महापालिकेच्या २६०० विद्यार्थ्यांनी घेतला सिनेमांचा आनंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2020 05:54 PM2020-02-14T17:54:51+5:302020-02-14T17:56:26+5:30
महानगरपालिकेच्या ६० शाळांमधील २६०० विद्यार्थ्यांनी बालचित्रपटांचा आनंद घेतला. येथील शाहू स्मारक भवनात चिल्लर पार्टी विद्यार्थी चित्रपट चळवळ आणि कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षण समितीमार्फत आयोजित पाचव्या बालचित्रपट महोत्सवाचा समारोप झाला. दोन दिवसांच्या या महोत्सवात जगभरातील सहा सिनेमे मुलांना दाखविण्यात आले.
कोल्हापूर : महानगरपालिकेच्या ६० शाळांमधील २६०० विद्यार्थ्यांनी बालचित्रपटांचा आनंद घेतला. येथील शाहू स्मारक भवनात चिल्लर पार्टी विद्यार्थी चित्रपट चळवळ आणि कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षण समितीमार्फत आयोजित पाचव्या बालचित्रपट महोत्सवाचा समारोप झाला. दोन दिवसांच्या या महोत्सवात जगभरातील सहा सिनेमे मुलांना दाखविण्यात आले.
समारोप समारंभात कोल्हापूर महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी एस. के. यादव यांनी कोल्हापूरच्या चित्रपटसृष्टीचा वारसा जपण्याचे काम चिल्लर पार्टी विद्यार्थी चित्रपट चळवळ करीत आहे, या उपक्रमातून चांगलेच विद्यार्थी घडतील, असा विश्वास व्यक्त केला. ते पुढे म्हणाले, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरचे सिनेमे मुलांना दाखवून चिल्लर पार्टी महत्त्वाचे काम करीत आहे.
महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी वॉटर हॉर्स, डम्बो आणि डॉग्ज वे होम हे सिनेमे दाखविण्यात आले. यावेळी पाहुण्यांच्या हस्ते जगभरातील १० उत्कृष्ट बालचित्रपटांचे गोष्टीरूप कथानक असलेल्या ‘शिनेमा पोरांचा’ या पुस्तकाच्या प्रती संबंधित शाळांच्या शिक्षकांकडे सुपूर्द करण्यात आले. तसेच कल्पकता वापरून कागदी विमान तयार करणाºया प्रिन्स शिवाजी विद्यालयाचा विद्यार्थी सार्थक ऐवाळे या सहावीतील विद्यार्थ्याचाही पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला.
यादव यांचे स्वागत पद्मश्री दवे यांनी केले.
मिलिंद कोपार्डेकर यांनी प्रास्ताविक केले, तर उदय संकपाळ यांनी आभार मानले. याप्रसंगी चिल्लर पार्टी प्रस्तुत देशी या लघुपटाला फिल्मफेअर पुरस्कार मिळाल्याबद्दल दिग्दर्शक रोहित कांबळे, निर्माता राजेंद्रकुमार मोरे, बालकलाकार गार्गी नाईक, इशान महालकरी, मनस्वी आडनाईक यांचा ‘शिनेमा पोरांचा’ हे पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला. याशिवाय शाहू स्मारक भवनचे व्यवस्थापक कृष्णाजी हारगुडे यांच्यासह सर्व कर्मचाऱ्यांचा पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी शिवप्रभा लाड, सचिन पाटील, विजय शिंदे, देविका बकरे, साक्षी सरनाईक, नसीम यादव, रोशन जोशी, अमृता शिंदे, यशोवर्धन आडनाईक, श्रीनाथ काजवे, आदी उपस्थित होते.
कुरकुरे न खाण्याची विद्यार्थ्यांनी घेतली शपथ
महोत्सवात सिनेमा पहायला आलेल्या अनेक मुलांनी खाऊ म्हणून कुरकुरेची प्लास्टिकबंद पाकिटे आणली होती. मात्र, आरोग्यासाठी अपायकारक असल्याचे सांगितल्यानंतर आणलेली पाकिटे जमा करून मुलांनी कुरकुरे न खाण्याची शपथ घेतली. दोन दिवसांत पाच बॉक्समध्ये जमा झालेले कुरकुरे नष्ट करण्यात आले. सिनेमा संपल्यावर सहभागी सर्व मुलांना खाऊ देण्यात आला.
राईट बंधूंच्या पहिल्या विमानाची प्रतिकृती
शिवाजी मराठा हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या राईट बंधूंच्या पहिल्या विमानाची प्रतिकृती शाहू स्मारक भवनाच्या दर्शनी भागात लावले होते.
‘सेल्फी’चा आनंद
बालमहोत्सवासाठी येणाऱ्या शाळांच्या शिक्षकांनी याचे फोटो काढून विद्यार्थ्यांसोबत सेल्फीचाही आनंद लुटला. परिसरात महोत्सवात दाखविण्यात आलेल्या सर्व चित्रपटांचे स्टॅन्डी विद्यार्थ्यांचे लक्ष वेधून घेत होते. याशिवाय महानगरपालिकेतील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी स्वत: तयार केलेल्या कागदी विमानांच्या कलाकृतींच्या प्रदर्शनाला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला.