पीक कर्जावरील पाच टक्के कपातीवरून संघर्ष पेटणार
By admin | Published: June 26, 2015 12:15 AM2015-06-26T00:15:57+5:302015-06-26T00:15:57+5:30
उपोषणाचा इशारा : टाकवडे येथे कर्जदारांनी अधिकाऱ्यांना धरले धारेवर
कुरूंदवाड : जिल्हा बॅँकेच्या पीक कर्जावर पाच टक्के कपात करण्याच्या निर्णयावरून टाकवडे (ता. शिरोळ) येथील शाखेत काही कर्जदार सभासदांनी अधिकाऱ्यांनाच धारेवर धरले. ठेव कपात करूनच कर्जाची रक्कम दिल्याने संतप्त शेतकऱ्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली सोमवारी (दि. २९) येथील शाखा कार्यालयासमोरच एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे ठेव कपातीवरून जिल्ह्यात प्रथमच शेतकऱ्यांतून संघर्ष होणार आहे.
शेतकऱ्यांना ऊस पिकावर सेवा संस्थेमार्फत जिल्हा बॅँकेकडून कर्ज मिळते. कर्जावर ठरावीक टक्केशेअर्स कपात करून उर्वरित रक्कम शेतकऱ्याला देतात. मात्र, यंदापासून सेवा संस्थेबरोबरच जिल्हा बॅँकेतही पाच टक्के ठेव कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याची अंमलबजावणी चालू आहे. त्याशिवाय कर्जाची रक्कमच दिली जात नसल्याने आर्थिक अडचणीत असलेला शेतकरी विरोध न करता रक्कम घेत आहे.
गुरुवारी सकाळी येथील जिल्हा बॅँकेच्या शाखेतूनही कर्जातून ठेव कपात केली जात असल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विश्वास बालिघाटे, अनिल पाटील, राजू कलावंत, आदी शेतकऱ्यांनी कपातीला विरोध करीत शाखाधिकारी यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती करीत धारेवर धरले. मात्र, बॅँकेच्या नियमानुसार कपात करून दिल्याने संतप्त शेतकऱ्यांनी स्वाभिमानी संघटनेच्या नेतृत्वाखाली सोमवारी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करून संघर्षाला सुरुवात करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार निवेदन काढले असून, निवेदनावर विश्वास बालिघाटे, राजू कलावंत, आप्पासाहेब सूर्यवंशी, रघुनाथ बिरोजे, लक्ष्मण यादव, मनोहर कांबळे, आदींच्या सह्या आहेत.
दरम्यान, बॅँकेच्या ठेव कपातीच्या निर्णयाला शेतकऱ्यांतून तीव्र संताप व्यक्त होत असून, या लाक्षणिक उपोषणाच्या आंदोलनामुळे जिल्ह्यात प्रथमच संघर्षाची ठिणगी पडणार आहे. ( वार्ताहर )