर आष्टा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. हा प्रकार राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी उघडकीस आणला; पण त्यांनी जमावबंदी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी पोलिसांनी २१ कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हे दाखल केले.
पैसे वाटपाचा गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये निशिकांत भोसले-पाटील (इस्लामपूर), महेश पाटील, पांडुरंग पाटील, विजयकुमार पाटील, निवास पाटील (चौघे रा. शिगाव) यांचा समावेश आहे.
याप्रकरणी मधुकर रंगराव पाटील (शिगाव) यांनी फिर्याद दिली आहे. राष्ट्रवादीच्या स्वरूपराव पाटील, मधुकर पाटील, रणजित पाटील, शरद गायकवाड, मोहन गायकवाड, राजेंद्र भासर, जितेंद्र पाटील अन्य १५ अनोळखींविरुद्ध शिगाव ग्रामपंचायतीजवळ जमावबंदी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी गुन्हे दाखल केले आहेत. याबाबत सहाय्यक पोलिस फौजदार संजय सनदी यांनी फिर्याद दिली आहे.
वहीतील पाने फाडली
निशिकांत पाटील यांनी कोणाला किती पैसे वाटप केले, याची यादी वहीत तयार केली होती; पण पैसे वाटप सापडल्यानंतर त्यांनी वहीतील मतदारांच्या नावाची पाने फाडून टाकली. शेडचे मालक महेश पाटील यांनी मधुकर पाटील व त्यांचा पुतण्या रणजित यांना तेथून निघून जाण्यास सांगितल्यानंतर त्यांच्यात जोरदार वाद झाला. हा वाद सुरू असताना पैसे घेतलेले मतदारही तेथून निघून गेले.
शिगाव (ता. वाळवा) येथे जिल्हा परिषद निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पराभव समोर दिसू लागल्याने राष्ट्रवादीचे नेते, माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांकरवी षड्यंत्र रचून सर्वसामान्य मतदारांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. तसेच एका पोलिस अधिकाऱ्यालाही दमबाजी केली. दंगे भडकविण्यात जयंत पाटील किती माहीर आहेत, हे जिल्ह्याला माहीत आहे.
-सदाभाऊ खोत, कृषी राज्यमंत्री.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते जनतेकडून वर्गणी गोळा करून निवडणूक लढवत होते. आता त्यांच्याकडे मंत्रीपद आल्याने, पैसा वाटून भ्रष्ट मार्गाने मते मिळविण्याचा उद्योग ते करत आहेत. एवढ्या कमी कालावधित मतदारांना वाटण्याइतपत पैसा कोठून आला,
आमदार जयंत पाटील, राष्ट्रवादीचे नेते.
शिगाव (ता. वाळवा) येथील घटनेची सत्य वस्त्ुस्थिती माहीत असतानाही केवळ नगरपालिका निवडणुकीतील पराभव सहन न झाल्याने माझी प्रतिमा मलीन करण्याचा आमदार जयंत पाटील यांनी केलेला प्रयत्न निंदनीय आहे. त्यांनी कुटिल राजकारणाला पूर्णविराम द्यावा. अन्यथा त्यांना ज्या भाषेत समजते त्याच भाषेत उत्तर देऊ.
-निशिकांत भोसले-पाटील, नगराध्यक्ष, इस्लामपूर.