पेपरफुटीप्रकरणी पाचजणांना अटक
By admin | Published: December 25, 2015 12:20 AM2015-12-25T00:20:50+5:302015-12-25T00:23:01+5:30
सांगलीतील प्रकार : कोल्हापूर जिल्ह्यातील दोघांचा समावेश
सांगली : जिल्हा परिषदेच्या आरोग्यसेविका पदाच्या पेपरफुटीचा तपास सुरू असताना, औषध निर्माण अधिकारी पदाच्या परीक्षेचा पेपरही फुटला असल्याची धक्कादायक माहिती पोलिसांच्या तपासातून उजेडात आली आहे. दोन्ही परीक्षांचा पेपर फोडणारी कर्मचाऱ्यांची टोळी जिल्हा परिषदेतीलच असल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी छापखान्यातील कनिष्ठ बार्इंडर रामदास फुलारे याच्यासह पाचजणांना अटक केली आहे, अशी माहिती जिल्हा पोलीसप्रमुख सुनील फुलारी यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.अटक केलेल्यांमध्ये रामदास आनंदा फुलारे (वय ४२, रा. हुबालवाडी, ता. वाळवा), शशांक श्रीकांत जाधव (२५, वडगाव, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर), सतीश शिवाजी मोरे (३६, कवलापूर, ता. मिरज), अशोक शामराव माने (३५, कामेरी, ता. वाळवा), शिवाजी पांडुरंग गायकवाड (३३, म्हाळुंगे, ता. करवीर, जि. कोल्हापूर) यांचा समावेश आहे. हे संशयित पंचायत समिती, जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग व सार्वजनिक बांधकाम विभागात नियुक्तीस आहेत. यातील फुलारे सध्या तरी मुख्य सूत्रधार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यास गुरुवारी रात्री ताब्यात घेऊन अटक केली. अन्य चार संशयितांना सकाळीच अटक केली होती.
न्यायालयाने त्यांना २९ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. यामध्ये आणखी काही जणांचा सहभाग असण्याची शक्यता आहे. त्यांच्याविरुद्ध ठोस पुरावे मिळाल्यानंतर अटकेची कारवाई केली जाईल. कुणाचीही गय केली जाणार नाही, असे पोलीसप्रमुखांनी सांगितले.
गेल्या महिन्यात आरोग्यसेविका व औषध निर्माण अधिकारी या दोन पदांची परीक्षा झाली. या परीक्षेत कॉपी करताना शाहीन जमादार हिला रंगेहात पकडले होते. तिच्यासह तिला मदत करणाऱ्या शाकीरा उमराणी या दोघींविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या दोघीही आरोग्यसेविका आहेत. दोन्ही परीक्षांच्या प्रश्नपत्रिकांची छपाई जिल्हा परिषदेच्या छापखान्यात झाली होती. त्यामुळे दोन्ही प्रश्नपत्रिका फुलारे याने बाहेर काढल्या होत्या. त्या त्याने संशयितांमार्फत उमेदवारांना गाठून पुरविल्याचे स्पष्ट झाले आहे. आरोग्यसेवक पदासाठी सात ते आठ लाख, तर औषध निर्माण अधिकारी पदासाठी दहा ते बारा लाख रुपये या दराने प्रश्नपत्रिकांची विक्री केली आहे.
यासाठी त्यांनी स्वतंत्र खासगी लोकांची यंत्रणा राबविली होती, असे तपासात स्पष्ट झाले आहे. किती उमेदवारांना त्यांनी प्रश्नपत्रिका पुरविल्या, याचा अद्याप उलगडा झाला नाही. (प्रतिनिधी)