Kolhapur- गोल्ड लाईफ फसवणूक: जीएसटी अधिकाऱ्यासह पाचजण अटकेत, नऊ जणांवर गुन्हा
By उद्धव गोडसे | Published: December 12, 2023 01:05 PM2023-12-12T13:05:33+5:302023-12-12T13:06:12+5:30
एक कोटी ११ लाखांची फसवणूक, पाच टक्के परताव्याचे आमिष
कोल्हापूर : दरमहा पाच टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून २६ गुंतवणूकदारांची एक कोटी ११ लाख सहा हजार ५०० रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गोल्ड लाईफ डिस्ट्रिब्युटर्स कंपनीच्या प्रमुखासह नऊ जणांवर सोमवारी (दि. ११) रात्री राजारामपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. कंपनीचा प्रमुख आणि प्रमोटर जीएसटी अधिका-यासह पाच संशयितांना पोलिसांनी अटक केली. याबाबत विजया दीपक कांबळे (वय ४३, रा. प्रताप भोसलेनगर, सरनोबतवाडी, ता. करवीर) यांनी फिर्याद दिली.
कंपनीचा प्रमुख इंद्रजीत सुभाष कदम (वय ४६, रा. प्रतिभानगर, कोल्हापूर) याच्यासह राहुल शशिकांत गाडवे (५२, रा. सातवी गल्ली, राजारामपुरी, कोल्हापूर), जीएसटी अधिकारी कुमार जोतिराम उबाळे (५२, रा. राजेंद्रनगर, कोल्हापूर), अमरदीप बाबूराव कुंडले (४९, रा. राजगड कॉलनी, कोल्हापूर), आबासो बाळू वाडकर (रा. मणेर मळा, उचगाव, ता. करवीर) या पाच जणांना आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली आहे. यांच्यासह अतुल वाघ (रा. देवकर पाणंद, कोल्हापूर), शैलेश वाघ (रा. फुलेवाडी, कोल्हापूर), शैलेश मरगज (रा. शिवाजी पेठ, कोल्हापूर) आणि सुनीता आबासो वाडकर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, राजारामपुरी येथील तिस-या गल्लीत असलेल्या गोल्ड लाईफ डिस्ट्रिब्युटर्स कंपनीने ऑगस्ट २०२२ पासून गुंतवणूकदारांकडून पैसे भरून घेतले. दरमहा पाच टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूक वाढवली. सुरुवातीचे काही महिने परतावे दिल्यानंतर मार्च २०२३ पासून परतावे देणे बंद केले. याबाबत काही गुंतवणूकदारांनी पोलिस अधीक्षकांकडे तक्रार केली होती. त्यांच्या सूचनेनुसार आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेने चौकशी करून कंपनीतील नऊ जणांवर गुन्हा दाखल केला. तसेच पाच जणांना अटक केली.