Warkari accident near Sangola: एकाच चितेवर पाच जणांचे अंत्यसंस्कार; जठारवाडी शोकमग्न

By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2022 01:52 PM2022-11-01T13:52:46+5:302022-11-01T14:08:26+5:30

आयुष्यभर विठ्ठल नामाचा जप करणाऱ्या आपल्याच बांधवाना अखेरचा निरोप देण्यासाठी उभे जठारवाडी गाव टाळ मृदुंगाचा गजर करत अंत्ययात्रेत सामील झाले होते.

Five persons cremated on a single pyre at Jatharwadi in Kolhapur for the deceased in the accident in which the car rammed into the barracks | Warkari accident near Sangola: एकाच चितेवर पाच जणांचे अंत्यसंस्कार; जठारवाडी शोकमग्न

Warkari accident near Sangola: एकाच चितेवर पाच जणांचे अंत्यसंस्कार; जठारवाडी शोकमग्न

googlenewsNext

पोपट पवार

कोल्हापूर : एरव्ही टाळ मृदुंगाचा गजर सुरू झाला की उभा गाव त्यात तल्लीन व्हायचा, लहान थोरासह  सगळ्यांचीच पावले गावचे शक्तीपीठ असलेल्या विठ्ठल मंदिराकडे आपसूकच वळायची. आज मंगळवारीही टाळ मृदुंगचा गजर उभ्या शिये-जठारवाडी परिसरात घुमला खरा, मात्र, या आवाजाला अश्रूंची किनार होती. आयुष्यभर विठ्ठल नामाचा जप करणाऱ्या आपल्याच बांधवाना अखेरचा निरोप देण्यासाठी उभे जठारवाडी गाव टाळ मृदुंगाचा गजर करत अंत्ययात्रेत सामील झाले होते.   

जुनोनी(ता.सांगोला) या गावाजवळ वारकऱ्यांच्या दिंडीत कार घुसून झालेल्या अपघातात करवीर तालुक्यातील जठारवाडी येथील पाच जणांचा तर वळीवडे येथील दोघा मायलेकरांचा जागीच मृत्यू झाला होता. त्यांचे पार्थिव मंगळवारी पहाटे जठारवाडी गावात पोहोचले. यावेळी ट्रॅक्टर ट्रॉलीत पाचही जणांचे पार्थिव ठेवत टाळ मृदुंगाच्या गजरात त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली.  यातील जठारवाडी येथील ४ महिला व एक पुरुष अशा पाच जणांवर मंगळवारी सकाळी आठ वाजता शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. एकाच ठिकाणी रचण्यात आलेल्या चितेवर पाचही जणांचे अंत्यसंस्कार होताना उभा गाव अश्रूंनी डबडबला होता.

जठारवाडी येथील ३५ जणांची दिंडी आठ दिवसांपूर्वी गावातून पंढरपूरकडे रवाना झाली. ही दिंडी  सोमवारी सायंकाळी जुनोनी गावाजवळून जात असताना अचानक पाठीमागून आलेली कार या दिंडीत घुसली. यात सात जण ठार झाले. त्यामध्ये महिलांची संख्या अधिक होती. शारदा आनंदा घोडके (वय ६१), रंजना बळवंत जाधव (५५), सुनिता पवार, गौरव पवार (१४), सर्जेराव श्रीपती जाधव (५२), सुनीता सुभाष काटे (५०), शांताबाई शिवाजी जाधव (६२) अशी मृतांची नावे आहेत. यापैकी सुनिता पवार आणि गौरव पवार हे मायलेक असून ते जठारवाडी इथले पाहुणे आहेत. ते मूळचे वळीवडे गावचे रहिवासी आहेत.     
           
विठुरायाच्या दर्शनाच्या ओढीने कार्तिकी यात्रेसाठी पंढरपूरकडे निघालेल्या पायी दिंडीत काल, सोमवारी सायंकाळी कार घुसल्याने झालेल्या भीषण अपघातात सात वारकऱ्यांचा मृत्यू झाला. त्यापैकी सहा जणांचा जागीच, तर एका वारकऱ्याचा उपचारदरम्यान मृत्यू झाला. या अपघातात पाच वारकरी जखमी झाले आहे. जखमी वारकऱ्यांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अपघातातील कार सांगोला तालुक्यातील सोनंद गावातील असून यातील दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान, आमदार पी. एन. पाटील, माजी आमदार चंद्रदीप नरके, अमल महाडिक, करवीरच्या तहसीलदार शीतल मुळे भांबरे यांनी अंत्यसंस्कारावेळी उपस्थित राहत मृतांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले.

Web Title: Five persons cremated on a single pyre at Jatharwadi in Kolhapur for the deceased in the accident in which the car rammed into the barracks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.