जिल्हा परिषदेचे राजकारण : स्वनिधीचा निर्णय झाल्यावरच पाच जणांनी दिले राजीनामे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 11:40 AM2021-06-24T11:40:24+5:302021-06-24T11:42:38+5:30
Zp Kolhapur : जादा स्वनिधी आणि थांबवलेल्या कामांना मंजुरी दिल्यानंतरच जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सतीश पाटील यांच्यासह सभापती हंबीरराव पाटील, प्रवीण यादव, डॉ. पद्माराणी पाटील आणि स्वाती सासने यांनी अखेर बुधवारी राजीनामे दिले. त्यासाठी संध्याकाळी साडेसहापर्यंत अध्यक्ष बजरंग पाटील यांना तिष्ठत बसावे लागले.
कोल्हापूर : जादा स्वनिधी आणि थांबवलेल्या कामांना मंजुरी दिल्यानंतरच जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सतीश पाटील यांच्यासह सभापती हंबीरराव पाटील, प्रवीण यादव, डॉ. पद्माराणी पाटील आणि स्वाती सासने यांनी अखेर बुधवारी राजीनामे दिले. त्यासाठी संध्याकाळी साडेसहापर्यंत अध्यक्ष बजरंग पाटील यांना तिष्ठत बसावे लागले.
सर्व काही ठरल्यानुसार करण्यासाठी अर्जुन आबिटकर, अमर पाटील आणि शशिकांत खोत यांच्या तोंडाला फेस यायची वेळ आली. दिवसभर जिल्हा परिषदेतील विविध दालनात, नंतर पदाधिकाऱ्यांच्या बंगल्यावर, अखेर अध्यक्षांच्या दालनात अशा विविध बैठका झाल्यानंतर मग चार जणांनी प्रत्यक्ष राजीनामे दिले. सासने यांचाही राजीनामा देण्यात आला. परंतू त्या शेवटपर्यंत जिल्हा परिषदेकडे फिरकल्या नाहीत. त्यांनी फोनवरूनच निरोप दिला.
शिवसेनेचे संपर्कप्रमुख अरूण दूधवडकर यांच्यासोबतच्या बैठकीमध्ये ठरल्यानुसार शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची थांबवलेली कामे मंजूर केल्यानंतर राजीनाम्याचा निर्णय ठरला होता. अशातच उपाध्यक्ष पाटील यांचा राजीनामा देण्यासाठी मंगळवारी शशिकांत खोत गेले असता त्यांनी तो स्वीकारला नाही. त्यामुळे पालकमंत्री सतेज पाटील यांनी त्यांना बुधवारी सकाळी सुनावले. त्यामुळे पाटील सकाळी साडेअकरापासूनच दालनात थांबून होते.
दुपारनंतर सासने वगळता सर्व पदाधिकारी जिल्हा परिषदेत आले. आबिटकर आणि खोत या सर्वांशी चर्चा करत होते. साडे चार नंतर उपाध्यक्ष पाटील, प्रवीण यादव, हंबीरराव पाटील, राजेश पाटील सभापती बंगल्यावर गेले. तेथे साधकबाधक चर्चा करून सर्वजण साडे पाचच्या दरम्यान अध्यक्षांच्या दालनात आले. तेथे पुन्हा सविस्तर चर्चा झाली.
राजीनामे देणाऱ्या पदाधिकाऱ्यांच्या स्वनिधीचा मुद्दा सोडवण्यात आला. तशी मुख्य लेखा व वित्त अधिकारी राहुल कदम यांच्याशी फोनवरून चर्चा झाली. मगच अर्थ समितीचे सभापती असलेले यादव सर्वात शेवटी बैठकीच्या ठिकाणी आले आणि मगच सर्वांनी अध्यक्ष पाटील यांच्याकडे राजीनामे दिले.
हंबीरराव पाटील यांच्या ३५ लाखांच्या कामांना मान्यता
प्रवीण यादव यांच्या शिक्षण विभागाच्या स्वनिधीतील २५ लाखांच्या कामांना मान्यता अध्यक्ष बजरंग पाटील यांना १५ लाख जादा स्वनिधी उपाध्यक्ष सतीश पाटील, प्रवीण यादव यांना प्रत्येकी १० लाख जादा स्वनिधी हंबीरराव पाटील, डॉ. पद्माराणी पाटील आणि स्वाती सासने यांना ५ लाख जादा स्वनिधी स्वाती सासने यांच्या दलित वस्तीतील कामांना धक्का नाही.
रुग्णालयातच घेतला अध्यक्षांचा राजीनामा
अध्यक्ष बजरंग पाटील यांचा राजीनामा ते कोरोनो पॉझिटिव्ह म्हणून रुग्णालयात दाखल झाले होते तेव्हाच घेतला आहे. आता तो त्यांनी फक्त प्रत्यक्ष पुण्याला जावून विभागीय आयुक्तांना द्यायचा आहे की यासाठी प्राधिकृत म्हणून कोणाची नियुक्ती होणार आहे याचा निर्णय गुरुवारी किंवा शुक्रवारी होईल.