पाच हजार बालकांना मिळाली शिक्षणाची ‘उमेद’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2019 12:52 AM2019-11-14T00:52:13+5:302019-11-14T00:53:43+5:30
आई-वडील हयात नाहीत अशा गरजू मुला-मुलींची शाळांमधून माहिती घेऊन त्यांना दप्तरासह शैक्षणिक साहित्य या फौंडेशनच्यावतीने दिले जाते. ऊसतोड कामगारांची मुले शिक्षणाच्या प्रवाहात यावीत यासाठी त्यांना त्यांच्या पालांमध्ये जाऊन शिक्षण देण्याचा प्रयत्न आसुर्ले-पोर्ले (ता. पन्हाळा) येथील दत्त दालमिया साखर कारखाना येथे केला आहे.
संतोष मिठारी ।
कोल्हापूर : आर्थिक दुर्बलता, भौगोलिक दुर्गमता, आदी विविध कारणांमुळे अनेक बालकांचे जगणे कठीण बनते. असे कोणतेही मूल शिक्षणापासून वंचित राहू नये या हेतूने सांगरुळ (ता. करवीर) येथील उमेद फौंडेशन गेल्या पाच वर्षांपासून विविध उपक्रम राबवत आहेत. त्याच्या माध्यमातून आतापर्यंत समाजातील वंचित, उपेक्षित सुमारे पाच हजार बालकांना शिक्षणाबरोबरच जगण्याची ‘उमेद’ मिळाली आहे. कोल्हापूर, सिंधुदुर्ग, सांगली आणि जालनामधील या वंचित बालकांच्या आयुष्यात आनंद फुलविण्याचे काम या फौंडेशनने केले आहे.
आई-वडील हयात नाहीत अशा गरजू मुला-मुलींची शाळांमधून माहिती घेऊन त्यांना दप्तरासह शैक्षणिक साहित्य या फौंडेशनच्यावतीने दिले जाते. ऊसतोड कामगारांची मुले शिक्षणाच्या प्रवाहात यावीत यासाठी त्यांना त्यांच्या पालांमध्ये जाऊन शिक्षण देण्याचा प्रयत्न आसुर्ले-पोर्ले (ता. पन्हाळा) येथील दत्त दालमिया साखर कारखाना येथे केला आहे. कोपार्डे (ता. करवीर) येथील माळावर ‘शिक्षण आले अंगणी’ या संकल्पनेतून ‘ज्ञानांगण’ ही बिनभिंतीची शाळा भरविली जाते. त्याद्वारे चार वर्षांमध्ये ५० बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले आहे. जी बालक आणि ज्यांचे पालक कचरा अथवा भंगार वेचक म्हणून काम करतात अशा मुलांसाठी शाहूवाडी येथे उमेद शिक्षण केंद्रामार्फत सायंकाळी वर्ग चालवले जातात. या केंद्रात ४५ मुले-मुली आहे. विविध शाळांमध्ये बाल हक्क मंच स्थापन केले असून त्यामध्ये ८०० विद्यार्थी-विद्यार्थिनी सहभागी आहेत.
दुर्गम भागातील आंबर्डे, आयरेवाडी, बर्की (ता. शाहूवाडी), जाधववाडी (ता. पन्हाळा) तसेच जालना जिल्ह्यामध्ये सायंअभ्यासिकेचा रोज तीनशे विद्यार्थी मोफत लाभ घेतात. ‘ज्ञानसेतू’ या उपक्रमांमार्फत विद्यार्थ्यांची क्षेत्रभेटी, विविध कौशल्य शिकवली जातात. गरजू मुलांच्या शिक्षणाची व संगोपन जबाबदारी घेत ‘उमेद मायेचं घर’ या खासगी वसतिगृहाची स्थापना केली आहे. महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या गरजू मुलांना प्रवास, परीक्षा शुल्क, जेवण आदींकरिता आर्थिक मदत पुरविली जाते.
२५० हून अधिक स्वयंसेवक कार्यरत
आपल्या बालपणी जे दु:ख, यातना आल्या, त्या इतर मुलांच्या आयुष्यात येऊ नयेत, या हेतूने उमेद फौंडेशनची स्थापना केली आहे. प्रत्येक बालकांच्या आयुष्यात शिक्षणाची ‘उमेद’ निर्माण करण्यासाठी काम करण्याचे ध्येय घेऊन आम्ही २५० कार्यकर्ते, स्वयंसेवक कार्यरत आहोत. सामाजिक सुहृदयी देणगीदारांच्या मदतीने हे सामाजिक कार्य करण्यात येत आहे, असे या फौंडेशनचे अध्यक्ष प्रकाश गाताडे यांनी सांगितले.